Dairy Business:- पशुपालन व्यवसाय आणि त्या माध्यमातून दुधाचे उत्पादन आणि विक्री हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. तसेच यामध्ये आता अनेक संकरित गाई विकसित झाल्यामुळे वाढीव दूध उत्पादन मिळण्याच्या दृष्टिकोनातून या गाईंचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तसेच दूध व्यवसाय व पशुपालनामध्ये म्हैस पालनाला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
आज-काल अनेक सुशिक्षित युवक दूध धंद्याकडे वळले असून त्यासाठी जास्त दूध उत्पादन क्षमता असलेल्या संकरित गाईंचे पालन करण्यावर युवकांचा भर दिसून येतो. संकरित गाईंमध्ये प्रामुख्याने जर्सी, होलेस्टीयन फ्रिजियन सारख्या गाईंचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते.
त्यासोबतच गिर आणि साहीवालसारख्या देशी गाई देखील दूध उत्पादनासाठी चांगले आहेत. परंतु जर जास्त दुधाचे उत्पादन हवे असेल तर संकरित गाईंमध्ये हरधेनू गाय खूप महत्त्वाची असून वाढीव दूध उत्पादनासाठी ती प्रसिद्ध आहे. दूध व्यवसायामध्ये तुम्ही जर्सी, एचएफ तसेच यासोबत देशी गाईंमध्ये गिर व साहीवाल आणि त्यांच्यासोबत जर हरधेनू गाईचे पालन केले तर नक्कीच दूध व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो.
हरधेनू गाईचे वैशिष्ट्ये
ही गाय प्रामुख्याने हरियाणा येथील लाला लजपतराय युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटर्नरी अँड ॲनिमल सायन्सेस येथील शास्त्रज्ञांनी तीन गाईंचा एकत्रित संकर करून विकसित केलेली आहे. त्या तीन गाई म्हणजे होलस्टीन फ्रिजियन, हरियाणाची स्थानिक हरियाणवी गाय आणि साहिवाल या तीन गाईंच्या संकरातून ही गाय विकसित करण्यात आलेली आहे.
या गाईची दूध देण्याची क्षमता इतर गाईंच्या तुलनेमध्ये जास्त असून या गाईपासून मिळणाऱ्या दुधाचा रंग हा इतर गाईच्या दुधापेक्षा जास्त पांढरा असतो. तसेच हरधेनू गाईचे दूध उत्पादन क्षमता पाहिली तर ती इतर गाईंच्या तुलनेमध्ये खूपच जास्त आहे.
ही गाय दिवसाला 15 ते 16 लिटरपर्यंत दूध देते. परंतु व्यवस्थापन जर अचूक ठेवले तर एका दिवसामध्ये 55 ते 60 लिटर दूध देण्याची क्षमता या गाईची आहे. त्यामुळे युवकांना जर दूध धंद्यामध्ये पडायचे असेल तर हरधेनू गाईचे संगोपन करून दूध व्यवसायाला सुरुवात करू शकतात. कारण जसे आपण पाहिले की इतर गाईंच्या तुलनेमध्ये ही गाय जास्त दूध देते.