केंद्र सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटक आणि विविध क्षेत्र यांच्या विकासाकरिता अनेक योजना सुरू केलेल्या असून या योजनांच्या माध्यमातून कर्ज आणि अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करून प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न चालवलेले आहेत. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.
त्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून देखील सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली असून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू केलेले आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे ड्रोन दीदी योजना ही होय. या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना खूप कमी पैशांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून पिकांवर फवारणी करता येणे शक्य होणार आहे.
ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले असून त्यासोबतच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आहे. ड्रोन दीदी योजना ही खास महिलांसाठी असून या माध्यमातून महिलांना रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे या लेखात आपण या योजनेविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.
कसे आहे केंद्र सरकारच्या ड्रोन दीदी योजनेचे स्वरूप?
केंद्र सरकारच्या माध्यमातून 30 नोव्हेंबर 2023 रोजी ही योजना सुरू करण्यात आली असून संपूर्ण देशात पंधरा हजारपेक्षा जास्त महिलांची ड्रोन ऑपरेट करण्यासाठी नेमणूक केली जाणार आहे. या योजनेमध्ये ज्या महिला निवडल्या जातील त्यांना यासंबंधीचे संपूर्ण पंधरा दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे व यामध्ये ड्रोनची हाताळणी कशी करावी तसेच पिकांवर कशा पद्धतीने फवारणी करावी याबाबत संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.
हे पंधरा दिवसांचे प्रशिक्षण ज्या महिला पूर्ण करतील त्यानंतर सर्व ड्रोन दीदींना महिन्याला पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा फायदा देखील मिळणार आहे. या योजनेमध्ये पंधरा दिवसाचे प्रशिक्षण दिल्यानंतर मासिक पंधरा हजार रुपये जो सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे ती मानधनाची रक्कम महिलांच्या थेट बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.
ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील दहा कोटिहुन जास्त बचत गटातील पंधरा हजार महिलांची निवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर संबंधित महिलेला सरकारकडून ड्रोन दिले जाते.
कोणत्या महिलांना घेता येईल लाभ?
यामध्ये प्रामुख्याने संबंधित महिला ही बचत गटाची सदस्य असणे गरजेचे असून ती महिला भारताची नागरिक असावी. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सदर महिला कमीत कमी 18 वर्षे वयाची पूर्ण केलेली असावी.
कोणती लागतात कागदपत्रे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखला, पॅन कार्ड, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, बचत गटाचे ओळखपत्र( अनिवार्य) आणि पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे लागतात.