Agricultural News : शेतीमध्ये लागवड करण्यात आलेल्या पिकांवर विविध प्रकारच्या रोग व किडींचा प्रादुर्भाव कायम होत असतो. या रोग व किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात व त्या उपाययोजनाचाच भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली जाते.
याव्यतिरिक्त एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती देखील अवलंबल्या जातात. परंतु बऱ्याचदा या सगळ्या खटाटोपाचा काही सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. या किडींमध्ये जर आपण बघितले तर फळमाशी ही कीड भाजीपाला व फळ पिकांमध्ये सर्वात नुकसान करणारी कीड असून सर्व प्रकारचे वेलवर्गीय फळभाज्या तसेच काकडी,
कारली, कलिंगड, तोंडली, पडवळ इत्यादी वेलवर्गीय भाजीपाला पिके तसेच आंबा, बोर, द्राक्ष, चिकू आणि पेरू सारख्या फळांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. त्यामुळे नुकसानकारक अशा या फळमाशीचे नियंत्रण करता यावे याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून फळ माशांना आकर्षित करून मारण्यासाठी एक रासायनिक सापळा आता विकसित करण्यात आला
असून आठवड्यामध्ये या सापळ्यात बाराशे पर्यंत नर फळमाशी आकर्षित करून मारण्यात आल्याची नोंद देखील आता विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
रक्षक सापळा तयार करण्यामागील महत्त्व
जर आपण फळमाशीचे वैशिष्ट्य बघितले तर जोपर्यंत फळांची उपलब्धता असते त्यानुसार फळ माशांच्या अनेक पिढ्या वर्षभरामध्ये तयार होत असतात. याच कारणामुळे फळभाज्यांचे कमीत कमी 30 ते 60 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान यामुळे होते.
त्यामुळे साहजिकच या किडीचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी रासायनिक कीटकनाशकांचा प्रयोग करतात. परंतु फळ माशांच्या अळ्या फळांच्या आत असतात व कोष जमिनीत असल्यामुळे त्याचा फारसा फरक दिसून येत नाही.
दुसरे म्हणजे आपण जर फळभाज्यांची काढणी केली तर कुठल्याही पद्धतीने त्याचे साठवणूक न करता आल्यामुळे लगेच त्यांना विक्रीसाठी पाठवावे लागते. परंतु अशामुळे त्यात कीटकनाशकांचा अंश बऱ्याच प्रमाणात शिल्लक राहतो व तो मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठाच्या माध्यमातून हा रक्षक सापळा तयार करण्यात आला आहे.
या रक्षक सापळ्याचा वापर कोणत्या कालावधीत ठरेल फायद्याचा?
उदाहरणा दाखल जर आपण आंब्याचा विचार केला तर आंब्याच्या बागेमध्ये या सापळ्यांचा वापर करायचा असेल तर जेव्हा फळ साधारणपणे 60 ते 65 टक्के तयार व्हायचे असते त्या आधीपासून वापर करणे गरजेचे आहे. त्यासोबतच चिकू तसेच बोर व पेरू सारख्या फळांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव फळ जेव्हा तयार होते तेव्हा होतो.
त्यामुळे या सगळ्या कालावधींचा विचार करून रक्षक सापळ्यांचा वापर करणे गरजेचे आहे. या सापळ्यामध्ये जे काही रासायनिक खाद्य ठेवलेले असते ते एकदा ठेवले की सहा ते सात आठवड्यांपर्यंत तेच चालते. त्यानंतर परत दोन ते तीन मिली एवढे खाद्य जाळीदार डब्यात ठेवलेल्या बोळ्यांमध्ये घालावे लागते.
फळबागेमध्ये कसा कराल या रक्षक सापळ्यांचा वापर?
फळबागेमध्ये आणि वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये या सापळ्याचा वापर करता येतो. हा सापळा मंडपामध्ये जमिनीपासून 1 ते 2 ft उंचीवर राहिल अशाप्रकारे ठेवावा. तसेच आंब्याच्या बागेमध्ये झाडांची उंची लक्षात घेऊन साधारणपणे जमिनीपासून दोन ते तीन मीटर उंचीवर राहील अशा पद्धतीने त्याला टांगावा.
रक्षक सापळ्याचा वापर करताना तो जमिनीवर किंवा उंच वजनावर ठेवू नये. तसेच बागेमध्ये वापर करताना तो बागेच्या पूर्व दिशेला टांगावा. जास्त क्षेत्रामध्ये फळबाग असेल तर एका हेक्टर साठी चार सापळ्यांचा वापर फायद्याचा ठरतो.