Farmer Success Story: शेळीपालनातून ‘हे’ शेतकरी बंधू वार्षिक कमवत आहेत 6 लाख रुपये! वाचा यांची शेळीपालनाची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन आणि शेळीपालन हे व्यवसाय फार पूर्वीपासून केले जातात. यामध्ये जर आपण शेळीपालनाचा विचार केला तर  घरापुढे दोन ते तीन शेळ्या घेऊन प्रामुख्याने शेतकरी शेळी पालन करत असत. शेळीला गरिबांची गाय म्हटले जाते कारण शेळीपालनासाठी खर्च देखील कमी येतो व कमीत कमी जागेमध्ये तिचे संगोपन करता येते.

परंतु आता शेळीपालन व्यावसायिक दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणावर केले जात असून त्यामध्ये विविध प्रजातींच्या शेळ्यांचे पालन व तंत्रज्ञानाचा वापर यामुळे हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर आता सुशिक्षित बेरोजगार तरुण देखील करू लागले आहेत. कमीत कमी खर्चामध्ये या व्यवसायातून लाखोचे उत्पन्न  मिळत असल्यामुळे दिवसेंदिवस हा व्यवसाय पसंतीचा झालेला आहे.

याच मुद्द्याला धरून जर आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील योगेश व अविनाश शेवाळे या वैजापूर तालुक्यातील बोरसर या गावच्या शेतकरी बंधूंचा विचार केला तर त्यांनी शेळी पालन व्यवसायातून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती केली आहे व त्यांचे यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 शेवाळे बंधूंची शेळीपालनाची यशोगाथा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरसर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील योगेश व अविनाश कैलास शेवाळे या दोन्ही भावांनी शेळी पालन करण्याच्या दृष्टिकोनातून साधारणपणे सन 2019 मध्ये गुजरात व पंजाब राज्याच्या काही गावांमध्ये फिरून त्या ठिकाणाच्या बिटल व शिरोही या जातीच्या शेळ्या व बोकड खरेदी केले व शेती सोबत त्यांनी शेळी पालन व्यवसायाला सुरुवात केली.

महत्वाचे म्हणजे शेतीमध्ये ते डाळिंब तसेच कांदा, मका व गहू इत्यादी पिके घेत असतात. उत्तम अशा शेती सोबतच त्यांनी सातत्य व कठोर मेहनत घेऊन शेळीपालनात देखील मोठी प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे घराच्या अंगणामधून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली व आज 85 बाय 45 आणि 90 बाय 45 फूट लांबी रुंदीचे असे दोन अत्याधुनिक अशा शेडची उभारणी केली असून या शेडमध्ये त्यांनी आधुनिक पद्धतीचे शेळी पालन व्यवसाय सुरू केला आहे.

हा व्यवसाय त्यांच्या यशोधन गोट फार्म या नावाने प्रसिद्धीस आला आहे. जर त्यांच्या शेडची किंवा गोट फार्म ची उभारणी पाहिली तर त्यामध्ये वेगवेगळे कप्पे करण्यात आलेले असून गाभण शेळी तसेच आजारी शेळी, बोकड व पिल्ले अशा पद्धतीने कप्याची विभागणी केलेली आहे. आज त्यांच्याकडे 35 बिटल, वीस शिरोही जातीच्या शेळ्या असून त्या संपूर्ण गाभण आहेत. तसेच 40 ते 45 करडे देखील आहेत.

 अशाप्रकारे करतात ते व्यवस्थापन

या शेळ्यांना संतुलित चारा उपलब्ध व्हावा याकरिता त्यांनी शेतामध्ये सात ते आठ गुंठ्यात मेथी घास, तेरा गुंठे क्षेत्रामध्ये 4 जी नेपियर इत्यादी चारा पिकांची लागवड केलेली असून चाऱ्यासाठी ते खरीप व रब्बी अशा दोनही हंगामामध्ये दोन एकर पर्यंत मका लागवड करून मक्याचे उत्पादन देखील घेतात व याच हिरव्या मक्यापासून मुरघास तयार करतात व मक्याची भरड देखील शेळ्यांना खुराकामध्ये देतात.

चारा व्यवस्थापन करताना सकाळी सहा वाजता ते शेळ्यांना प्रामुख्याने गहू, सोयाबीन तसेच मक्याची भरड देतात व आठ वाजता मुरघास, दुपारच्या वेळेस मेथी घास व रात्री नेपियरची कुट्टी शेळ्यांना खायला दिली जाते. तसेच डॉक्टरांच्या मदतीने उपचारांची नोंदी देखील त्यांनी वेळोवेळी ठेवलेले आहेत. नियमित आरोग्य व्यवस्थापन व लसीकरण इत्यादीमुळे शेळीपालनात तोटा होत नसल्याचे देखील शेवाळे यांनी सांगितले.

 जातिवंत बोकड्यांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न

शेळीपालनामध्ये त्यांच्याकडे बीटल व शिरोही या दोन मुख्य ब्रिडर बोकड्यांची ब्रीडिंग साठी प्रामुख्याने बीटल करिता सव्वा लाख व शिरोही करिता 85 हजार रुपयांना मागणी झालेली असून आतापर्यंत मात्र त्यांनी हे बोकड विकलेले नाहीत. पैदाशीचे बोकड व शेळी तसेच करडांच्या विक्री या माध्यमातून वर्षाला त्यांना पाच ते सहा लाख रुपयांचा निव्वळ नफा देखील मिळत आहे.

त्यांच्या शेळीपालनाचे वैशिष्ट्य म्हणजे शेळ्यांच्या गाभण काळामध्ये योग्य व्यवस्थापन ठेवल्याने बिटल प्रजातीत सहा ते सात व शिरोही या शेळीच्या प्रजातीत चार ते पाच किलोचे करडे जन्माला आल्याचे देखील त्यांनी सांगितले व या बोकडांना तीनच महिन्यांमध्ये वीस हजार रुपये प्रति बोकड प्रमाणे मागणी देखील असते.

अशा पद्धतीने शेवाळे बंधूंनी 14 एकर शेतीला उत्तम अशा शेळीपालनाची जोड दिल्यामुळे शेती आणि शेळीपालनातून चांगले आर्थिक उत्पन्न त्यांना मिळायला लागले आहे.