Fertilizer Management:- कुठल्याही पिकाच्या भरघोस उत्पादनाकरिता रासायनिक खतांची आवश्यकता असते व त्यासोबतच गांडूळ खत व शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावर केला तर नक्कीच कुठल्याही पिकापासून बंपर असे उत्पादन मिळते. या अनुषंगाने मका या पिकाचा विचार केला तर हे खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाणारे पीक आहे.
सध्या हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम शेती व शेती पिकांवर होताना दिसून येतो. कधीकधी प्रचंड प्रमाणात असणारी उष्णता तर कधी कधी जास्तीचा पाऊस याचा विपरीत परिणाम हा पिकांवर होत असतो. भारतातील हवामान बदलाच्या नकारात्मक परिणामामुळे भारताला उन्हाळ्याच्या हंगामामध्ये उच्च तापमानाचा सामना करावा लागतो.
अशा परिस्थितीत मका हे पीक उन्हाळ्यात जास्त प्रमाणात लागवड केले जाते व बऱ्याचदा तीव्र सूर्यप्रकाश म्हणजेच तीव्र उन्हाच्या तडाख्याने मक्याला फटका बसण्याची शक्यता असते. तीव्र उन्हाच्या चटक्यामुळे मक्याच्या हिरव्या पानांचा दर्जा देखील कमी होतो व पानातील उतींचे नुकसान झाल्यामुळे पिकाला पोषक तत्त्वे मिळणे कठीण होते.
त्यामुळे उत्पादनावर याचा विपरीत परिणाम दिसून येतो. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मका पिकासाठी खतांचा वापर करून उत्पादन वाढवणे खूप गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून मका पिकासाठी खत व्यवस्थापन कसे करावे? याबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.
मका पिकाला हे खत वापरावे
मका पिकापासून जर अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर पेरणी करण्यापूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. पेरणी करण्या अगोदर चांगले कुजलेले शेणखत दहा ते पंधरा टन प्रति हेक्टर चांगले मिसळून घ्यावे. मक्याच्या संकरित व दर्जेदार जातीपासून जास्तीचे उत्पादन मिळवण्याकरिता योग्य वेळी पुरेशा प्रमाणात खत द्यावे.
पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करून घेणे खूप गरजेचे आहे. मक्याच्या संकरित जातीकरिता 100 ते 120 किलो नत्र, ६० किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टर द्यावे. स्फुरद व पालाशाचे पूर्ण मात्रा व सोबत अर्ध्या प्रमाणात नत्राचा वापर पेरणी करताना करावा. नत्राची उरलेली अर्धी मात्रा सारख्या प्रमाणामध्ये दोनदा विभागून द्यावी. यामध्ये पेरणी नंतर पहिली तीस ते पस्तीस दिवसांनी आणि दुसरी मात्र फवारणीच्या वेळी द्यावी.
बेबी कॉर्न मक्यामध्ये या खतांचा करा वापर
बेबी कॉर्न मक्याकरिता पेरणीच्या वेळी अर्धी मात्रा नत्र आणि पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी अर्धी मात्रा पिकामध्ये द्यावी. यामध्ये खत आणि खतांचे प्रमाण हे प्रजातींच्या काढणीच्या कालावधीवर देखील अवलंबून असते. लवकर पक्व होणाऱ्या जातींना साठ ते ऐंशी किलो नायट्रोजन, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालश लागते.
मध्यम आणि उशिरा पक्व होणाऱ्या जातींना 100 ते 120 किलो नायट्रोजनची आवश्यकता असते तर फॉस्फरस आणि पोटॅशचे प्रमाण समान असते. तसेच शेतामध्ये जर झिंकची कमतरता असेल तर शेवटची नांगरणी करताना zinkसल्फेट 20 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी तरी फरक पडतो. यामध्ये झिंक सल्फेट हे कुठल्याही फॉस्फेटिक खतामध्ये मिसळू नये.
अशाप्रकारे साधे व सोपे खत व्यवस्थापन हे मक्याचे भरघोस उत्पादन देण्यासाठी महत्त्वाचे ठरते.