साहेब, सांगा आता शेती करायची कशी ! शेतीपंपासाठी आठ तासही वीज मिळेना ; मग पीक कशी वाचवायची, पाण्याविना शेतीचा तरी शोध लावा….

Agriculture News : शेती म्हटलं की वीज, पाणी आणि जमीन या तीन गोष्टी अति महत्त्वाच्या. पिकांच्या योग्य वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी पिकाला वेळेवर पाणी मिळणे अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पिक वाढीसाठी खतांची पूर्तता देखील वेळेवर झाली पाहिजे.

आता पाण्यासाठी तसेच खतांची पूर्तता करण्यासाठी किड नियंत्रण, रोग नियंत्रण करण्यासाठी फवारणी करणे हेतू विजेचे नितांत आवश्यकता असते. मात्र नांदेड जिल्ह्यात शेतकरी बांधवांना आठ तास ही सुरळीत वीज मिळत नसल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत रब्बी हंगामातील पिकांना विहिरीत पाणी असून देखील शेतकरी बांधवांना देता येत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे खरीप हंगाम जास्तीच्या पावसामुळे हातून गेला तर आता रब्बी हंगाम पाणी असूनही पाणी पिकांना न देता येण्यामुळे हातचा जाईल की काय अशी भीती शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असून शेतकरी बांधव शेती पंप जोडणीचे कामे करत आहेत. मात्र शेती पंप जोडूनही पाणी कसे देणार त्यासाठी विजेची आवश्यकता असते, आणि नांदेड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वीजच गायब आहे.

शेतकरी बांधवांना शेतीपंपासाठी आठ तास विजेचा पुरवठा करण्यासाठी देखील महावितरण अक्षम ठरले आहे. त्यामुळे 2022 पर्यंत शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचा हा शासनाचा मानस केवळ कागदावर मर्यादित राहिला असून मुळात शासनाची यंत्रणा, शासनाच्या कामकाजाच्या पद्धती, शासन अंतर्गत येणारे वेगवेगळे महामंडळच अक्षम असल्याने शेतकरी सक्षम बनने फारच दुर्गामी आणि जवळपास अशक्य बाब भासू लागली आहे.

सध्या नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पीकपेरणी करण्यासाठी लगबग करत आहे. जिल्ह्यात आजवर एक लाख हेक्टर वर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. गहू हरभरा रब्बी ज्वारी आणि करडई या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जात आहे. अशा परिस्थितीत या पिकांना पाणी भरावे लागणार आहे. शिवाय खरीप हंगामातील तूर आणि कपाशी हे पिके देखील अजून वावरात उभी आहेत. यांना देखील पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र विजेअभावी या उभ्या पिकांना देखील पाणी देता येणे अशक्य बनले आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की महावितरणकडून नांदेड जिल्ह्यासाठी आठ दिवस दिवसा तर आठ दिवस रात्री असा विजेचा पुरवठा केला जात आहे. शेतीपंपासाठी दिली जाणारी ही वीज निश्चितच अपुरी आहे. मात्र आठ तास तर आठ तास त्यात अजून वीज सुरळीतपणे टिकत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी थ्री फेज वीज टिकत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मते एका तासात आठ ते दहावेळा वीज ट्रिप होत आहे. अशा परिस्थितीत पिकांना पाणी देता येणे अशक्य बनले असून रब्बी हंगामातील पिके पाणी असून देखील जळून खाक होतील की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटतं आहे.

यामुळे रब्बी हंगामातील उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी जिल्हा प्रशासनाने महावितरणाला निर्देश देऊन निदान आठ तास का होईना पण सुरळीत वीज पुरवठा शेतीपंपासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.