Goat Breed:- कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता जर कोणत्या व्यवसायामध्ये असेल तर तो आहे शेळी पालन व्यवसाय होय. भारतामध्ये शेतकरी कित्येक वर्षापासून शेळीपालन व्यवसाय करतात व आता शेळीपालन व्यवसाय व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जातो व यामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार आणि जातिवंत शेळ्यांच्या जातींची पालनासाठी निवड केली जाते.
भारतामध्ये पाहिले तर अनेक देशी जातींच्या शेळ्या पाळल्या जातात. यामध्ये तुम्हाला जर जास्तीचा नफा मिळवायचा असेल तर तुम्ही टॉप विदेशी जातीच्या शेळ्यांचे देखील पालन करू शकतात. या शेळ्या मांस आणि दूध उत्पादनामध्ये सरस असून या जातीच्या शेळीपालनातून शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने अधिकचा नफा मिळू शकतो. त्यामुळे या लोकप्रिय अशा विदेशी शेळ्या कोणत्या? याबद्दलची माहिती बघू.
या आहेत टॉप चार विदेशी जातीच्या शेळ्या
1- अँग्लो न्यूबियन शेळी– दूध उत्पादनासाठी ही शेळीची जात खूप फायद्याची असून ब्रिटनमध्ये विकसित झालेली ही जात आहे. अँग्लो न्यूबियन शेळी ही भारतीय आणि आफ्रिकन शेळ्यांचे मिश्रण असून तिच्या उच्च दूध उत्पादन व मांस उत्पादनासाठी ओळखली जाते.
या शेळीची दूध उत्पादन क्षमता पाहिली तर दररोज चार ते पाच लिटर दूध देऊ शकते. या जातीच्या शेळ्या रंगाने लाल तसेच तपकिरी आणि काळ्या असतात. तसेच उंचीने देखील खूप जास्त असतात व त्यांचे वजन देखील खूप वेगात वाढते. त्यामुळे या जातीचे संगोपन करून शेतकरी त्यांच्या दूध आणि मांस उत्पादनातून प्रचंड प्रमाणात पैसा मिळवू शकतात.
2- अल्पाइन शेळी– ही शेळी ग्रेट ब्रिटन देशाची असून खास करून मांस उत्पादनासाठी या जातीच्या शेळीचे पालन केले जाते. या शेळीचे मांस चविष्ट असल्यामुळे बाजारात देखील खूप मागणी असते. या जातीच्या शेळ्यांचे वजन अतिशय वेगाने वाढते व दूध उत्पादन देखील मुबलक प्रमाणात मिळते.
अल्पाइन जातीच्या शेळीच्या दुधाचा फॅट 3.4 पर्यंत असतो व दररोज तीन लिटरपेक्षा जास्त दूध देते.अल्पाइन जातीच्या शेळीच्या नराचे वजन 90 किलो पर्यंत असते व लांबीने ते 83 ते 95 सेंटीमीटर असतात.
3- टोगेनबर्ग शेळी– ही शेळी स्विस वंशाची असून दररोज तीन ते चार लिटर पर्यंत दूध देते. ही शेळी प्रामुख्याने फक्त दूध उत्पादनासाठी पाळले जाते. या शेळीच्या दुधाची चव अतिशय चांगली असते व त्यामुळे या शेळीच्या दुधाला खूप मागणी असते.
या शेळीच्या मांसाचा दर्जा हा सानेन जातीच्या शेळी पेक्षा चांगला असतो. ही एक धाडसी जात समजली जाते व कोणत्याही वातावरणाशी ती जुळवून घेते. या शेळीचे एक सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या नैसर्गिकरीत्या खूप हुशार असतात. रंगाने या तपकिरी आणि पांढऱ्या असतात.
4- सानेन शेळी– सानेन जातीची शेळी ही विदेशी असून तिच्या उच्च दूध उत्पादनक्षमतेमुळे तिला दुधाची राणी म्हणून संबोधले जाते. या जातीची शेळी मूळतः स्वित्झर्लंडची असून ती दूध व्यवसायासाठी पाळली जाते.
दूध उत्पादनामध्ये सर्व शेळ्याच्या जातीपेक्षा ही सरस असून दररोज तीन ते चार लिटर दूध देते. या शेळीच्या दुधामध्ये अँटिऑक्सिडेटिव्ह गुणधर्म असतात व कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी या शेळीचे दूध खूप फायद्याचे असते. इतकेच नाही तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास या शेळ्याचे दूध खूप मदत करते.बाजारपेठेमध्ये या शेळीच्या दुधाला खूप चांगली मागणी असते व किंमत देखील चांगली मिळते.
मांस उत्पादनाच्या बाबतीत मात्र ही शेळी पाहिजे तेवढी सरस नाही. या शेळीचे मांस हवे तितके चवदार नसल्याने प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी ही शेळी प्रामुख्याने पाळली जाते.
स्वभावाने अतिशय शांत असते व कुठल्याही हवामान परिस्थितीला सहनशील किंवा अनुकूल म्हणून ओळखली जाते. या जातीची मादी उंचीने 30 इंचापर्यंत असते व नराची सरासरी उंची 32 इंचापर्यंत असते. या शेळीचा रंग पूर्णपणे पांढरा किंवा हलका मलाईदार असतो.