पशुपालन व्यवसाय हा शेती सोबत केला जाणारा प्रमुख असा जोडधंदा असून भारतीय शेतकरी अगदी पूर्वापार पशुपालन व्यवसाय करत आलेले आहेत. परंतु आता या व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि संकरित गाई विकसित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून हा व्यवसाय केला जातो.
सध्या दुधाचे वाढीव उत्पादन हा या व्यवसायाच्या माध्यमातून प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे दर्जेदार व जातिवंत अशा दुधाळ जनावरांची खरेदी करणे खूप गरजेचे असते. जातिवंत जनावरे असतील तरच त्यांच्या माध्यमातून मिळणारे दुधाचे उत्पादन चांगले मिळते व आर्थिक प्राप्ती देखील चांगली होते.
बऱ्याचदा शेतकऱ्यांना दूध व्यवसाय सुरू करायचा असतो व त्याकरिता बाजारातून दुधाळ जनावरे खरेदी करण्यावर भर दिला जातो. परंतु दुधाळ जनावरे खरेदी करताना बऱ्याचदा आपली फसवणूक होण्याची शक्यता असते.
अशाप्रकारे फसवणूक झाल्यामुळे पैसा तर जातोच परंतु हाती काहीच लागत नाही आणि वरून मानसिक त्रास होतो तो वेगळाच. त्यामुळे बाजारातून दुधाळ जनावरे खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला होणारी फसवणूक टाळता येऊ शकते.
बाजारातून दुधाळ जनावरे खरेदी करताना ही काळजी घ्या
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही बाजारामध्ये जनावरांची पाहणी कराल तेव्हा त्यांचा पाठीचा कणा पहावा. जनावरांचा पाठीचा कणा वाकलेला असू नये.
2- तसेच जनावरांची पहिली बरगडी दिसत असेल तर ते सामान्य असते. परंतु जर जनावराची तिसरी बरगडी दिसत असेल तर ते जनावर अशक्त असू शकते.
3- गाईची खरेदी करत असाल तर तिचे पोट आणि छातीचा भाग लांब, खोल आणि रुंद असणे गरजेचे आहे व त्यासोबतच उत्तम खाद्य पचवू शकेल अशी क्षमता असलेल्या जनावरांची निवड करावी.
4- तसेच जनावर घेताना त्याची कास आणि सड याची तपासणी करणे गरजेचे आहे. दुधाळ जनावराच्या कासेची खोली माफक व क्षमता पुरेशी असणे गरजेचे आहे. तसेच जनावराचा सड हा त्याच्या कासेच्या प्रत्येक चतुर्थांश अशा पद्धतीने प्रमाणबद्ध असावा व तो काटकोनात स्थित असावा.
5- तसेच मागच्या बाजूची कास उंच, रुंद व घट्टपणे शरीराशी संलग्न असावी. किंचित वर्तुळाकार पद्धतीने मुळात जोडलेली असणे गरजेचे असून कासेचे विभाजन पुरेशा प्रमाणात संतुलित असावे.
6- तसेच दुधाळ जनावरांचा सड हा दंडगोलाकार, एक समान आकाराचे व मध्यम लांबी आणि व्यासाचे असावेत. तसेच कासेला चार पेक्षा जास्त सड असू नयेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सडातून हृदयाकडे जाणारी रक्तवाहिनी ही फुगीर व प्रशस्त असावी.
7- तसेच तुम्हाला जनावराचे वय माहिती करून घ्यायचे असेल तर तुम्ही दातांची पाहणी करून त्याच्या वयाची खात्री करू शकतात.
8- तसेच जनावराला काही आजार वगैरे आहे का याची माहिती तुम्ही जनावरांच्या बाह्य लक्षणांवरून करू शकतात. समजा जनावराच्या डोळा किंवा नाकातून काही स्त्राव येत असतील तर ते जनावर आजारी असल्याचे लक्षण आहे. त्यासोबतच जनावराचा योनी मार्ग किंवा गुद्दारातून रक्त वगैरे किंवा स्त्राव येत असेल तर ते देखील आजारपणाचे लक्षण आहे. तसेच आजारी जनावर हे दिसायला सुस्त तसेच मलुल आणि काहीश्या प्रमाणात अशक्त झालेले दिसतात.
9- दुसरे महत्त्वाचे म्हणजे सदर जनावराला आजारापासून वाचण्यासाठी नियमित लसीकरण केले केले आहे का याची चौकशी करावी. केले असेल तर तसे पशुवैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याचा आग्रह समोरच्या व्यक्तीला करावा.
10- जर्सी किंवा होलेस्टिन गाई घ्यायच्या असतील तर प्रामुख्याने डोंगराळ भागात जर्सी संकरित गाई पालनासाठी चांगले असतात तर होलस्टीन या संकरित गाई पठारी भागामध्ये संगोपनासाठी चांगल्या असतात व त्याप्रमाणेच खरेदी करावे.