चार मित्र मिळून सुरू केले ‘एक मोकळा श्वास’ नावाचे कृषी पर्यटन केंद्र; एकदा द्याल भेट तर विसरून जाल जीवनातील ताणतणाव

चौघा मित्रांना निसर्ग पर्यटनाची आणि निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करण्याचा छंद होता. हे चौघे जण जेव्हा भटकंती करण्यासाठी निघायचे तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालायचे की पुढच्या पिढीची नाळ शेती आणि मातीशी कशी जोडता येईल व या सगळ्या विचारातूनच एक मोकळा श्वास नावाचे कृषी पर्यटन केंद्र जन्माला आले

Ajay Patil
Published:
krushi paryatan kendra

एकीचे बळ याविषयीच्या अनेक कथा आपण ऐकले असतील. एखादी गोष्ट एकट्याने करण्यापेक्षा जर ती एकत्र येऊन दोन-तीन जण मिळून केली तर सहजतेने पूर्ण होते व यशाच्या दिशेने झटकन वाटचाल देखील करते. याच पद्धतीने जर आपण निसर्ग भटकंती करण्याची आवड असणाऱ्या चार मित्रांची यशोगाथा बघितली तर या मुद्द्याची प्रचिती आपल्याला येईल.

या चौघा मित्रांना निसर्ग पर्यटनाची आणि निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करण्याचा छंद होता. हे चौघे जण जेव्हा भटकंती करण्यासाठी निघायचे तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालायचे की पुढच्या पिढीची नाळ शेती आणि मातीशी कशी जोडता येईल व या सगळ्या विचारातूनच एक मोकळा श्वास नावाचे कृषी पर्यटन केंद्र जन्माला आले व आज पाहता पाहता सहा एकर वर सुरू झालेले हे पर्यटन केंद्र 10 एकर परिसरामध्ये विस्तारले आहे.

 अशाप्रकारे झाली पर्यटन केंद्राची सुरुवात

या मित्रांपैकी रिंकू मरसकोल्हे नावाच्या मित्राची चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात असलेल्या चनाखा गावी माळरानावर सहा एकर जमीन होती. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी होती की या सहा एकर जमिनीचा आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य होता. याच जागेवर निसर्ग पर्यटन स्थळ उभारण्याचे या चौघांनी ठरवले.

त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कष्ट घेऊन पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी गोट फार्म उभारला.परंतु यामध्ये यश मिळाले नाही. त्यानंतर मात्र त्या ठिकाणी वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीवर त्यांनी भर देऊन उत्पन्न म्हणून आले लागवड केली व त्यातून सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.

नंतर स्वीट कॉर्न लागवड केली व या स्वीट कॉर्नला बाजारात कमी दर मिळाल्याने हे स्वीट कॉर्न खायला लोकांना जर शेतात बोलावले तर असा विचार मनात आला व त्यावरच त्यांनी काम सुरू केले. याकरिता त्यांनी चांगला भावात स्वीट कॉर्न विकता यावे म्हणून बांधावर येऊन हवे तितके स्वीट कॉर्न खा अशा पद्धतीची जाहिरात केली.

जे येतील त्यांच्याकरिता शंभर रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले व बांधावर बसून भाजलेले लिंबू, मीठ लावून स्वीट कॉर्न खाण्याची संधी लोकांना उपलब्ध करून दिली.

परंतु जर कोणाला खाण्यासाठी घरी न्यायचे असेल तर प्रति नग 20 रुपये असा दर ठेवला. या सगळ्या प्रयत्नांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला व शेतीमाल शेतीतूनच विकला तर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो हे त्यांना उमजले व त्यातूनच कृषी पर्यटनाचा विस्तार होत गेला.

 मराठमोळ्या पद्धतीने केले जाते पर्यटकांचे स्वागत

चंद्रपूर शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर हे पर्यटन केंद्र असून वर्षात आठ ते दहा हजार पर्यंटक या ठिकाणी भेट देतात व वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते. या ठिकाणी जे ही पाहुणे भेट देतात त्यांचे खास मराठमोळ्या पारंपारिक पद्धतीने हळद-कुंकू लावून औक्षण करून स्वागत केले जाते व टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पर्यटन स्थळी आणले जाते.

 मोकळा श्वास मध्ये आठवेल तुम्हाला तुमचे बालपण

नवीन पिढीला जुन्या पारंपारिक खेळांची ओळख व्हावी व त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून लगोरी तसेच विटी दांडू, माझ्या मामाच पत्र हरवलं तसेच रानमाकड, रस्सीखेच आणि सायकलिंग सारखा खेळांचा समावेश करण्यात आला आहे व याचा अनुभव पर्यटकांना जवळून घेता येतो.

लहानपणात शेतीचे आकर्षण मुलांमध्ये वाढावे याकरिता अनेक उपक्रम राबवण्यात येतात.याशिवाय वॉटर गेम करिता अनेक सोयी करण्यात आलेल्या आहेत.

या कृषी पर्यटन केंद्राला भेट दिल्यानंतर तुम्हाला  पाण्यातील साहसी खेळ अनुभवता येतात. यासोबतच जीप लाईन तसेच झिगझ्याग लाईन, कमांडो नेट सारख्या 11 प्रकारचे साहशी खेळांची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.

 हुरडा पार्टी ठरते स्पेशल मेजवानी

या ठिकाणी हुरडा पार्टीचे देखील आयोजन केले जाते व या हुरडा पार्टीच्या मेनूमध्ये वांग्याचे भरीत,हूरडा तसेच मठ्ठा, पाच प्रकारच्या चटण्या तसेच ठेचा इत्यादी मेनूचा समावेश केला जातो.

त्या ठिकाणी असलेल्या चेरीच्या बागेमध्ये हुरडा पार्टीचे आयोजन केले जाते. हुरडा पार्टीसाठी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी करार केला असून नगर जिल्ह्यातून हुरडा करीताची खास वाणाची ज्वारी आणली जाते.

 जेवणासाठी मिळतात हे खास पदार्थ

सगळं पर्यटन केंद्र फिरवून आल्यानंतर जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते तेव्हा तुम्हाला अस्सल शाकाहारी जेवणाचा आस्वाद त्या ठिकाणी घेता येतो.या शाकाहारी जेवणामध्ये वांग्याचे भरित तसेच पिठले भाकरी, जोडीला शेंगदाणा तसेच तिळाची चटणी,

कांदा आणि लिंबू व पापड असे सारे पदार्थ तुम्हाला खायला मिळतात. जेवण झाल्यानंतर स्वीट म्हणून गोड वरण हा खास पदार्थ येथे तुम्हाला खायला मिळतो. या गोड वरणमध्ये चणाडाळ तसेच विलायची, गूळ किंवा साखर तसेच तुप थोडे काजू मिसळलेले असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe