काळजाचा थरकाप उडावा अशी बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील आठ लोकांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे कुटुंबामधील व्यक्तीनेच हे हत्याकांड केले असून संपूर्ण कुटुंब कुऱ्हाडीने कापून संपवले आहे. कुटुंबातील सदस्य संपवल्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली.
आरोपीचे नुकतेच लग्न झाले होते. दिनेश (27) असे या आरोपीचे नाव असून ही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात घडली आहे. ही घटना मध्यरात्री घडली असून सर्व लोक झोपेत असतानाच त्याने कुऱ्हाडीने हल्ला करत हत्या केली.
घटनेची माहिती समजताच तेथे पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण गाव सील केले आहे. सध्या गावातील लोकांची चौकशी सुरु असून आणखी काही धागेदोरे मिळतायेत का हे पाहत आहेत. यातील आरोपीच्या काकाने जे सांगितले त्यानुसार – गेल्या वर्षापासून आरोपीची मानसिक स्थिती खराब होती. त्याच्यावर उपचार करण्यात येत होते.
आठ दिवसांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याला पुन्हा एकदा मानसिक त्रास सुरु झाला व त्याने काल रात्री पत्नी वर्षा बाई, मोठा भाऊ श्रावण, त्याची बायको बारातो बाई, आई सिया बाई, श्रावणची तीन मुल आणि लहान बहिण आदी कुटुंबातील सदस्यांना ठार मारले. आरोपीच्या मोठ्या बहिणीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला.
परंतु त्यानेही गळफास घेत जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा त्याठिकाणी जमा झालेला आहे. पोलिसांनी सध्या संपूर्ण गावच सील केले असून सर्वांची कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणी आणखी काही माहिती हाती लागते का याचा शोध पोलीस घेत आहेत.