शितल गायकवाड यांची अधिकारी पदाला गवसणी! एसटीचा प्रवास आणि एसटीत नोकरी करत केली एमपीएससीची तयारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समाजामध्ये बरेच व्यक्ती अतिशय बिकट परिस्थिती असताना देखील त्या परिस्थितीवर अपार कष्ट करून आणि मेहनतीच्या जोरावर दणदणीत विजय मिळवताना दिसून येतात. हे तेव्हाच घडू शकते जेव्हा आपण जे काही ध्येय ठरवलेले असते त्या ध्येयाने पूर्ण वेडे होणे व त्याकरिता  वाटेल ते कष्ट, जिद्दीने पुढे जाण्याची उर्मी आणि कितीही अनंत अडचणी आल्या तरी त्या पार करून ध्येय गाठण्याची उर्मी असते तेव्हाच हे घडते.

जेव्हा व्यक्तीमध्ये  हे सगळे गुण भरभरून भरलेले असतात तेव्हा आर्थिक व सामाजिक परिस्थिती कशीही राहिली तरी व्यक्ती यशस्वी होतोच. अगदी हीच परिस्थिती आपल्याला छत्रपती संभाजीनगर एसटी महामंडळाच्या  कन्नड आगारात सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या शितल रमेश गायकवाड यांची सांगता येईल. म्हणून आपण शितल गायकवाड यांचीच यशोगाथा या लेखात बघणार आहोत.

 शितल गायकवाड यांची अधिकारी पदाला गवसणी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अगदी पत्र्याच्या घरामध्ये राहणाऱ्या व घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असताना देखील परिस्थितीशी दोन हात करत शितल गायकवाड यांनी एसटी महामंडळामध्ये नोकरी मिळवली व याकरिता दररोज एसटी मधून प्रवास करत त्या नोकरीसाठी जात होत्या. परंतु या प्रवासामध्येच त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास देखील केला व आता परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत त्यांची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग सहाय्यक संचालक पदी निवड झाली. हा प्रवास तसा साधा सोपा नव्हता.

शितल रमेश गायकवाड या छत्रपती संभाजी नगर विभागातील कन्नड आगारांमध्ये सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते छत्रपती संभाजी नगर येथील राजनगर,मुकुंदवाडी या परिसरामध्ये राहतात व त्यांचे वडील हे टेलरिंग व्यवसाय करतात. परंतु परिस्थितीला न हरता परिस्थितीशी मुकाबला करत त्यांनी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले व त्यानंतर बीई व ईएमई असे उच्च शिक्षण पूर्ण केले व 2018 मध्ये एसटी महामंडळात सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक म्हणून रुजू झाल्या. सध्या त्या कन्नड आगारांमध्ये कार्यरत आहेत.

याकरिता त्यांना छत्रपती संभाजी नगर वरून कन्नड या ठिकाणी दररोज एसटीने ये जा करावे लागत होते. एसटी महामंडळाची ही नोकरी त्यांच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची ठरली व एक भक्कम आधार त्यांना मिळाला. परंतु यावरच समाधान न मानता भविष्य आर्थिक दृष्ट्या अधिक समृद्ध करण्याकरिता भविष्याचा वेध घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली व नोकरीसाठी कन्नडला येताना व जाताना देखील त्या प्रवासामध्ये अभ्यास करत असत.

अभ्यास करत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सहा मे रोजी परीक्षा झाली व 22 ऑगस्ट रोजी मुलाखत झाली व या परीक्षेचा 31 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर झाला. या निकालामध्येच त्यांनी घवघवीत यश मिळवत त्यांची निवड औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग सहाय्यक संचालक पदी झाली.

यावरून आपल्याला दिसून येते की आर्थिक परिस्थिती कितीही हलाकीची राहिली परंतु ध्येय पूर्ण करण्यासाठी जर आपल्या जिद्द असेल तर आपण सहजपणे परिस्थितीवर मात करत आपले ध्येय पूर्ण करू शकतो.