Cotton Cultivation:- कोणत्याही पिकापासून जर तुम्हाला भरपूर उत्पादन हवे असेल तर त्याकरिता खत आणि पाणी व्यवस्थापनापासून अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष देणे खूप गरजेचे असते. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी कमीत कमी क्षेत्रात देखील आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ लागले आहेत.
तुम्ही किती क्षेत्रात पिक लागवड करतात त्यापेक्षा तुम्ही आहे त्या क्षेत्रामध्ये लागवड केलेल्या पिकाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात याला खूप महत्त्व असते. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या मांडवगण फराटा येथील शहाजी फराटे या शेतकऱ्याचा विचार केला तर त्यांनी अवघ्या 35 गुंठे क्षेत्रांमध्ये कापूस पिकाचे तब्बल वीस क्विंटल उत्पादन मिळवले आहे. नेमकी शहाजी फराटे यांनी ही किमया कशी साधली याबद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
35 गुंठ्यात वीस क्विंटल कपाशीचे उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की मांडवगण फराटा हे शिरूर तालुक्यातील गाव असून या गावचे शहाजी शामराव फराटे यांनी यावर्षी 35 गुंठे क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड केलेली होती. अवघ्या 35 गुंठ्यामध्ये त्यांनी तब्बल वीस क्विंटल उत्पादन मिळवण्याची किमया साधलेली आहे.
शिरूर तालुक्यातील पूर्व भागांमध्ये आता कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करू लागले असून कापूस आणि कांदा अशा दोन्ही पिकांची उत्पादने घेऊन आता दुहेरी फायदा शेतकरी मिळवताना दिसून येत आहेत. तसेच कापूस पिकाचा बेवड होत असल्यामुळे ऊस पिकाला देखील त्याचा चांगला फायदा मिळताना दिसून येत आहे.
शहाजी फराटे त्यांनी जुलै महिन्यामध्ये कपाशी पिकाची लागवड केलेली होती व महत्त्वाचे म्हणजे त्यांनी प्रथमच त्यांच्या शेतामध्ये कपाशीचे पीक घेतले. परंतु यामध्ये त्यांनी व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवले व तब्बल वीस क्विंटलचे उत्पादन मिळवले.
अशा पद्धतीने केली कापूस पिकाची मशागत
शहाजी फराटे यांनी महीको धनदेव या कपाशी वाणाची लागवडीसाठी निवड केली व लागवडी अगोदर शेतामध्ये दोन ट्रॉली शेण खताचा वापर केला. कापूस लागवड करण्याकरिता त्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने चार फुटांचा पट्टा तयार करून घेतला व दोन फूट अंतरावर 35 गुंठ्यात कपाशीची लागवड केली.
त्यांना नियंत्रण करता दोन खुरपणी केल्यावर खते तसेच औषधांचा वेळोवेळी आवश्यक तेवढा डोस दिला. खत व्यवस्थापनामध्ये त्यांनी 10:26:26 आणि आवश्यक मायक्रो न्यूट्रियंट खतांचा देखील गरजेनुसार वापर केला. पिकाची आवश्यकता आणि गरज पाहून वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी केली. अशा पद्धतीने व्यवस्थापन करत त्यांनी हे उत्पादन मिळवलेले आहे.
कपाशी पिकात घेतली आंतरपिके
शहाजी फराटे यांनी कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून फ्लावरच्या सात हजार रोपांची लागवड केली व या संपूर्ण पिकासाठी ठिबक सिंचनाचा पाणी व्यवस्थापना करता वापर केला. विशेष म्हणजे जेव्हा त्यांचे फ्लॉवर काढणीला आले तेव्हा दहा ते बारा रुपये प्रति किलोचा बाजारभाव त्यांना मिळाला व त्यातून तब्बल 70 ते 80 हजारांचे उत्पन्न त्यांना मिळाले. म्हणजेच कपाशी पिकाचा झालेला खर्च त्यांनी फ्लॉवरच्या माध्यमातून काढला.
साधारणपणे जर आपण कपाशीचे उत्पादन पाहिले तर त्यावर सध्या बोंड आळी व इतर हवामान बदलाचा विपरीत परिणाम होताना दिसून येत असल्यामुळे दहा ते पंधरा क्विंटल एकरी उत्पादन निघते. परंतु फराटे यांनी मात्र 35 गुंठ्यामध्ये वीस क्विंटल उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य करून दाखवली.