अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- रेखा जरे खूनप्रकरणातील आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे यास नियमित जामीन मिळावा, असा आरोपीच्या वकीलाने न्यायालयात केलेल्या अर्जास सरकार पक्षांच्या वतीने विरोध करण्यात आला.

बुधवारी (दि.11) विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी जामीन अर्जावर म्हणणे सादर केले. अ‍ॅड. यादव यांनी युक्तीवादात सांगितले की, रेखा जरे यांना मारण्यासाठी दोनदा प्रयत्न झालेला होता.

30 नोव्हेंबर 2020 रोजी बोठे याने रेखा जरे व त्यांची आई सिंधूबाई वायकर यांना वैद्यकीय उपचारासाठी पुण्याला पाठविले. त्यांचे जाताना आणि येताना लोकेशन सातत्याने घेऊन आरोपींना दिले.

जातेगाव घाटात रेखा जरे यांचा दोघांनी गळा कापून निर्घृण खून केला. जरेचा खून झाल्यावर बोठे याने सुपारीचे 12 लाखांची रक्कम पिवळ्या बॅगेतून सागर भिंगारदिवे याला दिली. आरोपींमध्ये मोबाईलवर बोलणे झाल्याचे बोठे याच्या कार्यालय तसेच सागर याच्या घराबाहेरील सीसीटीव्हीत दिसून येत आहे.

सुपारीच्या रक्कमेपैकी सहा लाख 50 हजार रुपये भिंगारदिवे याच्या घरातून पंचासमक्ष हस्तगत करण्यात आले आहेत. बोठे याने जरेशी वितुष्ठ आल्याने शांत डोक्याने कट रचून खुनासाठी भिंगारदिवे व चोळके मार्फत पैसे पुरविले आहेत. बोठे याला कायदेशीर ज्ञान आहे.

घटने अगोदर आणि त्यानंतरचे वर्तन लक्षात घेऊन जामीन देऊ नये, असे म्हणणे सादर करण्यात आले. आरोपी बाळ बोठे याचे वकील ॲड. महेश तवले यांनी न्यायालयात म्हणणे सादर करण्यासाठी मुदत वाढवून मागितली होती. त्यावर सरकारी वकील यादव यांनी आपले म्हणणे न्यायालयाने ऐकून घ्यावे.

त्यावेळेस आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित राहावे, असे म्हणणे सादर केले. न्यायालयाने हे म्हणणे मान्य करून यादव यांना म्हणणे सादर करण्यास सांगितले. आरोपी बोठे यांचे वकील ॲड. महेश तवले यांना म्हणणे सादर करण्यासाठी आता दि. 17 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.