या खतांचा वापर करा आणि खतांवरील खर्च टाळा! नापिक जमीन देखील होईल एकदम सुपीक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला जातो. परंतु हा रासायनिक खतांचा वापर करताना तो अगदी बेसुमार पद्धतीने होत असल्यामुळे  त्याचा विपरीत परिणाम हा वातावरणावर तर होतोच परंतु जमिनीचे आरोग्य म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होण्यावर देखील होत आहे. तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील रासायनिक खतांचा बेसुमार वापर हा हानिकारक आहे.

त्यामुळे आता बरेच शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करताना दिसून येतात व याकरिता शेणखत व कंपोस्ट खत तसेच गांडूळ खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु या सगळ्या प्रकारच्या खतांचा विचार केला तर यासाठी आपल्याला खर्च करावाच लागतो आणि त्यामुळे उत्पादन खर्चात देखील वाढ होते. या सगळ्या खतांऐवजी जर शेतकरी बंधूंनी हिरवळीच्या खतांचा वापर केला तर कमीत कमी खर्चामध्ये शेतात सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा तर केला जातोच परंतु जमिनीचे आरोग्य देखील खूप चांगल्या पद्धतीने सुधारते.

म्हणजेच रासायनिक खतच नाही तर शेणखत आणि कंपोस्ट खतांना उत्तम पद्धतीचा पर्याय म्हणून हिरवळीचे खत आपण शेताकरिता वापरू शकतो. तसे पाहायला गेले तर शेणखत पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता आणि जमिनीच्या उत्तम आरोग्य करिता खूप महत्त्वाचे आहे. परंतु कुजलेले व चांगल्या दर्जाचे शेणखताची उपलब्धता सध्या कमी होताना दिसून येत आहे व त्यामुळेच त्याला पूरक म्हणून हिरवळीचे खत हा एक उत्तम पर्याय आहे. त्या अनुषंगाने आपण या लेखात हिरवळीच्या खतांचे प्रकार आणि इतर महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

 हिरवळीच्या खतांचे कोणते आहेत प्रकार?

1- हिरवळीच्या पिकांची लागवड आणि नंतर शेतात गाडण्याची पद्धत या प्रकारामध्ये ताग आणि धैचा सारखे हिरवळीचे पीक शेतामध्ये वाढवले जातात व नंतर त्यांना शेतामध्ये व्यवस्थित गाडले जातात. ही पिके स्वतंत्र पद्धतीने देखील लागवड करता येतात किंवा इतर पिकांसोबत आंतरपीक म्हणून देखील यांचा अंतर्भाव आपण करू शकतो. ताग तसेच  धैचा, गवार किंवा चवळी इत्यादी पिकांचा यामध्ये समावेश होतो.

2- हिरवळीचे खत म्हणून हिरव्या पानांचा वापर यामध्ये वनस्पतींची हिरवी पाने व कोवळ्या फांद्या तसेच झुडपे, शेताच्या बांधांवरील वनस्पती, पडीक जमीन तसेच जंगलामध्ये वाढलेल्या झाडांची हिरवी पाने व कोवळ्या फांद्या गोळा करून जमिनीमध्ये काढतात व याकरिता प्रामुख्याने गिरीपुष्प, सुबाभूळ आणि शेवरी सारख्या वनस्पतींचा समावेश केला जातो किंवा वापर केला जातो.

 हिरवळीच्या पिकांची निवड कशी करावी?

शेतामध्ये जर हिरवळीच्या खताकरिता हिरवळीचे पीक घ्यायचे असेल तर ते कमी कालावधीत उत्तम पद्धतीने वाढणारे व भरपूर असा हिरवा पाला देणारे असावे. तसेच या पिकाच्या फांद्या या कोवळ्या तसेच लुसलुशीत असणे गरजेचे असून यामुळे जमिनीमध्ये पाणी अथवा फांद्या कुजण्याची क्रिया लवकर होते.

तसेच हे पीक अगदी सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीमध्ये जलद गतीने वाढणारे असावे म्हणजेच यामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. हिरवळीचे पिके द्विदल वर्गातील असणे गरजेचे आहे. याचा फायदा असा होतो की वातावरणातील जो काही नत्र असतो तो स्थिर होण्यास मदत होते. तसेच लागवड केलेल्या पिकाची मुळे जमिनीमध्ये खोलवर जाणारी असली तर जमिनीच्या खालच्या थरातील जे काही अन्नद्रव्य असतात ते पिके शोषून घेतात.

 हिरवळीच्या खतांसाठी उपयुक्त पिके

1- उन्हाळ्यात लागवड करण्यासाठी महत्त्वाची पिके उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला हिरवळीची पिके लागवड करायची असेल तर त्याकरिता जलद वाढणारे धैचा, ताग इत्यादी पिकांची लागवड मे आणि जून महिन्यात करावी व खरीप हंगामातील पिकांचे जेव्हा लागवड केली जाते त्या अगोदर साधारणपणे जुलै आणि ऑगस्ट मध्ये ती जमिनीमध्ये गाडावीत.

2- शेतामध्ये मुख्य पिकांच्या ओळींमध्ये हिरवळीचे पीक लागवड करणे यामध्ये जेव्हा शेतात काही इतर मुख्य पिकांची लागवड कराल तेव्हा त्या पिकाच्या दोन ओळींमध्ये हिरवळीची पिके आंतरपीक म्हणून घेणे गरजेचे आहे. या प्रकारामध्ये तुम्ही मुख्य पिकासोबत ताग, मका आणि कापूस या बागायती पिकांसोबत ताग, चवळी किंवा उडीद, मूग किंवा हरभरा, ऊस या मुख्य पिकासोबत  धैचा किंवा ताग ही हिरवळीची पिके घेतली जातात. सात ते आठ आठवड्यांनी ही पिके जमिनीमध्ये गाडणे गरजेचे आहे.

3- मोकळ्या जमिनीमध्ये हिरवळीची पिके घेणे खरीप हंगामामध्ये ताग तसेच चवळी व इतर भाजीपाला पिके लागवड करून हिरवळीच्या खताचा वापर केला जातो. परंतु ही पद्धत काहीशी फायदेशीर नाही कारण यामुळे संपूर्ण एक हंगाम वाया जाण्याची भीती असते.

4- हिरवळीच्या पिकाचा मुख्य पीक म्हणून समावेश जमीन जर क्षारयुक्त, चोपण असेल तर अशी जमीन सुधारण्यासाठी मुख्य पीक म्हणून हिरवळीच्या पिकाचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच वालुकामय मुरदा असलेल्या जमिनीत देखील पीक फेरपालट करण्यासाठी हिरवळीचे पिके फायद्याचे ठरतात.

 हिरवळीच्या पिकांचे जमिनीला काय होतात फायदे?

जेव्हा हिरवळीचे पिके जमिनीमध्ये गाडली जातात तेव्हा सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यास मदत होते व जमिनीमध्ये जे काही फायद्याचे सूक्ष्मजीवाणू असतात त्यांची संख्या देखील वाढते व जैविक गुणधर्म सुधारतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे हिरवळीची पिके जमिनीचा जो काही खोलवर असलेला थर आहे

त्यातून उपयुक्त अन्नद्रव्य शोषून घेतात व कालांतराने जेव्हाही पिके जमिनीमध्ये गाडली जातात तेव्हा अन्नद्रव्यांची उपलब्धता मातीच्या वरच्या थरात वाढण्यास मदत होते. तिसरे म्हणजे हे पिके द्विदल वर्गीय असल्यामुळे हवेतील नत्र जमिनीत स्थिर करण्यास मदत करतात. तसेच जमीन जर हलकी असेल किंवा उथळ असेल तर अशा जमिनीची जलधारणाशक्ती वाढवण्यासाठी मदत होते.

तसेच रासायनिक खतातील पाण्याच्या माध्यमातून जे काही अन्नद्रव्ये वाहून जातात त्याला अटकाव होतो. जमीन जर कठीण असेल तर हिरवळीच्या खतांमुळे जमिनीची घनता सुधारते व घनता कमी होऊन हवा खेळती राहते. तसेच काळ्या, खोल जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो व जमीन वापसा स्थितीत लवकर येते. पावसाच्या पाण्यामुळे मातीची धूप  कमी होण्यास मदत होते.

हिरवळीच्या पिकांची वाढ जोमदार व जलद असल्यामुळे त्यामध्ये तणांचा प्रादुर्भाव होत नाही. धैचा सारखी हिरवळीचे पिके चोपण जमिनीमध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे वाढत असल्यामुळे अशी जमीन सुधारण्याकरिता जिप्सम सारख्या भू-सुधारकाबरोबर हे पीक जमिनीमध्ये गाडावे.

अशा पद्धतीने जमिनीची सुपीकता जर तुम्हाला उत्तम पद्धतीने ठेवायचे असेल तर किमान दोन ते तीन वर्षातून एकदा तरी हिरवळीची पिके लागवड करून त्यांना जमिनीत गाडणे महत्त्वाचे आहे.