सध्या मुलांच्या परीक्षा सुरू असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. तसेच या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये सगळीकडे प्रचंड प्रमाणात तापमान वाढल्याने अंगाची लाही लाही करणारा उकाडा देखील जाणवत आहे. त्यामुळे या त्रस्त करणाऱ्या उकाड्यापासून काही कालावधी करिता तरी आराम मिळावा याकरिता अनेक जण राज्यातील आणि भारतातील थंड हवेच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत ट्रीप प्लान करतात.
तसेच काही व्यक्ती हे अध्यात्मिक दृष्टिकोनातून भारतातील धार्मिक पर्यटन स्थळांना देखील भेटी देतात. त्यामुळे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तुमचा देखील या उन्हाच्या सुट्ट्यांमध्ये आता वैष्णोदेवीच्या दर्शनाला जायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ट्रेनमधील गर्दी कमी व्हावी याकरिता रेल्वेच्या माध्यमातून उन्हाळी स्पेशल ट्रेन बऱ्याच मार्गांवर चालवण्यात येत आहेत. अगदी त्याचाच भाग म्हणून मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथून माता वैष्णोदेवी विशेष ट्रेन देखील चालवण्यात येणार आहे.
त्यामुळे तुम्हाला देखील वैष्णोदेवीच्या दर्शनाकरिता जायचे असेल तर तुम्ही या उन्हाळी स्पेशल ट्रेनमध्ये कन्फर्म सीट बुक करू शकतात. परंतु आधी तुम्हाला या ट्रेनचे वेळापत्रक माहीत असणे गरजेचे आहे.
वांद्रे टर्मिनस– माता वैष्णोदेवी समर स्पेशल ट्रेन वेळापत्रक
वांद्रे टर्मिनस ते माता वैष्णोदेवी कटरा एसी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 21 एप्रिल 2024 ते 30 जून 2024 दरम्यान दर रविवारी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी वांद्रे टर्मिनस इथून सुटेल व मंगळवारी सकाळी दहा वाजता ही ट्रेन माता वैष्णोदेवी कटरा स्थानकावर पोहोचेल.
तसेच परत येताना ट्रेन क्रमांक 09098 ही ट्रेन माता वैष्णोदेवी कटरा- वांद्रे टर्मिनस एसी सुपरफास्ट विशेष ट्रेन ही माता वैष्णोदेवी येथून तर मंगळवारी 23 एप्रिल 2024 रोजी रात्री नऊ वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि गुरुवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.
या स्पेशल ट्रेनचे थांबे
वांद्रे टर्मिनस ते माता वैष्णोदेवी विशेष ट्रेन ही दोन्ही बाजूंनी म्हणजे जाताना आणि येताना बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपुर, गंगापूर सिटी, मथुरा, दिल्ली, सफदरजंग, अंबाला कैंट, धंधारी कलान, जालंदर कॅन्ट, पठाणकोट आणि जम्मू तावी रेल्वे स्थानकावर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी तीन टायर आणि एसी चेअर कार कोच उपलब्ध असणार आहे.