जमिनीचा एक एक फूट जागेचा उत्पन्नासाठी कसा करावा वापर? हे जर शिकायचे असेल तर वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कृषी क्षेत्रामधील आधुनिक तंत्रज्ञान तसेच विविध यंत्रांचा वापर, पारंपारिक पिकांच्या  जागी भाजीपाला तसेच फळबागांची लागवड त्यामुळे आता शेतकरी शेतीमधून चांगल्या प्रकारे आर्थिक नफा सध्या मिळवत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आता तुमच्याकडे कमीत कमी जरी शेती असेल तरी तुम्ही तंत्रज्ञानाची मदत आणि कल्पकता, व्यवस्थापनाच्या जोरावर भरघोस उत्पादन मिळवू शकतात.

अगदी एक ते दोन हेक्टर क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे उत्पन्न घेणारे शेतकरी आपण बघतो. परंतु हे साध्य करत असताना त्यांचे शेतीमधील कष्ट, नेमके व्यवस्थापन आणि कल्पकता या जोरावर त्यांना त्या गोष्टी शक्य होतात.

अशाच प्रकारे जर आपण नाशिकला जवळ असलेल्या दरी या गावच्या  अशोक पिंगळे या शेतकऱ्याच्या शेतीची पद्धत पाहिली तर जवळपास दोन हेक्टर क्षेत्रामध्ये हा शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतो. नेमका या शेतकऱ्याचा शेतीचा पॅटर्न कसा आहे? याबद्दलची माहिती आपण थोडक्यात बघू.

 अशोक पिंगळे यांचा शेतीचा पॅटर्न कसा आहे?

नाशिक शहराच्या जवळ असलेल्या दरी या गावचे अशोक पिंगळे त्यांच्याकडे दोन हेक्टर जमीन असून त्या माध्यमातून ते लाखो रुपयांचे उत्पन्न घेतात. आपण त्यांची शेती क्षेत्रातील एकंदरीत सुरुवात पाहिली तर त्यांनी दोन हेक्टर पडीक जमीन विकत घेतली होती व त्यामध्ये अगोदर द्राक्ष बाग लावला होता. परंतु त्या शेतीची परिस्थिती द्राक्ष बागेकरिता अनुकूल नसल्यामुळे त्यांना अपेक्षित असा फायदा या द्राक्ष बागेतून मिळाला नाही.

परंतु यामध्ये त्यांनी निराश न होता भाजीपाला शेतीकडे वळण्याचे ठरवले व त्यासोबतच शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व पोल्ट्री व्यवसाय करायचे ठरवले. यामध्ये त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडून अनुदानावर दहा शेळ्यांचा गट मिळवला. त्यासोबतच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन दोन वर्षांपूर्वी रोपवाटिका देखील सुरू केली. या  त्यांच्या नर्सरीमध्ये तयार झालेल्या आंब्याची रोपे अगोदर शेताच्या बांधांवर लावली.

म्हणजे शेताचे बांध सुद्धा त्यांनी मोकळी ठेवले नाहीत. तसेच पोल्ट्री व्यवसाय उभारताना जेव्हा दोन पोल्ट्री शेड उभारल्या तेव्हा त्यामधील मोकळ्या जागेत चारा पीक घ्यायचे ठरवले. परंतु जर चारा पीक घेतले तर त्या ठिकाणी उंदरांचा सुळसुळाट वाढेल व पोल्ट्रीला त्रास होईल म्हणून त्यांनी हा प्लान बदलला. परंतु त्या दोन्ही शेडमधील मोकळ्या जागी जे काही काळी माती होती ती गरजू शेतकऱ्यांना विकून टाकली.

परंतु त्या काळी माती खाली जो काही मुरूम होता त्याचा उपयोग त्यांनी करायचे ठरवले. या मोकळ्या जागेमध्ये त्यांनी शंभर बाय 40 बाय सात फूट आकाराच्या खड्डा खोदला व त्यावर प्लास्टिक टाकून मत्स्यव्यवसायाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी मांगुर जातीच्या मांसाहारी असलेल्या माशांचे पालन केले व या माशांना खाद्य म्हणून पोल्ट्रीतील कोंबड्यांचा वापर केला.

मत्स्यपालन व्यवसायामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने त्यांनी पुढे सिमेंट काँक्रीटचे तळे उभारले व यामध्ये मत्स्य पालन व्यवसाय सुरू केला. काही कालावधीनंतर जेव्हा या  तलावामधून पाणी उपसले जाते ते पाणी नियोजनाने पिकांसाठी वापरण्यात येते. दुसरे म्हणजे पिकांना योग्य प्रमाणामध्ये पाण्याचा पुरवठा करण्याकरिता ठिबक सिंचनाची सुविधा केली.

आज जर त्यांचे उत्पन्न पाहिले तर मत्स्यपालनातून वर्षाला सहा लाख, तीन पोल्ट्री शेड मधून वर्षाला पाच लाख आणि भाजीपाला उत्पादनातून सहा लाख असे एकूण उत्पन्न ते मिळतात. कुक्कुटपालनामध्ये एका बॅचला 9000 प्रमाणे वर्षाला सहा बॅच ते काढतात. एवढेच नाही तर शेळीपालन देखील ते करत असून त्यांच्याकडे 30 शेळ्या आहेत.

 शेतातील प्रत्येक कोपऱ्याचा वापर उत्पादन वाढीसाठी केला

तसेच शेतामध्ये पेरूची बाग असून टमाटे, वाल तसेच गिलके, चवळी यासारख्या भाजीपालाचे उत्पादन घेऊन ते नाशिकच्या बाजारामध्ये विक्री करतात. एवढेच नाहीतर एखाद्या जागेमध्ये शेतात ट्रॅक्टर जात नसेल तर त्या जागी त्यांनी गवती चहाची वाफ्यांमध्ये लागवड करून त्या जागेचा देखील कल्पकतेने वापर केला.

मत्स्य पालनासाठी त्यांनी जे तळे बनवलेले आहे त्यावरच दहा बाय दहाची जाळी टाकून या वर्षापासून झिंगा पालन देखील सुरू केले आहे. यातून त्यांना एका वर्षात चार हजार किलो झिंग्याचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.

अशाप्रकारे अशोक पिंगळे यांनी कल्पकता तसेच कष्ट आणि व्यवस्थापनाच्या जोरावर शेती लाखो रुपये देणारी कशी ठरू शकते हे दाखवून दिले. याबाबतीत ते म्हणतात की शेतातील एका फुटात मला काय करता येईल याचा विचार केल्याने मला जास्त उत्पन्न घेणे शक्य झाले.