Mumbai-Baroda Expressway: मुंबई ते बडोदा हे अंतर होईल 4 तासात पूर्ण! बांधले जात आहेत महाकाय दुहेरी बोगदे, वाचा बोगद्यांची ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
tunnel in mumbai-baroda expressway

Mumbai-Baroda Expressway:- भारतामध्ये पायाभूत सुविधा उभारणीच्या दृष्टिकोनातून अनेक मोठमोठे रस्ते प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आलेले असून देशातील अनेक महत्त्वपूर्ण शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कृषी आणि औद्योगिकीकरण यांच्या विकासाकरिता रस्ते आणि रेल्वे मार्गांची भूमिका महत्त्वाची असते.

या दृष्टिकोनातून अनेक रस्ते प्रकल्पांची कामे भारतात सुरू आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सोयी सुविधांनी युक्त आणि वैशिष्ट्यपूर्ण असे राष्ट्रीय महामार्ग उभारले जात आहेत. यामध्ये जर आपण देशाची राजधानी दिल्ली व देशाची आर्थिक राजधानी मुंबई यादरम्यान उभारला जात असलेला मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचा विचार केला तर हा महामार्ग देशातील अनेक राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे.

या महामार्गाच्या दरम्यान मुंबई ते बडोदा या दोन शहरा दरम्यान देखील एक्सप्रेस वे उभारला जात असून त्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. या महामार्गाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या महामार्गावर ट्वीन ट्यूब टनेल अर्थात दुहेरी बोगद्यांचे काम सुरू असून माथेरानच्या डोंगराच्या खालून हे बोगदे उभारले जात आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये या बोगद्यांच्या अवघड अशा कामाला सुरुवात करण्यात आलेली होती. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये मुंबई ते बडोदा दृतगती महामार्ग व उभारले जाणारे बोगदे यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

 मुंबई ते बडोदा एक्सप्रेसवेचे स्वरूप

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई ते दिल्ली हा 1386 किलोमीटर लांबीचा दृतगती महामार्ग उभारला जात असून याचे काम वेगात सुरू आहे व यातील पहिला टप्पा खुला करण्यात आलेला आहे. याच महत्त्वाच्या अशा महामार्गाचा मुंबई ते बडोदा महामार्ग हा एक भाग आहे. मुंबई ते दिल्ली या महामार्गाचा मुंबई ते बडोदा हा शेवटचा टप्पा असून या टप्प्याचे काम महाराष्ट्रात सध्या वेगात सुरू आहे.

मुंबई ते बडोदा दरम्यानचा हा महामार्ग 440 किलोमीटर लांबीचा असून हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते बडोदा हे अंतर अवघ्या चार तासात कापता येणार आहे. सध्या हे अंतर कापण्यासाठी सात ते साडेसात तासांचा कालावधी लागतो. या महामार्गाचे काम दोन टप्प्यात सुरू असून यातील पहिला टप्पा म्हणजे बडोदा ते तलासरी आणि दुसरा टप्पा म्हणजे तलासरी ते मोरबे हे होय.

तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये  अ, ब आणि क असे तीन टप्पे करण्यात आलेले असून त्यातील टप्पा दोन अंतर्गत तलासरी ते विरार अशा 76.81 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे तीन पॅकेज मध्ये काम सुरू आहे. टप्पा दोन ब अंतर्गत विरार ते मोरबी असे 79.783 किमी लांबीचे काम सुरू असून हे काम चार पॅकेज मध्ये सुरू आहे. तर यातील टप्पा दोन क हा भोज ते मोरबे दुहेरी बोगद्याच्या कामाचा आहे.

 माथेरान डोंगरा खालून उभारले जात आहेत बोगदे

मुंबई ते बडोदा या एक्सप्रेस वेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या महामार्गावर दुहेरी बोगदे उभारण्यात येत असून यातील पहिला बोगदा हा अंबरनाथ मधील भोज ते पनवेल मधील मोरबे या दरम्यान असून त्याची लांबी 4.16 किलोमीटर आहे. तसेच रुंदी 21.45 मीटर असून 5.5 मीटर उंच असा हा दुहेरी बोगदा आहे.

माथेरान डोंगरांच्या खालून  हा दुहेरी बोगदा उभारला जात असून फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. यातील ४.४१ किलोमीटर भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे.

हे काम अतिशय कठीण असून यासाठी अत्याधुनिक असे एसटीएम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानानुसार या दुहेरी बोगद्याच्या दोन्ही बाजूने भुयारीकरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. साधारणपणे या दुहेरी बोगद्याचे काम सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन एनएचएआयच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

तसेच मुंबई ते बडोदा या एक्सप्रेस वे चे काम 17 टप्प्यात सुरू असून येथील दहा टप्प्यांचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यातील तलासरी ते मुंबई या टप्प्याचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याची प्लॅनिंग आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe