यशोगाथा : एकेकाळी शेळ्या चारणारा अवलिया बनला 16 एकराचा मालक ! यंदा डाळिंब शेतीतून कमवले 27 लाख ; साधली आर्थिक प्रगती

Farmer Success Story : गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे शेती नको रे बाबा असा ओरड नवयुवक शेतकरी पुत्र करत आहेत. विशेष म्हणजे प्रयोगशील शेतकरी बांधव देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घ्यावे आणि एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असे स्वप्न पाहू लागले आहेत.

मात्र काळ्या आईच्या कुशीत आपले भवितव्य शोधणारे देखील अनेक नवयुवक शेतकरी पुत्र आहेत, तसेच आपल्या पाल्याने शेतीमध्येच काहीतरी नवीन क्रांती घडवावी असे स्वप्न पाहणारे प्रयोगशील शेतकरी देखील आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नासिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याचे मौजे सातमाने येथील चतुरसिंग जाधव हे देखील असेच एक प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी आपल्या मुलाने शेतीतच क्रांती घडवावी असं स्वप्न पाहिल आहे. विशेष म्हणजे तात्यांच हे स्वप्न आता प्रत्यक्षात खरं उत्तरल आहे. यावर्षी त्यांना डाळिंब शेतीतून तब्बल 27 लाखांची कमाई झाली आहे. यामुळे सध्या पंचक्रोशीत त्यांचं नाव चांगलं चर्चेत आलं आहे. अशा परिस्थितीत आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत.

चतुर सिंग जाधव एकेकाळी एक भूमिहीन शेतमजूर म्हणून काम करत आणि शेळ्या चारून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत. शेळीपालनातून जे थोडेफार उत्पन्न मिळत असे त्यामध्ये त्यांनी आपला संसाराचा गाडा हाकला आणि काही पैशांची बचत केली. मग 1993 मध्ये त्यांनी एक लाख 14 हजारात 14 एकर 10 गुंठे शेतजमीन घेतली. शेती घेतल्यानंतर त्यांनी जवळपास सात वर्षे पारंपारिक पिके घेतली.

नंतर काळाच्या ओघात शेतीत बदल करणे हेतू त्यांनी 2000 साली डाळिंब लागवड केली. एकूण 1600 डाळिंब रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये 800 आरक्ता आणि 800 भगवा जातीची डाळिंबाची रोपे लावण्यात आली. डाळिंबाची बाग लावली मात्र पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. मग त्यांनी आपले मित्र प्रयोगशील शेतकरी गोरख जाधव यांच्या समवेत पार्टनरशिप मध्ये चार किलोमीटर लांबून मौसम नदीखोऱ्यातुन पाईपलाईन केली. पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला.

पुढे त्यांनी पाण्याची कायमची कटकट दूर करण्यासाठी 2014 मध्ये शेततलाव बांधला. एक एकरावर शेततलावाची बांधणी करण्यात आली. त्यावेळी शासनाच्या योजनेचा लाभ देखील त्यांना मिळाला. डाळिंब शेतीतून चांगले अपेक्षित असे उत्पन्न देखील मिळत होते. पुन्हा त्यांनी 2015 साली 25 लाखात दोन एकर शेतजमीन घेतली. यानंतर, डाळिंब बाग लागवड करून जवळपास 16 वर्षे उलटली होती. अशा परिस्थितीत डाळिंब बाग काढावी लागली.

डाळिंब बाग काढल्यानंतर शेवगा लागवडीचा प्रयोग केला. यामध्ये समाधानकारक उत्पन्न मिळाले मात्र अपेक्षित असं यश त्यांना संपादन करता आले नाही. त्यामुळे 2018 मध्ये शेवगा पीक काढून टाकले. त्याच वर्षी त्यांनी जी दोन एकर नवीन शेत जमिनी घेतली होती त्यामध्ये पुन्हा एकदा 1500 डाळिंब रोपांची लागवड केली. यामध्ये आंतरपीक म्हणून सुरुवातीचे दोन वर्षे कांदा पीक घेण्यात आले. पुन्हा 2020 मध्ये ज्या शेतातून आधी डाळिंब काढण्यात आले होते त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2200 भगवा जातीची डाळिंब रोपांची लागवड करण्यात आली.

यामध्ये देखील त्यांनी आंतरपीक म्हणून कांदा या नगदी पिकाची लागवड केली. त्यामुळे डाळिंब बाग जोपसण्यासाठी आलेला खर्च त्यांना काढता आला. आता तात्यांकडे 3700 झाडांची डाळिंब बाग आहे. यातून 1500 झाडांचा एप्रिल मध्ये बहार पकडला होता. या अनुषंगाने 10 एप्रिलला शेणखत आणि उसमळी या डाळिंब झाडाला लावण्यात आली. 30 एप्रिलला झाडांची पानगळ करण्यात आली आणि 5 मे रोजी या झाडांना पाणी देण्यात आले. डाळिंब बागेची योग्य जोपासना केल्यामुळे डाळिंब बागेची चांगली सेटिंग झाली. त्यांनी डाळिंब फळ फुगवनसाठी सलरी (गूळ, गोमतीर, सोयाबीन पावडर इत्यादी मिळवून बनवलेली) झाडांना दिले.

यामुळे डाळिंब फळ 450 ग्रॅम पर्यंत चांगले पोसले गेले. या डाळिंब बागेची नोव्हेंबर मध्ये काढणी सुरू झाली. कलकत्त्याच्या व्यापाऱ्याला 111 रुपये प्रति किलो लाटबाट याप्रमाणे डाळिंब विक्री करण्यात आले. बागेतून त्यांना 25 टन डाळिंबाचे उत्पादन झाले. यातून त्यांना 27 लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळालं. साडेचार लाख रुपयांचा यासाठी त्यांना खर्च आला आहे. खर्च वजा जाता 22 लाख 50 हजार रुपयांचा त्यांना निव्वळ नफा राहिला आहे.

परिवारातील सर्व सदस्य करताय शेती

चतुरतात्या यांना शेतीमध्ये त्यांच्या धर्मपत्नी पमाबाई यांची कायमच साथ लाभली आहे. तसेच त्यांचे तीन मुलं सोनाभाऊ, दीपक आणि किरण हे देखील आपल्या वडिलांना शेती व्यवसायात मदत करतात. सोनाभाऊ यांची पत्नी आणि दीपक यांची यांची पत्नी देखील हिरिरीने शेतीत मदत करतात. फवारणी पासून ते इतर छोटे-मोठे सर्व कामे ही त्रिमूर्ती पाहत असते.

डाळिंब शेतीसाठी ट्रॅक्टर तसेच ब्लॉअर या अत्याधुनिक यंत्रांचा वापर करण्यात येतो. जाधव कुटुंबीय अहोरात्र काबाडकष्ट करतात. आजच्या मितीला जाधव कुटुंबीयांकडे 16 एकर शेत जमीन असून 12 एकरात डाळिंब लागवड करण्यात आली आहे. यातून एप्रिल महिन्यात पाच एकराच्या डाळिंब बागेचे उत्पादन मिळाले असून 7 एकर डाळिंब बागाचा ऑगस्ट महिन्यात बहार धरला आहे. यातून देखील येत्या काही महिन्यात त्यांना चांगली कमाई होण्याची आशा आहे. गेल्या वर्षी त्यांनी 45 लाखांचा टोलेजंग बंगला बांधला आहे.

किरण जाधव तात्यांचे लहान चिरंजीव यांनी सांगितल्याप्रमाणे, डाळिंब शेती व्यतिरिक्त ते उर्वरित तीन एकर शेत जमिनीत पारंपारिक पिकांची शेती करत असतात. यामध्ये त्यांना येत्या काही महिन्यात पॉलिहाऊसची निर्मिती करायची असून यामध्ये भाजीपाला म्हणजेच तरकारी पिकांची शेती करण्याचा त्यांचा मानस आहे.

एकेकाळी भूमिहीन शेतमजूर असलेल्या आणि शेळ्या चारणाऱ्या तात्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर 16 एकराची शेतजमीन आपल्या नावावर केली असून शेतीतून लाखो रुपयांची कमाई ते करत आहेत. त्यांची तिन्ही मुल शेतीतच सक्रिय असून वडिलांनी उभारलेले साम्राज्य त्यांना अजून पुढे न्यायचं आहे. निश्चितच नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुणाईला या तिन्ही बंधूंनी शेतीतून देखील लाखोंची कमाई केली जाऊ शकते हे दाखवून दिले आहे.

farmer success story

शेतीतून जर नेत्र दीपक कामगिरी करायची असेल तर फ़ळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष दिले पाहिजे. डाळिंब शेतीतुन निश्चितच अधिक उत्पन्न मिळू शकते मात्र यासाठी शेतकऱ्यांनी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन योग्य ते नियोजन आखणे आवश्यक आहे. :- किरण चतुरसिंग जाधव 7264098081

सोनाभाऊ चतुरसिंग जाधव :- 9370396548