सध्या दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले व जे विद्यार्थी आता उत्तीर्ण झाले आहेत ते आता पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लगबग करताना दिसून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने जर आपण बारावी या शैक्षणिक वर्षाचा विचार केला तर हे पुढील आयुष्यातील करिअरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे वर्ष असल्याने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व पालक हे सावधानतेने अभ्यासक्रमांची निवड करतात. कारण या कालावधीमध्ये जर निर्णय चुकला तर त्याचा संपूर्ण परिणाम हा संपूर्ण आयुष्यभर व्यक्तीला भोगावा लागतो.
तसेच महत्त्वाचे म्हणजे अनेक प्रकारचे अभ्यासक्रम सध्या उपलब्ध असल्यामुळे नेमक्या कोणत्या अभ्यासक्रमाला ऍडमिशन घ्यावे? याबाबत देखील बराच गोंधळ उडतो. त्यामुळे या लेखांमध्ये आपण विज्ञान शाखेतून पीसीबी घेऊन जे बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत यांच्याकरिता खास मेडिकल क्षेत्रातील महत्त्वाचा असलेला रेडिओलॉजी अभ्यासक्रमाबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.
रेडिओलॉजी क्षेत्रात करा करिअर
जे विद्यार्थी सायन्स शाखेतून पीसीबी घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले आहेत व त्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे तर असे विद्यार्थी रेडिओलॉजी या क्षेत्रामध्ये स्वतःचे करिअर सेट करू शकतात. सध्या बऱ्याच कॉलेजेस मध्ये रेडिओलॉजी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्याकरिता नीट(NEET) परीक्षेची आवश्यकता नसते व त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत चांगले गुण मिळालेले नसतील असे विद्यार्थी देखील रेडिओलॉजी मध्ये करिअर करू शकता.
रेडिओलॉजिस्ट म्हणजे नेमके काय किंवा त्याचे काय काम असते?
जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा एक्स-रे, सिटीस्कॅन तसेच पीईटी स्कॅन, अल्ट्रा साऊंड एमआरआय स्कॅन इत्यादी तंत्र वापरले जातात. या तंत्रांचा रेडिओलॉजिस्ट वापर करतात व रुग्णाचा रेडिओग्राफी अहवाल तयार करतात व त्यामुळे रुग्णाला असलेल्या नेमक्या आजाराचे अचूक निदान करता येते.
रेडिओलॉजि क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी कुठल्या अभ्यासक्रम आहेत महत्त्वाचे?
डिप्लोमा कोर्सेस
1- डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी- या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन ते अडीच वर्षाचा असतो.
2- डिप्लोमा इन रेडिओग्राफी- या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा असतो.
3- डिप्लोमा इन एक्स-रे टेक्निशियन – अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा असतो.
यामधील पदवी अभ्यासक्रम
1- बीएससी इन रेडिओलॉजी, रेडिओथेरपी- हा अभ्यासक्रम तीन वर्ष कालावधीचा असतो.
2- बीएससी इन मेडिकल( रेडिओ) इमेजिंग टेक्नॉलॉजी- हा अभ्यासक्रमचा कालावधी तीन वर्षाचा असतो व अधिक एक वर्ष इंटर्नशिप असते.
3- बीएससी मेडिकल लेबोरेटरी टेक्नॉलॉजी- या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे व अधिक सहा महिने इंटर्नशिप असते.
रेडिओलॉजी क्षेत्रामध्ये असलेले सर्टिफिकेट कोर्सेस
1- सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी( करियर इन रेडिओलॉजी)
2- सर्टिफिकेट इन रेडिओलॉजी असिस्टंट
3- सर्टिफिकेट इन डायग्नोस्टिक रेडिओग्राफी
कसा मिळतो प्रवेश?
समजा पदवी घेऊन जर उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर उमेदवाराला रेडिओलॉजी मध्ये एमएससी आणि त्यानंतर पीएचडी देखील करता येतो. रेडिओलॉजी अभ्यासक्रमाकरिता ऍडमिशन घ्यायचे असेल तर उमेदवारांची गुणवत्ता यादी काढली जाते किंवा उमेदवाराला संबंधित विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.
भारतातील नामांकित रेडिओलॉजी अभ्यासक्रम शिकवणारे महाविद्यालय
1- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरोसायन्सेस बेंगलोर
2- आरम्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे
3-डॉ. डी.वाय.पाटील यूनिवर्सिटी नवी मुंबई
4- ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली
5- पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंदिगड
रेडिओलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कुठे मिळते नोकरीची संधी
रेडिओलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रेडिओलॉजी टेक्निशियन, सिटीस्कॅन टेक्नॉलॉजिस्ट, एमआरआय टेक्नॉलॉजिस्ट, रेडिओलॉजी असिस्टंट, कार्डिओ व्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजिस्ट, रेडिओलॉजी नर्स, न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट आणि अल्ट्रासाउंड टेक्नॉलॉजी इत्यादी मध्ये नोकरी मिळू शकते. तसेच रेडिओलॉजी मधील एखादा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्या असल्यास संबंधित उमेदवाराला 30 ते 40 हजारापर्यंत पगार देखील मिळू शकतो व डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर 25 ते 40 हजारापर्यंत पगार मिळते.