कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राबवलेल्या मोहिमेचा राज्यातील तब्बल 13 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना झाला ‘हा’ फायदा! वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कृषी क्षेत्रासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात व या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. केंद्र सरकारच्या योजनांपैकी पीएम किसान योजना ही सर्वाधिक यशस्वी ठरलेली आणि महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे.

आपल्याला माहितआहेच की या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये विभागून देण्यात येतो. अगदी त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून देखील नमो किसान महासन्मान योजना जाहीर करण्यात आलेली असून या माध्यमातून देखील महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येणार आहेत.

राज्याच्या या योजनेसाठी पात्रतेचे निकष पी एम किसान योजनेच्या पात्रतेच्या निकषांसारखेच आहेत. म्हणजेच केंद्र सरकारच्या पीएम किसानयोजने करिता जे शेतकरी पात्र आहेत तेच लाभार्थी हे नमो किसान महासन्मान योजनेकरिता देखील पात्र आहेत. परंतु आपल्याला माहित आहेच की पी एम किसान योजनेमध्ये काही अपात्र लाभार्थ्यांनी देखील लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर या योजनेच्या नियमांमध्ये अनेक प्रकारचे बदल करण्यात आलेले होते.

त्यामध्ये ई केवायसी ही बंधनकारक करण्यात आलेली होती. तसेच इतर बाबी देखील यामध्ये महत्त्वाच्या करण्यात आलेल्या होत्या व बऱ्याच शेतकऱ्यांनी ई केवायसीची पूर्तता न केल्यामुळे बरेच शेतकरी पीएम किसान च्या फायद्यापासून मुकले होते. परंतु या कामी आता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन मोहीम राबवली व यामुळे राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन्ही योजनांसाठी कायमस्वरूपी पात्र ठरणार आहेत.

 काय होती ही मोहीम?

धनंजय मुंडे यांनी राज्याच्या कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला व कृषी, महसूल आणि भुमिअभिलेख या तीनही महत्त्वाच्या विभागांचा एकमेकांशी समन्वय साधला व त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण करणे तसेच भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, बँक खाते हे आधारशी लिंक करणे इत्यादी बाबींकरिता मोहीम हाती घेतली व या बाबींची पूर्तता करून 13 लाख 45 हजार राज्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र करून घेतले.

महाराष्ट्राचा विचार केला तर पी एम किसान योजनेचे 95 लाख शेतकरी पात्र ठरले. परंतु वरील उल्लेख केलेल्या अटींची पूर्तता शेतकऱ्यांनी न केल्यामुळे तेराव्या आणि चौदावे हप्त्यांमध्ये 95 लाख पैकी केवळ 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना पीएम किसान चा लाभ मिळाला. पंधराव्या हप्त्याकरिता आता ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

त्यामुळे पीएम किसान आणि नमो महासन्मान योजनेला पात्र शेतकरी मुकु नयेत याकरिता ही मोहीम राबवण्यात आली. कृषी विभागाने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून विशेष मोहीम हाती घेतल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कृषी मित्र यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कॅम्प घेतले व बांधावर जाऊन 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांचे ईकेवायसी प्रमाणीकरण तसेच बँक खाते आधारशी लिंक करणे, भूमी अभिलेख नोंदी अपडेट करून घेणे इत्यादी पूर्तता करून घेतल्या.

या मोहिमेमुळे आतापर्यंत नऊ लाख 58 हजार शेतकऱ्यांचे ई केवायसी पूर्ण करण्यात आलेले असून 2.58 लाख शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करणे तसेच 1.29 लाख शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख नोंदी अध्यायावत करणे इत्यादी कामे पूर्ण करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता पीएम किसान योजना आणि नमो किसान महासन्मान योजनेसाठी जास्तीत जास्त शेतकरी पात्र ठरणार आहेत.