सध्या काही दिवसांवर दसरा आणि दिवाळी यासारखे महत्वाचे सण येऊ घातल्यामुळे वातावरण हे आल्हाददायक व प्रसन्न असे वाटायला लागले आहे. या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची देखील विविध प्रकारच्या खरेदीसाठी प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते. याच दसरा आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर झेंडू आणि इतर फुलांना देखील मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते.
खास करून दसऱ्याला आणि लक्ष्मीपूजनाला फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते व त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे शेतकरी झेंडू आणि इतर फुलांच्या लागवडीचे नियोजन करतात. एरवी वर्षभर फुलांना बाजार भाव काय असेल त्यापेक्षा या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर फुलांना प्रचंड प्रमाणात मागणी वाढुन किंमत देखील चांगली मिळते.
या दृष्टिकोनातून जर आपण अहमदनगर तालुक्यातील अकोळनेर आणि परिसरातील गावांचा विचार केला तर त्या ठिकाणी नवरात्र उत्सव तसेच दसरा व दिवाळी या सणांसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या फुलांचे मळे बहरले असून शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती देखील या फुलांच्या विक्रीतून बहरेल अशी शक्यता आहे.
अकोळनेर आहे फुलांचे आगार
नगर तालुक्यातील अकोळनेर या गावांमध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी देखील दसरा व दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर रंगबिरंगी फुलांचे मळे बहरले असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी झेंडू आणि शेवंती यासोबतच जरबेरा व अस्टर सारख्या फुलांची लागवड देखील केलेली आहे. अकोळनेरला नगर तालुक्यातील फुलांचे मुख्य आगार असे म्हणून ओळखले जाते.
त्यासोबतच आपण परिसरातील भोरवाडी तसेच कास व कामरगाव या परिसरात देखील फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जर आपण फुलशेतीचा विचार केला तर ही जिरायती जमिनीत आणि कमीत कमी पाण्यावर देखील चांगले उत्पादन देणारी शेती असल्यामुळे अकोळनेर व परिसरातील गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुल लागवड करतात.
यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी झाला आहे व खराब हवामान असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या फुलांच्या उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता आहे. परंतु या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नवीन वाणांचा प्रयोग लागवडीसाठी केला असून या माध्यमातून चांगले उत्पादन येईल व फुलांचे उत्पादन कमी असल्यामुळे बाजार भाव देखील तेजीत राहील अशी शक्यता असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
यावर्षी या परिसरामध्ये 150 एकर क्षेत्रावर शेवंती व झेंडूची लागवड करण्यात आलेली आहे. शेवंतीच्या फुलांच्या अनेक दर्जेदार अशा व्हरायटी ची लागवड यामध्ये करण्यात आली असून उदाहरणच घ्यायचे झाले तर चांदणी, भाग्यश्री तसेच पूजा व्हाईट, सानिया येलो, पौर्णिमा व्हाईट व सेंट व्हाईट यासारख्या वरायटींची लागवड करण्यात आलेली आहे. साधारणपणे मार्च महिन्यामध्ये शेवंतीची लागवड केली जाते.
पावसावर ठरते फुलांच्या बाजारभावाचे सगळे गणित
यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये कमी पाऊस झाला आहे व खराब हवामानामुळे झेंडू आणि शेवंती या फुलांचे मोठे नुकसान झाल्यामुळे उत्पादन देखील घटले आहे. साहजिकच उत्पादन घटल्यामुळे फुलांची आवक देखील कमी राहणार असून त्याचा फायदा हा फुलांच्या भाव वाढीत दिसून येणार आहे.
यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत तीन ते चार पट जास्त भाव राहील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असून आज जर आपण शेवंती या फुलाचा भाव पाहिला तर तो प्रति किलोला शंभर रुपये आहे. परंतु दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर हाच भाव 200 ते 300 रुपये प्रति किलो होईल असा अंदाज आहे. झेंडूचे भाव सध्या पन्नास रुपये प्रति किलो आहे व सणासुदीमध्ये ते देखील शंभर रुपये किलोच्या पुढे जाईल अशी देखील स्थिती आहे.
अकोळनेरच्या फुलांना आहे संपूर्ण देशातून मागणी
झेंडूच्या फुलांमध्ये कलकत्ता तसेच जम्बो, मारीगोल्ड, गोल्ड स्पॉट, अष्टगंधा तसेच पितांबरी यासारख्या वेगवेगळ्या व्हरायटी असून या व्हरायटिंची लागवड या परिसरात होते व येथील फुलांना दिल्ली, हैदराबाद तसेच बेंगलोर, नागपूर, मुंबई आणि बडोदा अशा देशभरातील मोठ्या शहरांमधून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
त्यामुळे यावर्षी देखील कमी पावसामुळे उत्पादन घटीचा फायदा अकोळनेर परिसरातील शेतकऱ्यांना होऊ शकतो.