Farmer Success Story:- शेतकरी शेतीमध्ये आता आधुनिक पद्धतीच्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहेत. यामध्ये अगदी विदेशी भाजीपाल्यापासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या फळ पिकांची लागवड शेतकरी करत असून त्या माध्यमातून चांगला आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत शेतकऱ्यांनी तयार केला आहे.
तसेच या पिकांना तंत्रज्ञानाची जोड देत भरघोस उत्पादन घेण्यात देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले आहे. फळ पिकांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने डाळिंब, द्राक्ष, पेरू, सिताफळ, ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी यासारख्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.
या फळांमध्ये आपल्याला प्रामुख्याने सीताफळाचा विचार केला तर हे व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड केले जाणारे महत्वाचे फळपीक आहे. यामध्ये आपल्याला सिताफळ आणि यासोबतीला रामफळ या फळांची नावे प्रामुख्याने माहिती आहेत. परंतु याच वर्गातील हनुमान फळ याचे नाव कधी आपण ऐकले आहे का? तर बऱ्याच प्रमाणात या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येईल.
परंतु वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ना सिताफळ किंवा रामफळ यांची लागवड न करता हनुमान फळाची लागवड केली असून मागील वीस वर्षापासून या फळाची यशस्वी शेती करत आहेत. त्याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण नेमके हनुमान फळ कसे असते आणि हे शेतकरी याची शेती कशी करीत आहेत? याबद्दलची माहिती घेणार आहोत.
हनुमान फळ लागवडीतून लाखोंची कमाई
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाशिम जिल्ह्यातील असोला या गावचे शेतकरी विठ्ठलराव बरडे हे गेल्या वीस वर्षापासून हनुमान फळाची यशस्वी शेती करत असून हे अत्यंत कमी पाण्यात येणारे पीक असून याला कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा फवारणीची गरज नसते.
जर आपण या फळाचे शास्त्रीय नाव पाहिले तर ते एनोना 2 असे आहे. परंतु आकारामुळे त्याला स्थानिक भाषेत हनुमान फळ असे म्हणतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील या फळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर प्रतिरोध औषधी गुणधर्म असल्याचे देखील बोलले जाते व या सोबतच इतर आजारांवर देखील हे फळ गुणकारी आहे.
हनुमान फळाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे काढणी केल्यानंतर ते पाच ते सहा दिवसापर्यंत चांगल्या पद्धतीने टिकून राहते.कारण याचे बाह्य आवरण जाड असते. याचे टिकवण क्षमता चांगली असल्यामुळे विठ्ठलराव त्यांनी पिकवलेल्या हनुमान फळाची व्यवस्थित पॅकिंग करून त्याची विक्री वाशिम सह मुंबई व पुण्याला देखील करतात.
तसेच वाशिम ते सेलू बाजार रोडवर त्यांचे शेत असून त्या शेताजवळ ते स्टॉल लावतात व त्या ठिकाणाहून देखील त्याची विक्री होते. सध्या हनुमान फळाचा जर बाजारपेठेतील दर पाहिला तर तो किलोला शंभर ते दीडशे रुपये आहे
हे फळ महाग आहे परंतु विठ्ठलराव बरडे हे या फळाचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतात व नैसर्गिकरित्या पिकवतात त्यामुळे त्याला मागणी चांगली असते. विठ्ठलराव यांची हनुमान फळाची शेती पाहून गावातील आणखी काही शेतकऱ्यांनी हनुमान फळाची लागवड केली आहे. या फळाबद्दल जर शेतकऱ्यांचा अनुभव पाहिला तर त्यांच्या मते पारंपरिक पिकांपेक्षा या पिकातून चांगला नफा मिळतो.
कसे आहे या फळाचे स्वरूप?
हनुमान फळाचा आकार पाहिला तर प्रामुख्याने सीताफळापेक्षा थोडा मोठा असतो. यामध्ये बियांचे प्रमाण देखील कमी असते व त्या तुलनेत गर मात्र जास्त असतो. फळ खायला अत्यंत गोड असते. याबद्दल माहिती देताना विठ्ठलराव बरडे सांगतात की, तसे पाहायला गेले तर हे फळ जंगली फळ आहे.
परंतु यावर आता शास्त्रज्ञांनी संशोधन करून भारतामध्ये फळपीक म्हणून लागवडीकरिता ते विकसित करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या फळ पिकाला जास्त पाणी देण्याची गरज नाही व लागवडीनंतर सुरुवातीला एक दोन वर्ष विदर्भासारखे उष्ण तापमान असेल तर त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये एक ते दोन वेळा अत्यल्प पाणी देणे गरजेचे असते.
परंतु जेव्हा हनुमान फळाचे झाड मोठे होते तेव्हा त्याला पाणी देण्याची गरज भासत नाही. तसेच या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात या झाडाचे पूर्ण पाने गळतात. म्हणजेच त्याची पानगळ होते व पावसाळ्यामध्ये पुन्हा या झाडांना चांगली पालवी फुटते. साधारणपणे हनुमान फळ हे हिवाळ्याच्या कालावधीत विक्रीसाठी उपलब्ध होत असते.