Onion Seeds:- महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते व दिवसेंदिवस नासिक व सोलापूर सोडून आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील कांद्याची लागवड वाढू लागली आहे. महाराष्ट्रमध्ये कांदा हा प्रामुख्याने खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये लावला जातो.
आताचा कालावधी हा खरीप हंगामातील कांदा रोपवाटिका टाकण्याचा असून बरेच शेतकरी त्यामुळे आता कांदा बियाणे खरेदीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत.
हीच परिस्थिती ओळखून शेतकऱ्यांना दर्जेदार असे कांद्याचे बियाणे मिळावे याकरिता राज्यातील महत्त्वाचे असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी फुले समर्थ व फुले बसवंत ७८० या वाणांचे कांद्याचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कांदा बियाण्याची विक्री
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फुले समर्थ व फुले बसवंत 780 हे कांद्याचे बियाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेले आहे व या बियाण्याची विक्री आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 मे 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. या बियाण्याची विक्री विद्यापीठाचे जे काही कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी केली जात आहे.
कोणत्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे कांदा बियाणे?
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विक्री केले जात असलेल्या फुले समर्थ व फुले बसवंत 780 या कांदा वाणाच्या बियाण्याची विक्री हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यापीठातील मध्यवर्ती परिसरातील बियाणे विक्री व ज्या ठिकाणी कांदा लागवड जास्त होते अशा नाशिक, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात करण्यात येत आहे व यामध्ये….
1- कृषी संशोधन केंद्र, निफाड,जिल्हा नाशिक
2-कांदा, लसुन व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत( नासिक)
3- कृषी महाविद्यालय, मालेगाव( नासिक)
4- कृषी संशोधन केंद्र, लखमापूर( नासिक)
5-कृषी विज्ञान केंद्र, धुळे
6-कृषी महाविद्यालय, हाळगाव, ता.जामखेड( अहमदनगर)
7- कृषी संशोधन केंद्र,चास( अहमदनगर)
8- कृषी संशोधन केंद्र,बोरगाव( सातारा)
9- कृषी महाविद्यालय, पुणे
इत्यादी ठिकाणी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून या कांदा वानांच्या बियाण्याची विक्री सुरू करण्यात आली आहे.
किती आहे या कांदा बियाण्याचा दर?
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून जे काही फुले समर्थ व फुले बसवंत ७८० या वाणाचे कांदा बियाणे विक्री केले जात आहे त्याचे दर पंधराशे रुपये प्रतिकिलो प्रमाणे असून शेतकऱ्यांना ते त्यांच्या जिल्ह्यामध्येच उपलब्ध होणार आहे.