अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांची कर्जतहून सातारा येथे बदली झाली आहे. त्यांना उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळाली आहे. अर्चना नष्टे यांनी कर्जतच्या उपविभागीय अधिकारी म्हणून अनेक वर्षे काम पाहिले होते.

आता त्यांना सातारा येथे उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक ९ येथील रिक्त पदावर नियुक्ती मिळाली आहे. ९ ऑगस्ट रोजी त्या कर्जत येथून कार्यमुक्त होत आहेत.

प्रांताधिकारी अर्चना नष्टे या `लेडी सिंघम` म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अनेक धाडसी कारवाया केल्या आहेत. त्या २०१४ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण आहेत.

यापूर्वी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे परिविक्षाधीन प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले असून, जून २०१७ साली त्या कर्जतच्या प्रांताधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या.

जामखेडची कोरोना साखळी तोडण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. आदर्श प्रांताधिकारी हा सन्मान मिळविणाऱ्या त्या जिल्ह्यातील पहिल्या आहेत. त्यांचे वडील सेवानिवृत्त केंद्र शिक्षक आणि आई गृहिणी आहे.