बारावीनंतर सैन्य दलात अधिकारी होण्याची संधी! एनडीएमध्ये विद्यार्थ्यांना कसा मिळतो प्रवेश? वाचा ए टू झेड प्रक्रिया

national defence academy

सध्या बारावीचा निकाल 21 मे रोजी लागला असून आता पुढील करिअरच्या दृष्टिकोनातून विविध अभ्यासक्रम निवडण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ होताना आपल्याला दिसून येते. अनेक विद्यार्थी पुढील भविष्यातील करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले अभ्यासक्रमांची निवड करतात.

परंतु या व्यतिरिक्त काही विद्यार्थी असे असतात की त्यांना भारताच्या संरक्षण दलामध्ये भरती होऊन देशाची सेवा करायची असते व अशा विद्यार्थ्यांना एनडीएच्या माध्यमातून लष्कराच्या तिन्ही दलांसाठी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त करता येते.

भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांकरिता सक्षम अधिकारी घडावेत याकरिता 1955 यावर्षी पुण्यातील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएची स्थापना करण्यात आली व यामध्ये बारावीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. याची एक महत्वपूर्ण अशी प्रक्रिया असते व हे सगळे प्रवेश परीक्षेच्या टप्पे पार केल्यानंतरच विद्यार्थी एनडीएत सामील होऊ शकतो.

 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये कसा मिळतो प्रवेश?

भारतीय लष्कराच्या तिन्ही दलामध्ये चांगले व सक्षम अधिकारी घडावेत याकरता खडकवासला येथे एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली व यामध्ये बारावीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. दर सहा महिन्यांनी एनडीए तसेच नेव्हल अकॅडमीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रांच करिता 370 मुले व तीस मुली असे मिळून 400 विद्यार्थ्यांची पूर्ण देशातून निवड होते.

या निवड प्रक्रियेकरिता देशपातळीवर एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. यावर्षीची पुढील प्रवेश परीक्षा एक सप्टेंबर 2024 रोजी होणार असून त्यासाठीची जाहिरात 15 मे रोजी यूपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध देखील करण्यात आलेली आहे.

ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींची जन्मतारीख 2 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2009 दरम्यान असेल त्यांना  ४ जून पर्यंत यूपीएससीच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

 कशी असते एनडीएमध्ये प्रवेशाची पद्धत?

एनडीएत प्रवेश घ्यायचा असेल तर त्याकरिता घेण्यात येणारी लेखी परीक्षा ही खूप महत्त्वाचे असते व ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते. या परीक्षेमध्ये अडीच तासांचे दोन पेपर असतात व यातील पहिला पेपर हा गणिताचा असतो व तो एकूण 300 मार्कांचा असतो. यातील दुसरा पेपर हा जनरल अबिलिटी असतो तो एकूण सहाशे मार्कांचा असतो.

दुसऱ्या पेपरमध्ये 200 गुणांचा इंग्रजीचा तर 400 गुणांचा फिजिक्स, केमिस्ट्री तसेच जनरल सायन्स, भूगोल, ताज्या घडामोडी इत्यादी विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

महत्वाचे म्हणजे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. ही परीक्षा झाल्यानंतर या परीक्षेचा निकाल तीन महिन्यांनी जाहीर केला जातो व तो  upsc.gov.in या वेबसाईटवर देखील तुम्ही पाहू शकता.

 लेखी परीक्षा नंतर काय?

लेखी परीक्षा झाल्यानंतर यामध्ये जे विद्यार्थी विद्यार्थिनी उत्तीर्ण होतात त्यांना पुढील तीन महिन्यांमध्ये एसएसबी मुलाखतीसाठी बोलावली जाते. ही मुलाखत तब्बल पाच दिवस चालते व त्यामध्ये दोन टप्पे असतात. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा संपूर्णपणे कस लागतो व यातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे मेडिकल करून फायनल लिस्ट डिक्लेअर केली जाते.

यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड होते त्यांना तीन वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते व हे विद्यार्थी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी घेतात व त्यात उत्तीर्ण होतात.

यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना संरक्षण क्षेत्रात( आर्मी/नेव्ही/एअरफोर्स) त्यांना पुढील प्रशिक्षण दिले जाते व हे प्रशिक्षण दिल्यानंतर भारतीय संरक्षण दलाच्या सेवेमध्ये अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते व त्यांना कमीत कमी एक लाख रुपये प्रति महिना इतका पगार मिळतो. एनडीएचे संपूर्ण शिक्षणाचा खर्च तसेच निवास व भोजन हे संपूर्ण मोफत असते.