Fig Cultivation:- सध्या अनेक सुशिक्षित तरुण हे नोकरी नसल्यामुळे शेती व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून वाडवडिलांपासून चालत आलेल्या शेतीच्या परंपरागत पिके व शेती पद्धती यांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून वेगवेगळ्या प्रकारची फळ पिके व भाजीपाला पिकांचे लागवडीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.
तरुणांनी सध्या शेती क्षेत्रामध्ये क्रांतीच घडवून आणली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यामध्ये जर आपण फळबागांचा विचार केला तर डाळिंब तसेच द्राक्ष व पेरू सारख्या परंपरागत फळ पिकांऐवजी ड्रॅगन फ्रुट तसेच काही ठिकाणी सफरचंद,
स्ट्रॉबेरी व अंजीर सारख्या पिकांची लागवड करून तरुणांनी आर्थिक प्राप्तीचा एक समृद्ध स्त्रोत निर्माण केला आहे. अगदी त्याच पद्धतीने आपण जालना जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील राहुल खोसे या तरुण शेतकऱ्याचा विचार केला तर यांनी अंजीर लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे.
राहुल खोसे यांचे अंजीर लागवडीतून लाखोत उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील युवा शेतकरी राहुल खोसे यांनी अंजीर लागवडीतून पहिल्याच वर्षी एक ते दीड लाखाचे उत्पन्न मिळवले आहे.
विशेष म्हणजे राहुल यांनी त्याच्या शेतात पिकवलेले अंजिराची विक्री व्यवस्थापन अतिशय उत्कृष्ट असे ठेवल्यामुळे अधिकचा नफा मिळताना दिसून येत आहे. येणाऱ्या कालावधीत या एक एकर अंजीर बागेतून त्यांना पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा देखील आहे.
अशा पद्धतीने राहुल खोसे यांनी केले अंजीर बागेचे व्यवस्थापन
अंजीर बागेतून आर्थिक समृद्धी साधताना मात्र राहुल खोसे यांनी प्रचंड प्रमाणात कष्ट देखील घेतले आहेत. 2021 मध्ये राहुल यांनी अंजीर लागवडीचा निर्णय घेतला व 230 रोपांची 12 बाय 15 अंतरावर एक एकर क्षेत्रात लागवड केली.
लागवड करण्यासाठी जेसीबीचा वापर करून बारा बाय पंधरा अंतरावर खड्डे खोदले व त्यामध्ये पालापाचोळा व कुजलेले शेणखताचा वापर करून अंजिराच्या रोपांची लागवड केली. तसेच रोपांना उणीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खड्ड्यांमध्ये चापमीठ घातले.
व्यवस्थापन करताना सुरुवातीला दहा किलो शेणखत तसेच दहा किलो लेंडी खत, पाच किलो गांडूळ खत अशी खते दिली तसेच 60 ते 70 हजार रुपयांच्या यासाठी खर्च आला. यामध्ये कृषी तज्ञांचा सल्ला घेत अंजीर शेतीचे व्यवस्थापन केले.
तसेच सुरुवातीला दोन वर्ष या अंजीर बागेत सोयाबीनचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव केला व या माध्यमातून इतर खर्च भागवला. व्यवस्थित व्यवस्थापन ठेवल्याने आता यातून उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे.
अंजिराचा विचार केला तर चार ते पाच वर्षाचे झाड झाल्यापासून सुमारे 15 किलो फळांचे एका झाडापासून उत्पादन मिळते. जेव्हा झाड पूर्णपणे परिपक्व होते तेव्हा एक झाड एका वेळी एक लाख वीस हजार रुपये पर्यंतचा नफा कमवून देऊ शकते.
स्टॉलवर केले विक्रीचे नियोजन
अंजीर विक्री करण्याकरिता राहुल यांनी चांगला दर मिळावा म्हणून व्यापाऱ्यांना अंजिराची विक्री न करता स्वतः अंबड, कुंभार पिंपळगाव या रस्त्यावर स्टॉल लावले व या स्टॉलच्या माध्यमातून विक्री केली. अशा पद्धतीने अंजीर लागवडीतून पहिल्याच वर्षी एक ते दीड लाखाचे उत्पन्न त्यांना मिळाले.