कुठलीतरी गोष्ट आयुष्यामध्ये मिळवायची असेल तर त्याकरिता तुमची आर्थिक परिस्थिती आडवी येत नाही. फक्त तुमच्याकडे तुम्ही ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत, प्रयत्नांमधील सातत्य, ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द, कशीही परिस्थिती आली
तरी त्या परिस्थितीशी दोन हात करत त्यावर मात करून पुढे जाण्याची उर्मी इत्यादी गुण असतील तर आर्थिक परिस्थिती देखील तुमच्या पुढे नतमस्तक होते व तुमचा यशाचा मार्ग मोकळा करते. याच मुद्द्याला धरून जर आपण गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या मुधोली चक येथील सुरज कोडापे या विद्यार्थ्यांची यशोगाथा पाहिली तर ती या मुद्द्याला साजेशी आहे.
सुरज कोडापेची यशोगाथा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या मुधोली चक येथील रहिवासी असलेले रमेश कोडापे यांच्याकडे अवघी दीड एकर शेती असून त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी, दोन मुली व एक मुलगा अशा पाच जणांचा समावेश आहे. यापैकी त्यांचा मुलगा हा अभ्यासामध्ये पहिल्यापासून हुशार होता.
परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असल्यामुळे आणि घरच्या दीड एकर शेतीतून आवश्यक असलेले आर्थिक उत्पन्न मिळत नसल्यामुळे उदरनिर्वाह करिता आई-वडील मजुरी म्हणून काम करायचे. शेती परवडत किंवा शेतीमधून उदरनिर्वाह पुरते देखील उत्पन्न येत नसल्यामुळे रमेश कोडापे यांनी गावातीलच रेशन दुकानदाराकडे काम करायला सुरुवात केली.
या कामाच्या माध्यमातून घराला लागणाऱ्या धान्याचा तर प्रश्न मिटला परंतु चार पैसे देखील त्यांना मिळायचे. या सगळ्या जीवन जगण्याच्या संघर्षामध्ये मात्र त्यांनी त्यांचा मुलगा सुरज हा हुशार असल्यामुळे त्याला शिकवण्याचे ठरवले. त्यामध्ये वडिलांनी मजुरी काम करून घर खर्च भागवला तर आईने स्वतःची हाऊस बाजूला ठेवून दागिने मोडले व सुरज च्या शिक्षणासाठी त्याचा वापर केला.
आई वडिलांची ही इच्छा किंवा चिकाटी पाहून सुरजने देखील चांगला अभ्यास केला. सुरजची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर सुरुवातीचे त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले व पुढे चामोर्शी व भेंडाळा येथील शाळेत त्यांनी शिक्षण घेतले व नंतर जवाहर नवोदय विद्यालय घोट या ठिकाण बारावी पूर्ण केली.
सुरज अभ्यासामध्ये हुशार होता हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या जीवनातील एक उदाहरण घेता येईल. सुरजला जेव्हा भूगोल विषयांमध्ये शंभर पैकी 99 मार्क मिळाले होते तेव्हा त्यावेळच्या केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये सुरजला पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेले होते
व यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील ज्या 120 विद्यार्थ्यांशी चर्चा साधली होती त्या विद्यार्थ्यांमध्ये सुरज कोडापे यांचा देखील समावेश होता. त्यानंतर पुणे येथे राज्यशास्त्र विषयातून त्यांनी पदवी मिळवली व नागपूर विद्यापीठातून पत्रकारितेत मास्टर पदवी देखील प्राप्त केली. तसेच सुरजला त्याची मोठी बहीण प्रियंका देवतळे यांच्याकडून देखील शिक्षणासाठी पाठबळ मिळाले.
अशाप्रकारे मिळवले यश
या सगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमीत सुरजला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची होती. परंतु त्याच्याकडे शिकवणी करिता पैसे नव्हतं. अशावेळी त्याच्या आईने काही असलेले दागिने विकले व पैशांची जुळवाजुळव करून सुरजला क्लासेससाठी पैसे दिले. परंतु यामध्ये पहिल्या प्रयत्नात त्याला यश आले नाही. परंतु त्यांने हार न मानता जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला.
दरम्यानच्या कालावधीत 2021 मध्ये उपनिरीक्षक पदाच्या 376 जागांसाठी जाहिरात निघाली त्याकरिताचे पूर्व परीक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये झाली व मुख्य परीक्षेत जुलै 2022 मध्ये पार पडली. आवश्यक शारीरिक चाचणी नोव्हेंबर 2023 मध्ये झालेली होती व मुलाखत मार्च 2024 मध्ये पार पडली. परंतु न्यायालयीन प्रकरणामुळे अंतिम निकाल लागण्यासाठी खूप दिवस वाट पहावी लागली.
परंतु अखेर तो दिवस आला व 10 एप्रिल 2024 ला या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. लागलेला निकाल पाहून सूरजच्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू तरळले. कारण सूरजने एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक 2021 परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला.