Char dham Yatra 2023 : देशातील सर्वात मोठ्या चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. देशातील लाखो हिंदू भाविक दरवर्षी या चार धाम यात्रेसाठी जात असतात. यंदाही आता चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. अनेक हिंदू भाविकांनी चार धाम यात्रेसाठी नोंदणी केली आहे.
२२ एप्रिलपासून यमुनोत्री आणि गंगोत्री यात्रेला सुरुवात झाली आहे. तर २५ एप्रिल रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत. तसेच २७ एप्रिल रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत.
तुम्हीही आता चार धाम यात्रेसाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण पुढील ५ दिवसांसाठी हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून काही सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.
चार धाम यात्रा सुरु झाल्यापासून उत्तराखंडमध्ये भाविकांची गर्दी वाढताना दिसत आहे. उत्तराखंडमधील ४ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.
या दिवसांमध्ये चार धाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी हवामान विभागाकडून सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. तसेच उत्तराखंडमधील हवामानाची स्थिती जाणून घेऊनच घराबाहेर पडावे असे आव्हान करण्यात आले आहे.
सतत बर्फवृष्टी आणि पाऊस
चार धाममधील यमुनोत्री या ठिकाणी सतत बर्फवृष्टी होत आहे. तसेच डोंगरावर सतत पाऊस पडत असल्याने रुद्रप्रयाग प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. जेव्हाही बर्फवृष्टी किंवा पाऊस पडत असले तेव्हा सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आव्हान हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात पाऊस पडत आहे. त्याचबरोबर या पावसामुळे तापमानातही सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी जिथे आहे तिथेच थांबावे, असे आदेश हवामान खात्याकडून सातत्याने दिले जात आहेत. जेव्हा हवामान चांगले असेल किंवा विभागाकडून माहिती दिली जाईल तेव्हाच भाविकांनी दर्शनासाठी जावे.
प्रवासाच्या सुरुवातीलाच अलर्ट जारी करण्यात आला
चार धाम यात्रेच्या सुरुवातीलाच हवामान खात्याकडून बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तराखंडमध्ये सतत होत असलेल्या हिमवृष्टीमुळे तसेच हिमस्खलनानंतर हवामान खात्याने गोमुख ट्रॅकवरून प्रवास करण्यास बंदी घातली होती.