Farmer Success Story:- शेतीला आधुनिकता आणि तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती कशी फायद्याची ठरते हे आपल्याला अनेक उदाहरणांवरून दिसून येते. शेती क्षेत्रामध्ये आता अनेक प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे अनेक अशक्य गोष्टी शेतीमध्ये शक्य झालेले आहेत.
तसेच आता जे काही नवयुवक शेतीमध्ये येत आहेत ते प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच शेती करत असून परंपरागत शेती पद्धत आणि पिकांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला शेती, शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी फुलशेती आणि मोठ्या प्रमाणावर फळबागांची लागवड केली जात आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने अगदी कमीत कमी क्षेत्रात देखील जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे आता शक्य झाल्याचे दिसून येते. म्हणजेच एक ते दीड एकर क्षेत्रामध्ये पाच एकर क्षेत्रात निघेल इतके उत्पादन मिळवण्याची किमया शेतकऱ्यांनी साधली आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण बीड जिल्ह्यातील जाधव बंधूंचा विचार केला तर या दोनही बंधूंनी त्यांची शिक्षकाची नोकरी सांभाळत यशस्वी अशी सीताफळाची लागवड केली असून कष्टाने पिकवलेला सीताफळ थेट तेलंगणापर्यंत पोहोचवला आहे.
सिताफळ लागवडीतून आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कायमच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात असलेल्या आष्टी तालुक्यातील बंडू आणि राजेंद्र जाधव या दोन भावांनी शिक्षकी पेशा सांभाळत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उत्तम पद्धतीची शेती केलेली आहे.
या दोन्ही भावांनी सीताफळाची लागवड करण्याचे निश्चित केले व 2018 मध्ये सोलापूर या ठिकाणहून सीताफळाचे सहाशे रोपे खरेदी केली व दीड एकर क्षेत्रात चांगली मशागत करून पाणी व्यवस्थापनाकरिता ठिबक सिंचनासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला व सहा बाय 12 फूट अंतरावर सीताफळांची लागवड केली.
या दीड एकरमध्ये त्यांना लागवडीपासून तर औषधे फवारणी, आवश्यक अशी मजुरी पकडून दीड लाख रुपये खर्च आला. योग्य व्यवस्थापन ठेवून या दोन्ही बंधूंनी हा अपार कष्ट घेतले व त्यांच्या या कष्टाचे रूपांतर आज सिताफळ बाग बहरण्यामध्ये झालेले आहे.
यावर्षी त्यांनी बाग धरला असून मोठ्या प्रमाणावर सीताफळे झाडांना लगडली आहेत. तेलंगणा राज्यांमध्ये हे सिताफळ विक्रीसाठी पाठवत असून त्या ठिकाणी त्यांच्या सीताफळाला 45 रुपये प्रति किलो इतका दर मिळत आहे. यावरून त्यांना साधारणपणे साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी देखील अपेक्षा आहे.
एवढेच नाही तर त्यांनी सिताफळ लागवड तर केली आहेच परंतु दोन एकर मध्ये जांभूळ, दीड एकर क्षेत्रामध्ये पेरू तर एक एकर क्षेत्रात शेवंती या फुल पिकाची देखील लागवड केलेली आहे.
आधुनिक शेतीच्या बळावर त्यांचा आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे तरुणांनी आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाचा अंगीकार करत शेती केली पाहिजे अशा प्रकारचे आव्हान देखील जाधव बंधूंनी तरुण शेतकऱ्यांना केले आहे.
जाधव बंधूंच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की जर शेतीमध्ये आधुनिक पद्धत आणि व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब केला तर शेती लाखोत उत्पन्न देऊ शकते.