अहमदनगरच्या विद्यार्थ्यांची कमाल; शेतकरी बापाचे कष्ट पाहून सुचली भन्नाट कल्पना, तयार केले अनोखे फवारणी यंत्र, एका तासात 4 एकरावर फवारणी, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : पूर्वी भारतात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा फारसा वापर होत नव्हता. सर्व कामे शेतकऱ्यांना स्वतः करावी लागत असत. मजूर किंवा मग कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने शेतीची सर्व कामे केली जात असत. अगदी पूर्व मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंत सर्वकामे मनुष्यबळाचा वापर करून करावी लागत असत. शेतीमध्ये फक्त बैलांचा वापर होत होता.

आता मात्र तंत्रज्ञानाने फार प्रगती केली आहे. पूर्व मशागती पासून ते फवारणी पर्यंत आणि आंतरमशागतीपासून ते पिक काढणीपर्यंत सर्वच कामे यंत्रांच्या साह्याने होत आहेत. मात्र शेती मधली यंत्रे अजूनही महाग आहेत. यामुळे स्वस्तात चांगल्या यंत्रांची निर्मिती होणे आवश्यक आहे.

अशातच आता अहमदनगरमधून एक अतिशय प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या एका शालेय विद्यार्थ्यांने आपल्या शेतकरी बापाचे कष्ट पाहून एक अनोखे शेती यंत्र तयार केले आहे.

हे यंत्र फवारणीसह विविध कामे करण्यास सक्षम आहे. वास्तविक, कोणत्याही पिकात फवारणी करायची असेल तर शेतकऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते. यामुळे शेतकऱ्यांचा अधिक वेळ वाया जातो शिवाय अधिकचे कष्ट घ्यावे लागतात.

अलीकडे ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी केली जाऊ लागली आहे. फवारणीसाठी आता ड्रोनचा देखील वापर होत आहे. मात्र ही यंत्र महाग आहेत. यामुळे हे यंत्र खरेदी करणे प्रत्येकच शेतकऱ्याला शक्य नाही.

यामुळे अहमदनगर येथील काकासाहेब म्हस्के विद्यालयातील नववीत शिकणाऱ्या शेतकरी पुत्राने अनोखे शेती यंत्र तयार केले आहे. प्रथमेश वाळके असे या शेतकरी पुत्राचे नाव आहे.

प्रथमेशचे वडील पारंपारिक पद्धतीने शेती करत होते. यामुळे त्याने त्याच्या वडिलांचे कष्ट जवळून पाहिले होते. दरम्यान एका अपघातात त्याच्या वडिलांचे निधन झाले. कोवळ्या वयातच पितृछत्र हरपले.

परिणामी शेतीची जबाबदारी प्रथमेशच्या खांद्यावर आली. शाळेत असतानाच शेतीची जबाबदारी आली. शिवाय वडिलांनी केलेल्या कष्टाची त्याला जाण होती. यामुळे त्याने कागदावर एक आराखडा तयार केला.

यानुसार त्याने एक अद्भुत शेती यंत्र तयार केले आहे. हे शेती यंत्र अवघ्या एका तासात चार एकर जमिनीवर फवारणी करण्यास सक्षम आहे. एवढेच नाही तर या यंत्राच्या माध्यमातून कोळपणी, खत भरणे, दूध काढणे असे अनेक कामे केली जाऊ शकतात.

दरम्यान नगर शहरात प्रथमच आयोजित झालेल्या जिल्हास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात या यंत्राचे सादरीकरण झाले आहे. यावेळी प्रथमेश याने तयार केलेल्या या शेती यंत्राची अनेकांनी दखल घेतली आहे. या संशोधनासाठी त्याच्यावर चहूबाजूने कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.