Crop Damage Compensation : महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना 750 कोटींची मदत ; मंत्री उदय सामंत यांची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Damage Compensation : यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी अगदी ‘सोळावं वरीस धोक्याचं’ असच ठरलं आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झालं मात्र नुकसान निकषात बसत नव्हतं. सुरुवातीला अतिवृष्टी झाली अन ज्या ठिकाणी 65 मीमीपेक्षा जास्त पाऊस कोसळला ते शेतकरी बांधव निकषात बसले आणि त्यांना अतिवृष्टीची मदत मायबाप शासनाने देऊ केली.

मात्र, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले पण 65 मिमीचा जो निकष लावून देण्यात आला आहे त्यामध्ये शेतकरी बसत नव्हते. सततच्या पावसासाठी नुकसान भरपाई देण्याची संकल्पना याआधी नव्हतीच. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नुकतीच विधानसभेत माहिती दिली आहे.

मात्र असे असले तरी शिंदे फडणवीस सरकारने निकषात न बसलेले आणि सततच्या पावसामुळे खरोखर नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना देखील नुकसान भरपाई देऊ करण्याचे ठरवले. याच संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी नागपुर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात एक महत्त्वाची माहिती पटलवर मांडली आहे.

मंत्री महोदय यांच्या मते सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना तब्बल साडेसातशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. विधानसभेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांच्या नुकसान भरपाईचा मुद्दा उपस्थित केला असता मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

उदय सामंत यांच्या मते, अमरावती विभागातील संत्रा पिकाचे कोळशी या रोगामुळे कोणतेच नुकसान झाले नाही. मात्र नागपूर जिल्ह्यात कोळशी रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला पण त्या ठिकाणी देखील आर्थिक नुकसान पातळीच्या खालीच प्रादुर्भाव होता. तसेच जर सर्वेक्षणामध्ये काही त्रुटी राहिले असतील तर पुन्हा एकदा सर्वेक्षण केलं जाईल असे देखील मंत्री महोदयांनी यावेळी स्पष्ट केलं.

तसेच विदर्भातील शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रासाठी 3103 कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारने देऊ केल्याचे त्यांनी यावेळी विधानसभेत नमूद केलं. यावेळी उदय सामंत यांनी पिक विमा संदर्भातील उपप्रश्नाला देखील उत्तर दिलं. अमरावती मधील ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढला होता आणि 72 तासांच्या आत संबंधित पिक विमा कंपन्यांकडे सूचना दिली होती त्यांना पिक विमा मिळालेला असल्याची माहिती देखील त्यांनी विधानसभेत दिली.

दरम्यान काल-परवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुढील वर्षापासून सततच्या पावसासाठी देखील निकष ठरवले जातील असं सांगितलं आणि यासाठी समिती देखील गठीत केली जाईल असंही नमूद केल आहे. निश्चितच ज्या शेतकरी बांधवांचे पावसामुळे नुकसान होते मात्र निकषात बसत नाही अशा शेतकरी बांधवांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

म्हणजे सध्या विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा तर मिळालाचं आहे. पण पुढील वर्षी यासाठी निकष ठरवले जातील अशी ग्वाही सरकारने दिली असल्याने राज्यातील जवळपास सर्वचं शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.