Grape Farming : धक्कादायक ! द्राक्ष शेती व्यापाऱ्यांसाठीच फायद्याची शेतकऱ्यांसाठी मात्र नाकापेक्षा मोती जड

Ajay Patil
Published:
grape farming

Grape Farming : मित्रांनो खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये मोठा बदल केला आहे. उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने गेल्या काही दशकांपासून शेतकरी बांधवांनी फळबाग शेती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांनी द्राक्ष आणि डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात केली असून सुरुवातीच्या टप्प्यात यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत होती.

मात्र आता निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष शेती तोट्याचा  व्यवहार सिद्ध होत आहे. द्राक्ष शेतीच्या बाबतीत आता नाकापेक्षा मोती जड अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढलेली महागाई पाहता द्राक्ष बागा जोपासण्यासाठी आवश्यक रासायनिक खत, शेणखत, कीटकनाशक, मजुरी यांसाठी शेतकरी बांधवांना एकरी साडेचार लाखांपर्यंतचा खर्च करावा लागत आहे.

एवढा जंगी खर्च करून शेतकऱ्यांना मात्र साडेचार लाखांपर्यंतचे एकरी उत्पन्न मिळत आहे म्हणजेच एकरी 50 हजारांचा फायदा शेतकऱ्यांना यातून होत आहे. अशा परिस्थितीत द्राक्ष बागेसाठी केलेला हा खटाटोप शेतकऱ्यांच्या चांगलेच अंगलट आल्याचे चित्र आहे. दरम्यान द्राक्ष लागवडीसाठी शेतकरी बांधवांना सुरुवातीच्या टप्प्यात लाख रुपयांचा खर्च करावा लागतो तो अलगच आहे.

यामुळे द्राक्ष शेतीचा प्रयोग आता हा पूर्णतः फसला असून शेतकऱ्यांना आता द्राक्ष बागा नकोशा झाल्या आहेत. मित्रांनो द्राक्ष बागा सांगली जिल्ह्यात सर्वाधिक पाहायला मिळतात. खरं पाहता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र द्राक्ष शेतीसाठी ओळखला जातो. सांगली जिल्हा देखील द्राक्ष बागेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. एका आकडेवारीनुसार सांगली जिल्ह्याला द्राक्ष निर्यातीतून वार्षिक पाच हजार कोटींचे परकीय चलन मिळते. मात्र यातून खरा फायदा शेतकऱ्यांना हा होत नसून याचा खरा फायदा हा उद्योगाला होत आहे. त्याचा फायदा द्राक्ष व्यापाऱ्यांना, औषधी कंपन्यांना, दलालांना तसेच शेती सल्ला देणाऱ्या सल्लागारांना होताना पाहायला मिळत आहे.

मित्रांनो खरं पाहता 2009 पूर्वी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष शेतीतून चांगले उत्पन्न मिळत होते. एकरी तीन ते चार लाखांपर्यंतची उत्पन्न त्यांना त्यावेळी मिळत होते. मात्र आता हवामान बदलामुळे द्राक्षबागा जोपासण्यासाठी अधिकचा उत्पादन खर्च करावा लागत असल्याने द्राक्ष शेती शेतकऱ्यांसाठी तोट्याची सिद्ध होत आहे. पूर्वी एका हंगामात 40 ते 45 औषधाच्या फवारण्या कराव्या लागत होत्या तर आता जवळपास 90 ते 95 फवारण्या द्राक्ष बागेसाठी करावया लागत असल्याचे शेतकरी नमूद करतात.

साहजिकच यामुळे उत्पादन खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या मते 2009 च्या पूर्वी शेतकऱ्यांना द्राक्ष उत्पादित करण्यासाठी केवळ 50000 रुपयांपर्यंतचा उत्पादन खर्च करावा लागत होता. मात्र आता उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून एकरी चार लाखांपर्यंतचे उत्पादन खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो.

शेतकऱ्यांच्या मते द्राक्ष बागेतून एकरी दहा टन पर्यंत उत्पादन गृहीत धरल्यास आणि उत्पादित झालेल्या मालाला 45 रुपये किलो सर्वसाधारण बाजार पकडल्यास एकरी साडेचार लाखांची कमाई शेतकऱ्यांना होते आणि द्राक्ष शेतीसाठी शेतकऱ्यांना चार लाख रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे द्राक्ष बागा म्हणजे अंगापेक्षा बोंगा जास्त अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe