Animal Hit stroke:- सध्या संपूर्ण देशात आणि राज्यात प्रचंड प्रमाणात उष्णता असून या उष्णतेने प्रत्येकजण हैराण झालेले आहेत. या वाढत्या उष्णतेमुळे ज्याप्रमाणे माणसांना त्रास होऊ शकतो अगदी त्याच पद्धतीचा त्रास हा पाळीव प्राणी जसे की गाई, म्हशी आणि शेळ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर होतो.
जर या वाढत्या उष्णतेच्या कालावधीमध्ये जर योग्य काळजी घेतली नाही तर जनावरांच्या आरोग्याच्या विषयी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात व त्यातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जनावरांना उष्माघात होऊ शकतो. तसेच उन्हाळ्याच्या कालावधीत दुभत्या जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
नाहीतर दूध उत्पादन घटण्याची दाट शक्यता असते. परंतु यामध्ये जनावरांमध्ये होणारा उष्माघात हा सर्वात गंभीर असतो व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे म्हशीमध्ये उष्माघात होण्याचे प्रमाण जास्त आढळून येते. कारण त्यांच्या कातडीवरून सूर्यकिरण परावर्तित होत नाही व कातडीत ते शोषले जातात.
दुसरे म्हणजे म्हशीमध्ये घामग्रंथी खूप कमी असतात. तसेच संकरित गाईंमध्ये देखील उष्माघात होण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. हायपोथोलेमस हे मेंदूमध्ये असून त्या माध्यमातून जनावरांमधील तापमान नियंत्रित करण्याचे काम केले जाते. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जनावरे शरीराचे तापमान नियंत्रित करतात परंतु मर्यादेच्या बाहेर जर तापमान गेले तर जनावरांना त्याच्यावर नियंत्रण मिळवणे अशक्य होते व त्यामुळे उष्माघात होतो.
या कारणांमुळे होतो उष्माघात
उष्माघात होण्याची कारणे जर बघितली तर प्रामुख्याने वातावरणामध्ये झालेली तापमानातील वाढ, जनावरांना शरीराचे तापमान नियंत्रित न करता येणे, शरीरातील उष्णता बाहेर न पडणे व इतर संसर्गजन्य आजार यामुळे प्रामुख्याने उष्माघात जनावरांना होऊ शकतो.
जनावरांमध्ये दिसून येतात उष्माघाताची ही लक्षणे
उष्माघात झालेली जनावरे पाणी कमी पितात व चारा देखील कमी खातात, डोळे खोल जातात व नाकपुडी कोरडी पडणे, नाडीची गती आणि हृदयाची गती वाढणे, श्वास घ्यायची गती वाढणे व उघड्या तोंडाने श्वास घेणे, बैल जेव्हा काम करून येतात तेव्हा खूप लवकर थकल्यासारखे वाटणे, आतड्यांचे हालचाल खूप कमी होणे,
पचनक्रियेत बिघाड व शेण घट्ट होणे, लघवी गडद पिवळ्या रंगाची होणे व त्वचा कोरडी व निस्तेज पडणे, दूध उत्पादनात घट येणे, वाढत्या वयाचे वासरे असतील तर त्यांच्या वाढीवर परिणाम होणे, गाय- म्हैस गाभण न राहणे, जनावरांची प्रजनन क्षमता कमी होणे, दोन वेतातील अंतर वाढणे व जनावरे लवकर माजावर न येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
या उपायोजना करा आणि जनावरांमधील उष्माघात टाळा
1- प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेच्या वेळी शेतामध्ये किंवा गोठ्याच्या अवतीभवती आंबा, वड किंवा पिंपळासारखे मोठे झाड असेल तर त्या झाडाच्या सावलीत जनावरांना बांधावे. तसेच चाऱ्याचे व्यवस्थापन करताना सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये जनावरांना चरायला सोडावे.
2- जनावरांना ज्या खाद्यामधून चांगली ऊर्जा मिळेल असे खाद्य खायला द्यावे व खाद्यात अ,ड,ई,क इत्यादी जीवनसत्वे असतील ते खाद्य द्यावे. तसेच जनावरांना 24 तास थंड पाणी प्यायला द्यावे दिवसातून चार ते पाच वेळा ते पाणी पाजावे. जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचे व्यवस्थापन करताना त्यामध्ये चवळी किंवा बरसिम घास आणि हिरव्या मक्याचा वापर करावा.
3- तसेच गोठे हे उत्तर-दक्षिण असावे. अशा पद्धतीने गोठ्याची रचना असेल तर गोठ्यामध्ये थेटपणे सूर्यप्रकाश येणार नाही. तसेच गोठ्यामध्ये कायम खेळती हवा राहील याची काळजी घ्यावी. गोठ्याच्या अवतीभवती चांगली सावली येईल अशा पद्धतीने झाडांची लागवड करावी. गोठ्यातील तापमान आणि आद्रता किती आहे हे जाणून घेण्यासाठी थर्मामीटर असावे.
4- गोठ्यामध्ये शक्य असल्यास फॉगर्स, पंखे इत्यादी उपकरणे लावावीत व जेणेकरून यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊ शकते. नाहीतर जनावरांच्या अंगावर थंड पाण्यात भिजवून सुती कपडे किंवा पोते टाकावी.
5- जास्त तापमानामुळे जनावरांची हालचाल कमी होऊन पचनसंस्थेत बिघाड होऊ शकतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारावी याकरिता जनावरांना प्रत्येक दिवसाला एक ते दोन लिटर ताक पाजावे. तसेच पाण्याच्या माध्यमातून क्षार द्यावेत. याकरिता पाच लिटर पाण्यामध्ये 25 ते 50 ग्रॅम गूळ, दहा ग्रॅम मीठ आणि पाच ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे.