Animal Care Tips: ‘या’ लक्षणांवरून ओळखा जनावर आजारी आहे की नाही! टाळता येईल जनावरांचा मृत्यू

Ajay Patil
Published:
animal care tips

Animal Care Tips:- पशुपालन व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी आहार व्यवस्थापन आणि जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण पशुपालन व्यवसायामध्ये दुधाचे उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो व दुधाचे उत्पादन हे जनावरांचा आहार आणि आरोग्य या बाबींवर प्रामुख्याने अवलंबून असते.

त्यामुळे दोन्ही प्रकारचे व्यवस्थापन अगदी चोखपणे पार पाडणे खूप गरजेचे आहे. यामध्ये आरोग्य व्यवस्थापनाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य व्यवस्थापनाच्या बाबतीत पाहिले तर बऱ्याचदा जनावर आजारी पडलेले असते आणि आपल्याला ते समजत नाही.

अशावेळी बऱ्याचदा जनावरांना उपचार करण्यास वेळ होतो आणि  दुर्दैवाने जनावर मृत्युमुखी पडू शकते. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्याला आजारी जनावराची लक्षणे ओळखता येणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे वेळेत जर जनावर आजारी आहे हे ओळखता आले तर तात्काळ पशुवैद्यक यांची मदत घेता येते व जनावरांचा मृत्यू टाळता येणे शक्य होते. या लेखात आपण याबद्दल माहिती बघणार आहोत.

 या लक्षणांवरून ओळखा आजारी जनावर

1- समजा तुम्ही गोठ्यामध्ये गेलात आणि हाक मारली किंवा टाळी वाजवली परंतु तरीदेखील जनावराकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली गेली नाही किंवा या व्यतिरिक्त तुम्ही जनावरांच्या अंगाला हात लावला व त्याची कातडी थरथरली नाही तर समजावे ते जनावर आजारी आहे.

2- आजारी असलेले जनावर नेहमी जसा चारा खाते तसा खात नाही. तसेच रवंथ करण्याची क्रिया मंदावते किंवा बंद देखील होते. बऱ्याचदा आजारी जनावराच्या पोटातील चारा मिश्रित जे पाणी असते ते त्याच्या नाकावाटे बाहेर येते.

3- तसेच जनावर जर आजारी असेल तर ते सतत उठ बस करते किंवा लाथ उडवते. बऱ्याचदा शेपूट उंच करून उभे राहते. भिंतीला किंवा झाडाला धक्का मारते, कुठलाही प्रकारचा पदार्थ चघळत राहते इत्यादी अस्वस्थता असलेल्या हालचाली करत राहते.

4- आजारी असलेले जनावर जमिनीवर पाय लांबून पडून राहते किंवा उठवले तर उठण्याचा प्रयत्न करत नाही. त्याप्रमाणेच उभे जर राहिले तर चालण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करत नाही. आजारी जनावर जर हंबरायला लागले तर ते अतिशय कर्कश किंवा हळुवारपणे हंबरते. तसेच पाय ओढत किंवा अडखळत किंवा लंगडत चालते.

5- तसेच आजारी जनावरांच्या अंगाला खाज सुटते व त्यासोबतच शरीरावरील जे केस असतात ते ताठ होतात व कातडीची चकाकी नेहमीप्रमाणे दिसत नाही. तसेच आजारी जनावरे झाडाला किंवा भिंतीला अंग घासतात. तसेच त्वचेखालील ग्रंथी सुजल्यामुळे त्या स्पष्ट वरून दिसायला लागतात.

6- जनावर जर आजारी असेल तर त्याची श्वसनाची क्रिया अतिशय हळूपणे किंवा अतिशय वेगात होते. तसेच श्वास घेताना पोटाचे जे काही स्नायू असतात त्यांची हालचाल वाढते व ते तोंड उघडे ठेवून श्वास घेत राहतात.

7- आजारी जनावरांचे शेण अतिशय पातळ किंवा अतिशय घट्ट होते. तसेच शेणामधून आव व रक्त पडते.

8- आजारी असलेले जनावर गोंधळल्यासारखे दिसते व ते कळपातील इतर जनावरांमध्ये न मिसळता वेगळे उभे राहते व सुस्त दिसते. उभे राहताना ते खाली मान घालून उभे राहते.

9- नाकातील त्वचा कोरडी पडते व ओलसरपणा जातो.

10- तसेच आजारी जनावरांची लघवी ही थेंबा थेंबाने होते किंवा बंद देखील होते. लघवीचा रंग सामान्यपेक्षा लालसर किंवा अति पिवळा किंवा काळसर लाल दिसायला लागतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe