Cotton Pink Bollworm : शेतकऱ्यांनो मोह आवरा ! कपाशीचे फरदड उत्पादन येणार अंगलट, कृषी विद्यापीठाचा इशारा

Cotton Pink Bollworm : कपाशी हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य पीक. या पिकाची मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या विभागात सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. सध्या राज्यातील काही भागात कपाशीची वेचणी सुरू असून काही ठिकाणी कपाशीची उलंगवाडी झाली आहे.

त्यातच राज्यातील काही जिल्ह्यात गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी सध्या बाजारात कपाशीला चांगला दर मिळत असल्याने आणि हमीभावापेक्षा अधिक दर असल्याने शेतकरी बांधव फरदड उत्पादन घेण्याच्या तयारीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पण असं केल्यास गुलाबी बोंड आळीचा धोका पुढील हंगामात अजून वाढू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी फरदड उत्पादन घेऊ नये असा सल्ला जाणकार लोकांकडून दिला जात आहे.

खरं पाहता कापूस वेचणी केल्यानंतर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली जाते. यासाठी शेतकऱ्यांना खतांसाठी, बियाणासाठी, मशागतीसाठी, पाण्यासाठी अधिकचा खर्च करावा लागतो, अधिक मेहनत घ्यावी लागते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव नवीन पीक पेरणी करण्याऐवजी आपल्या जुन्या कपाशी पिकातून फरदड उत्पादन घेण्यास अधिक प्राधान्य देतात.

यासाठी शेतकऱ्यांना बियाणं लागत नाही, मशागत करावी लागत नाही. फक्त पाणी भरले जाते आणि खतांची मात्रा दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना वावरात उभे असलेल्या पिकातूनच उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. साहजिकच हे उत्पादन अपेक्षित असे नसते मात्र सध्या कपाशीला चांगला दर मिळत असल्याने थोडेफार जरी उत्पादन मिळालं तरी देखील पैसा बनू शकतो असा मानस शेतकऱ्यांचा असतो.

मात्र, थोड्याफार पैशांसाठी शेतकरी बांधव पुढील हंगामात आपल्यासाठी होऊन खड्डे खोदून घेतात. खरं पाहता फडदड उत्पादन घेणे म्हणजे कपाशीचे पीक हे मार्च महिन्यानंतर देखील वावरात उभे राहील. म्हणजेच कपाशीचे पीक दीर्घकाळ वावरात राहिल्याने गुलाबी बोंड अळी साठी वातावरण तयार होऊन जाते.

यामुळे गुलाबी बोंड अळी पुढील हंगामात येऊ नये यासाठी वेळेत पिकाची काढणी करून या अळीच्या जीवन चक्रावर घात घालणे अपेक्षित आहे. यामुळे जाणकार लोकांकडून शेतकऱ्यांना फरदड उत्पादन न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी जर फरदड उत्पादनाचा मोह आवरला तर पुढील हंगामात त्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.

जाणकार लोकांच्या मते, कापूस उत्पादकांनी कपाशीची वेळेवर वेचणी करून घ्यावी आणि डिसेंबर नंतर कोणत्याच परिस्थितीत कपाशीचे पीक वापरात राहू देऊ नये.

कापूस वेचणी झाली की शेत तनमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी शेळ्या किंवा मेंढ्या चरायला शेतात सोडल्या पाहिजेत.

तसेच कापूस वेचणी झाली की कपाशीच्या पऱ्हाट्या या शेताबाहेर लांब ठेवाव्यात. शेतात रचून ठेवू नये यामध्ये गुलाबी बोन्ड अळी सुप्तअवस्थेत राहतात ज्या की पुढील हंगामात अजूनच त्रासदायक सिद्ध होऊ शकतात. कापूस साठवणूक ज्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणी कामगंध सापळे लावले पाहिजेत.