शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक आर्थिक लाभाच्या योजना सध्या कार्यान्वित असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध पिकांची लागवडीपासून तर काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान इत्यादी घटकांकरिता अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते.
याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारच्या देखील अनेक योजना आहेत व त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे अटल बांबू समृद्धी योजना होय. अटल बांबू समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांबू लागवडीकरिता टिशू कल्चर रोपांच्या पुरवठ्यापासून तर देखभाल व आवश्यक गोष्टींकरिता अनुदान स्वरूपामध्ये मदत करण्यात येते.
या अंतर्गत आता महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून अटल बांबू समृद्धी योजनेसाठी चालू वर्ष 2024( पावसाळा) बांबू लागवड योजनेकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज प्रामुख्याने नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने तात्काळ सादर करण्याचे आवाहन येथील करण्यात आलेली आहे.
कसे आहे अटल बांबू समृद्धी योजनेचे स्वरूप?
या योजनेच्या माध्यमातून बांबूची टिशू कल्चर बांबू रोपे पुरवठा व त्यांची देखभाल इत्यादी करिता प्रत्येक शेतकऱ्याला 50 टक्के रक्कम एकूण रुपये 175 रुपये अनुदान म्हणून तीन वर्षात देण्यात येईल. हे अनुदान तीन वर्षात विभागले असून यामध्ये प्रथम वर्षात 90 रुपये, दुसऱ्या वर्षात पन्नास रुपये आणि तिसऱ्या वर्षात 35 रुपये प्रतिरोप याप्रमाणे देण्यात येणार आहे.
यामध्ये पुरवठा करण्यात आलेल्या रोपांची जी काही रक्कम राहील ती अनुदानाच्या प्रथम वर्षीय हप्त्यातून समायोजित करण्यात येईल. या योजनेच्या अंतर्गत एका शेतकऱ्याला दोन हेक्टर क्षेत्रासाठी 600 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टर करिता बाराशे बांबू रोपांची पाच मीटर बाय चार मीटर अंतरावर लागवड व देखभालीकरिता अनुदान मूल्यांकन केल्यानंतर वर्षाच्या शेवटी देण्यात येईल.
या योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांची निवड कशी केली जाते?
बांबू लागवडीसाठी बांबूची कोणती प्रजात निवडायची याबाबत शेतकऱ्यांनी जाणकारांकडून माहिती घेऊन किंवा स्वतः योग्य पद्धतीने प्रजातींची निवड करून प्रजातीनिहाय संख्या ऑनलाईन अर्ज नमूद करावी. यामध्ये शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, बांबू शेतकऱ्यांचा समूह तसेच नोंदणीकृत संस्था यांचे सभासदांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अशा शेतकऱ्यांची यादी पूर्ण तपशीला सोबत महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडे सदर संस्थेने लिखित स्वरूपात कळवणे
यामध्ये अभिप्रेत आहे. प्राप्त अर्जांची कागदपत्रे तपासणी केल्यानंतर चालू वर्षी पावसाळ्यात महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कडून टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यात येईल. याबाबतचे अधिक माहिती हवी असेल तर नाशिक वनवृत्त महाराष्ट्र बांबू विकास मंडळाशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
या योजनेत कोणाला देण्यात येते प्राधान्य?
अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा समूह व नोंदणीकृत संस्था इत्यादी सभासदांनी जर एकत्रित अर्ज केला तर त्याला प्राधान्य देण्यात येईल.
त्यानंतर वैयक्तिक म्हणजेच एकट्या शेतकऱ्यांचा अर्जाचा विचार होईल. अर्ज करताना अर्जासोबत आधार कार्ड तसेच नवीन सातबारा उतारा, बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स किंवा कॅन्सल केलेला धनादेश इत्यादी कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.