नगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादच खुळा! 1 एकर खरबूज लागवडीतून घेतले तब्बल साडेतीन लाखांचे उत्पन्न, एकरी मिळवले 16 ते 18 टन उत्पादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या शेती खूप मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जात असल्यामुळे हवामान बदलावर मात करत बरेच शेतकरी आता वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीतून चांगला आर्थिक नफा मिळवत आहे. शेतीत आलेल्या तंत्रज्ञानाचा अगदी कौशल्यपूर्ण वापर करून भरघोस उत्पादन घेण्यामध्ये शेतकरी आता तरबेज होत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

यावर्षी जर आपण बघितले तर संपूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळाच्या छायेत आहे. परंतु तरीदेखील बऱ्याच शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या थेंबा थेंबाचा पुरेपूर वापर करत विविध प्रकारचे पिकांचे उत्पादन मिळवले आहे. सध्या काही वर्षापासून शेतकऱ्यांच्या फळबाग आणि भाजीपाला लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

त्यातल्या त्यात उन्हाळ्याच्या कालावतीमध्ये बरेच शेतकरी आता कलिंगड आणि खरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणावर करत असून त्या माध्यमातून चांगला आर्थिक नफा देखील मिळवत आहेत.

याच मुद्द्याला धरून जर आपण नगर जिल्ह्यात असलेल्या घुगलवडगाव येथील शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने गेल्या सात ते आठ वर्षापासून खरबूज लागवडीत सातत्य ठेवले असून या हंगामामध्ये एका एकर खरबूज लागवडीतून तीनच महिन्यात तब्बल साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे व याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 एका एकर खरबूज लागवडीतून घेतले साडेतीन लाखांचे उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नगर जिल्ह्यात असलेल्या घुगलवडगाव येथील आबासाहेब विनायक लोखंडे हे एक प्रगतिशील शेतकरी असून त्यांनी या वर्षी उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करत एका एकर क्षेत्रामध्ये खरबूज पिकाची लागवड केली व या माध्यमातून तीन महिन्यांमध्ये तीन लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

आबासाहेब लोखंडे हे गेल्या सात ते आठ वर्षापासून दरवर्षी खरबूज पिकाची लागवड करत असून त्यासोबतच त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये ऊस तसेच कांदा इत्यादी पिकांची लागवड देखील करतात. परंतु या पिकांव्यतिरिक्त खरबूज लागवडीचे त्यांचे व्यवस्थापन वाखाणण्याजोगे आहे. आबासाहेब लोखंडे हे प्रत्येक वर्षी साधारणपणे दोन टप्प्यांमध्ये खरबुजाची लागवड करतात.

पाण्याची बचत करत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून खरबूज पिकाचे चांगले उत्पादन ते मिळवतात व या वर्षी देखील उपलब्ध पाण्याचा वापर ठिबकच्या माध्यमातून करून त्यांनी खरबूज पिकाचे चांगले उत्पादन मिळवले असून आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळवले आहे.

जर आपण या परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर ते भाजीपाला उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर घेतात. परंतु या परिसरामध्ये प्रथमच आबासाहेब लोखंडे यांनी खरबूज लागवडीला सुरुवात केली. परंतु टरबूज या पिकावर खूप वेगाने कीड व रोगांचा प्रादुर्भाव होतो व त्यामुळे खरबूज पिकाचे व्यवस्थापन करणे तितके सोपी गोष्ट नाही.

परंतु आबासाहेब लोखंडे यांनी या सगळ्या समस्येवर मात करत गेल्या सात ते आठ वर्षापासून खरबूज लागवड यशस्वी करून त्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवलेले आहे. तसे पाहायला गेले तर ते साधारणपणे प्रत्येक वर्षाला पाच एकरावर खरबूज लावतात. परंतु यावेळेस दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी कमी होते व त्यामुळे फक्त एक एकर क्षेत्रामध्ये त्यांनी खरबूज पिकाचे  नियोजन केले.

विशेष म्हणजे त्यांनी यामध्ये कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक व रासायनिक खतांचा वापर केला नसून संपूर्ण सेंद्रिय खतांचा वापर करून खरबुजाचे उत्पादन मिळवले आहे. साधारणपणे 2017 ते 18 या कालावधीमध्ये त्यांनी अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये खरबुज लागवडीला सुरुवात केली होती व त्यामध्ये सातत्याने वाढ करत पाच एकर पर्यंत ते आता खरबूज लागवड करतात.

परंतु पाण्याची कमतरता असल्याने या वर्षी एका एकर क्षेत्रावर खरबूज लागवड करून त्यांनी एकरी 16 ते 18 टन सरासरी उत्पादन मिळवले व त्या माध्यमातून तीनच महिन्यामध्ये तीन लाख साठ हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न देखील मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.