नगर जिल्ह्यातील गीते बंधूंची कमाल! 3 भावांनी केली आहे 25 एकरमध्ये टोमॅटो लागवड, 2 कोटी उत्पन्न मिळण्याची आहे अपेक्षा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यावर्षी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाचे शेतकरी कर्जाच्या जोखडातून मुक्त तर झालेच परंतु बरेच शेतकरी करोडपती देखील झाले. यातील बरेच शेतकरी जर आपण पाहिले तर त्यांनी टोमॅटो लागवडीमध्ये सातत्य हे कायम ठेवल्याचे दिसून येते. म्हणजेच टोमॅटोला काही जरी भाव मिळाला किंवा रस्त्यावर फेकून द्यायची जरी वेळ आली तरी सुद्धा बरेच शेतकरी टोमॅटो लागवड करणे सोडत नाहीत.

अशाच प्रकारे टोमॅटो लागवडीमध्ये सातत्य ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना या वाढीव बाजार भावाचा यावर्षी फायदा मिळाल्याचे बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. जेव्हा सुरुवातीला यावर्षी दोन ते तीन रुपये किलो टोमॅटो जात होते तेव्हा बरेच शेतकऱ्यांनी टोमॅटो उपटून टाकले. परंतु काही शेतकऱ्यांनी पुढे बाजार भाव वाढतील या अपेक्षांनी टोमॅटो पिकाची मोठ्या कष्टाने जोपासना केली व त्याचे गोड व मधुर फळ शेतकऱ्यांना मिळाल्याचे सध्या महाराष्ट्राचे चित्र आहे.

अगदी त्याच पद्धतीने जेव्हा लोक टोमॅटो उपटून फेकत होते तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या सोनोशी या गावच्या गीते बंधूंनी तब्बल 25 एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली. याच तीनही भावांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 गीते बंधूंनी केली 25 एकरमध्ये टोमॅटोची लागवड

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या सोनूशी या गावचा गीते परिवार असून एकत्र कुटुंब पद्धतीत 14 जण राहतात. हे तीन भावंड असून यामध्ये भाऊसाहेब हे मोठे असून ते शेती पाहतात. तसेच दुसरे बंधू हे डॉ. लहाणू हे असून ते डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ आहेत व यांचे तिसरे बंधू हरिभाऊ हे शासनाच्या जलसंधारण विभागात अभियंता या पदावर सेवा बजावत आहेत.

परंतु या तीनही भावांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा एक भाऊ शेती करतो.परंतु हे दोन्ही सरकारी सेवेत असणारे भाऊ देखील शेती करणाऱ्या भावाच्या सोबत उभे राहून शेतीत लक्ष घालतात. यावर्षी तर गीते कुटुंबाने टोमॅटो पीक मोठ्या कष्टाने जतन केले असून शेततळ्यातील पाणी संपल्याने दररोज 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च करत टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवत टोमॅटोची बाग फुलवली आहे.

या भावंडांचे एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून ते टोमॅटोचे उत्पादनात सातत्य ठेवून असून कधी त्यांना या कालावधीत बऱ्याचदा भाव चांगला मिळाला परंतु कधी खर्च देखील निघणे कठीण झाले. परंतु तरी देखील त्यांनी टोमॅटोची लागवड सोडली नाही. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे या वर्षी जेव्हा मे महिन्याच्या सुरुवातीला शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत होते. अगदी त्याच वेळी गीते बंधूंनी टोमॅटोची लागवड केली.

यावर्षी पाऊस खूपच कमी झाल्यामुळे  त्यांनी त्यांच्या शेतामध्ये सिंचनाची सोय व्हावी म्हणून दोन एकर मध्ये शेततळे खोदले असून या शेततळ्याला देखील पाणी राहिले नसल्यामुळे ते आता टँकरच्या माध्यमातून तीन हजार रुपये प्रति टँकर या दराने 12 ते 13 टँकर दररोज पाणी आणून ते टोमॅटो पिकाला देत आहेत. एका बाजूला त्यांना पाण्यासाठी अमाप पैसा टाकावा लागत आहे तर दुसरीकडे मजुरांचा खर्च देखील वाढत आहे.

तसेच टोमॅटो वरील खते व कीड नियंत्रणाकरिता आवश्यक फवारणीचा खर्च देखील वाढला आहे. हे तिघे भाऊ यांच्यापैकी दोन भाऊ सरकारी नोकरीत असताना देखील ते मोठे बंधू भाऊसाहेब यांना शेतीत मदत करतात. अगदी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते बियाण्याची निवड इथपासून ते त्यांना मदत करत असतात.

पाण्याच्या सोयीसाठी त्यांनी दोन एकर क्षेत्रावर शेततळे उभारले असून संपूर्ण पंचवीस एकर क्षेत्र ड्रीपच्या माध्यमातून सिंचनाखाली आणले आहे. यावर्षी त्यांनी 25 एकर मधून 35000 क्रेट उत्पादन मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. जर सध्याचा बाजार भाव पाहिला तर त्यानुसार दोन कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल अशी आशा देखील त्यांना आहे.

 अशा पद्धतीचे आहे त्यांची टोमॅटो शेती

त्यांनी तब्बल 25 एकर वर टोमॅटो लागवड केली असून याकरिता सिजेंटा 6242 टोमॅटोच्या वाणाची निवड केली आहे. साधारणपणे मे महिन्यात त्यांनी ही लागवड केली होती व आता काढणी सुरू झाली आहे. परंतु यावर्षी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे त्यांनी जे काही दोन एकर मध्ये शेततळे उभारले आहे त्यातील पाणी संपत आले असून गेल्या 20 ते 22 दिवसांपासून त्यांना दररोज 12 ते 15 टँकरने शेतीला पाणीपुरवठा करावा लागत आहे.

तीन हजार रुपये प्रतिटॅंकर अशा रेटमुळे दररोज त्यांना तीस ते चाळीस हजार रुपयांचा खर्च टँकरवर करावा लागत आहे. यावर्षी 35000 क्रेट टोमॅटोचे उत्पादन मिळण्याचे अपेक्षा त्यांना असून आज चांगले भाव असल्यामुळे आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळण्याची शक्यता त्यांना आहे.

एवढेच नाही तर 2018 मध्ये देखील त्यांनी टोमॅटो शेतीतून सव्वा कोटींचे उत्पन्न घेतले असल्याचे गीते यांनी सांगितले. अशा पद्धतीने जर आपण एखाद्या पिकांमध्ये कायम सातत्य ठेवले तर नक्कीच एखाद्या वेळी चांगला बाजार भाव मिळून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होऊ शकतो हेच यांच्या उदाहरणावरून दिसून येते.