Ginger Farming:- बाजारपेठेचा अभ्यास करून जर पीक लागवडीचे नियोजन केले तर नक्कीच शेतीमधून देखील चांगला आर्थिक नफा मिळवता येतो हे आपल्याला अनेक शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. म्हणजेच विकेल ते पिकेल या धर्तीवर पीक लागवडीचे नियोजन केले तर हे शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदा देणारे ठरेल.
त्यासोबतच लागवडीनंतर सुधारित तंत्रज्ञानाचा वापर आणि पीक व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान येऊ घातले असून या तंत्रज्ञानाला शेतकऱ्यांची कष्टाची जोड मिळाली तर भरघोस उत्पादन मिळतेच.
त्यानंतर फक्त गरज राहते ती बाजारपेठेत योग्य दर मिळण्याची. अगदी याच पद्धतीने जर आपण इंदापूर मधील भारत शिंदे या शेतकऱ्याचा विचार केला तर यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये आल्याचे उत्तम असे पीक घेतले असून जर चांगला दर मिळाला तर या दीड एकरमधून त्यांना अठरा ते वीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.
त्यांनी छान पद्धतीने आले पिकाची जोपासना केली असून त्यामुळे भरघोस उत्पादन मिळेल हे तर त्यांना माहिती आहे. पण बाजारातील दर योग्य मिळणे गरजेचे आहे.
दीड एकर आले लागवडीतून सोळा ते अठरा लाखापर्यंत उत्पन्न मिळण्याची आहे अपेक्षा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर मधील भारत शिंदे हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीला होते व ते निवृत्त झाल्यानंतर पूर्णवेळ शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. बाजार समितीमध्ये नोकरीला असल्याकारणामुळे त्यांना कोणत्या वेळेला कोणत्या शेतीमालाला दर मिळू शकतो याची चांगली जाण आहे व त्यामुळेच त्यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये आले लागवड करण्याचा निर्णय घेतला.
याकरिता त्यांनी 15 मार्चच्या आसपास बियाण्याकरिता आणलेल्या आल्याची भट्टी लावली व साधारण 20 एप्रिल नंतर त्यास कोंब फुटायला सुरुवात झाली व त्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकरी किमान 1000 किलो याप्रमाणे आल्याच्या कंदांची लागवड केली.
ही लागवड करण्याअगोदर त्यांनी शेतीची योग्य प्रकारे अशी मशागत केली व त्याकरिता दोन वेळा नांगरणी, एक वेळा कल्टीवेटर आणि त्यानंतर रोटावेटर वापरून शेतीची मशागत करून घेतली व एका एकरकरिता आठ ट्रॅक्टर चांगले कुजलेले शेणखत वापरले. त्यानंतर ट्रॅक्टरचा वापर करून साडेचार फूट अंतरावर बेड तयार केले.
आले पिकावर कंदकुज किंवा मररोग यासारख्या घातक रोगांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता लागवड करतानाच बुरशीनाशक व कीटकनाशकांचा वापर बियाण्यासाठी केला. लागवड केल्यानंतर साधारणपणे 20 ते 25 दिवसाच्या अंतराने पावर टिलरच्या साह्याने पहिली मातीची भर म्हणजेच मुजवटा लावून घेतला.
अशाप्रकारे माती लावत असताना एका एकरसाठी दोन बॅग 10:26:26, दोन बॅग 14:7:14,दोन बॅग सुपर गोळी इत्यादीचा वापर करून त्याला मातीत चांगले दाबून घेतले व त्यानंतर मुळकुज व कंदकुज होऊ नये याकरिता ठिबकच्या माध्यमातून सुडोमोनास व ट्रायकोडर्मा यांचा वापर केला. तसेच आठवड्यातून एकदा चार किलो 19:19:19 आणि चार किलो 12:61:0 व 0:52:34 चार किलो अशा पद्धतीने विद्राव्य खतांचे देखील चांगले व्यवस्थापन केले.
अशाप्रकारे योग्य व्यवस्थापन ठेवल्यामुळे त्यांना एकरी 20 ते 22 टन उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. या दीड एकर साठी त्यांना बियाण्यापासून तर माती लावणे तसेच निंदणी इत्यादी सर्व खर्च मिळून तीन ते चार लाख रुपये एकूण खर्च आला आहे. जर एकरी 30 टनापर्यंत उत्पादन निघाले व योग्य दर मिळाला तर 18 ते 20 लाख रुपये आर्थिक उत्पन्न मिळेल असा विश्वास त्यांना आहे.