नादखुळा…! युवा शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ; ‘या’ टेक्निकने काकडीचे शेती करून 29 गुंठ्यात मिळवला 3 लाखांचा नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cucumber Farming : शेतकरी बांधवांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये भांडवल अभावी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता न येणे, विजेची समस्या, निसर्गाचा लहरीपणा यांसारख्या अडचणींचा समावेश आहे. मात्र जर मनात काहीतरी वेगळे करण्याची आणि यशस्वी होण्याची धम्मक असेल तर निश्चितच यशाला गवसणी घालता येते.

खरं पाहता, शेतकरी बांधवांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होत नाही असं नाही मात्र भांडवल अभावी नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधव वापरू शकत नाहीत. जाणकार लोकांच्या मते जर शेतकऱ्यांनी नवीन सुधारित आणि प्रगत अशा तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीतून अधिक उत्पादन मिळवता येते.

मात्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भला मोठा पैसा लागतो. शेतकऱ्यांकडे मात्र पुरेसं भांडवल उपलब्ध नसतं. परंतु जर शेतकरी बांधवांनी शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेऊन प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला तर निश्चितच त्यांना फायदा होऊ शकतो. औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी येथील शेतकरी बंडू नारायण पडूळ यांनी देखील शासकीय योजनेचा लाभ घेत प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीतून चांगली कमाई करण्याची किमया साधली आहे.

खरं पाहता पारंपारिक पीक पद्धतीला बगल देण्यासाठी त्यांनी शेडनेट हाऊस मध्ये शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थातच पोखरा योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेत आपल्या 40 गुंठे शेत जमिनीत शेडनेटची उभारणी केली. याशिवाय त्यांनी विजेची समस्या हेरून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सोलर पंप योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांनी तीन ते साडेतीन लाखांचा सोलार पंप अवघ्या 16 हजारात अनुदानाचा लाभ घेत मिळवला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या स्थितीला त्यांनी आपल्या चाळीस गुंठे शेत जमिनीत उभारलेल्या शेडनेट हाऊस मध्ये वीस गुंठ्यात काकडीची आणि वीस गुंठ्यात शिमला मिरचीची लागवड केली आहे. काकडीची लागवड करून जवळपास 40 दिवसांहून अधिक कालावधी उलटला असून आता काकडी पिकातून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना काकडीच्या पिकातून जवळपास 25 टन उत्पादन मिळण्याची आशा आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या काकडीला सध्या स्थितीत 28 रुपये प्रति किलो असा दर मिळत असून असाच दर जर कायम राहिला तर खर्च वजा जाता त्यांना तीन लाखांपर्यंत नफा मिळणार आहे. 

म्हणजेच अर्धा एकर शेत जमिनीतून तीन लाखांची त्यांना कमाई होणार आहे. शेडनेट हाऊसची उभारणी झाल्यामुळे त्यांनी आपल्या शेतात दहा ते बारा महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. निश्चितचं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी चांगलं उत्पादन मिळवून दाखवल आहे.

विशेष म्हणजे ग्रामीण भागात विजेच्या भारनियमनाचा प्रश्न देखील त्यांनी सोलार पंप बसवल्यामुळे मिटला आहे. एकंदरीत जर अल्पभूधारक शेतकरी बांधवांनी शासकीय योजनेची माहिती घेऊन अनुदानाचा लाभ घेत अशा प्रगत तंत्रांचा वापर केला तर निश्चितच त्यांना शेतीतून चांगली कमाई होऊ शकते.