मागील काही वर्षांपासून शेतीवर सातत्याने अवकाळी, गारपीट तसेच वादळी वाऱ्यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसताना आपल्याला दिसून येत असून या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर हवामान बदलामुळे देखील शेतीवर विपरीत परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते.
या दृष्टिकोनातून शेतकरी आता हवामान बदलानुसार आणि नैसर्गिक आपत्ती पासून बचाव करता येईल या दृष्टिकोनातून शेतीचे नियोजन करतात व तशाच पद्धतीने पीक लागवडीचे नियोजन करून पिकांची लागवड करतात. या बदललेल्या पिकपद्धतींमध्ये आता शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवड आणि भाजीपाला पिकांकडे मोठ्या प्रमाणावर दिसून येते. भाजीपाल्यामध्ये मिरची, टोमॅटो तसेच वांगे,
बटाटे आणि बऱ्याच वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. भाजीपाला पिकांपासून कमीत कमी कालावधीत आणि कमी खर्चामध्ये जास्तीचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळविणे शक्य होते.
अशाच प्रकारे अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील आनंद मालकर या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रामध्ये यावर्षी हिरव्या मिरचीचे पीक घेतले व व्यवस्थापन योग्य ठेवून दर्जेदार मिरची पिकवली व तिची थेट ब्रिटन आणि युरोपियन देशांमध्ये निर्यात केली जात आहे. त्यामुळे लेखांमध्ये आनंद मालकर यांनी मिरचीचे व्यवस्थापन कसे केले? याबद्दलची माहिती बघणार आहोत.
आनंद मालकर करत आहेत मिरचीची युरोपियन देशांना निर्यात
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यातील दहिगाव बोलका येथील शेतकरी आनंद मालकर यांनी एक एकर क्षेत्रामध्ये मिरची लागवड करण्याचे ठरवले व त्याकरिता शेतीची तयारी म्हणून अगोदर पूर्वमशागत करून एक एकर मध्ये पाच ट्रॉली शेणखत टाकले व लागवडीकरिता शेतामध्ये 4.25 फुटांवर समांतर वरंबा करून त्या वरंब्यांमध्ये तीन गोण्या निंबोळी पेंड व तीन गोणी डीएपी खत मिसळून घेतले.
ज्या अंतरावर वरंबा घेतलेले होते त्याच अंतरावर ठिबक पसरवले व मल्चिंग पेपर टाकून दीड एकर क्षेत्रावर शार्क वन जातीच्या मिरचीची साडेसात हजार रोपांची 28 जानेवारीला लागवड केली. शार्क वन ही मिरचीची जात अधिक उत्पादन देण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून ती उंच वाढते व तिला फांद्या देखील भरपूर येतात.
त्यामुळे या मिरचीला आधार म्हणून बांबू व तारांचा वापर केला. योग्य व्यवस्थापन ठेवून आता मिरचीचे उत्पादन सुरू झाले असून गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून तोडणीला सुरुवात देखील झालेली आहे व 90 दिवसात तब्बल दोन टन उत्पादन त्यांना मिळाले आहे.
अजून तरी दहा ते बारा टन उत्पादन मिळेल असा अंदाज आनंद मालकर यांना आहे. सध्या ही मिरची युरोपियन देशात निर्यात केली जात असून त्या ठिकाणी किलोला साधारणपणे 55 रुपये ते 60 रुपयाचा बाजार भाव मिळत आहे.
निर्यातक्षम मिरची उत्पादनाकरिता केले योग्य व्यवस्थापन
निर्यातयोग्य म्हणजेच निर्यातक्षम मिरची उत्पादन मिळवता यावे याकरता त्यांनी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खतांचा वापर केला. यामध्ये त्यांनी शेणखत, गोमूत्र आणि गुळाचा वापर करून 50 लिटर स्लरी तयार केली व ही स्लरी ठिबकच्या माध्यमातून दोन दिवसात सोडण्याचे नियोजन केले.
तसेच मिरचीच्या प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला व शेवटी झेंडूची लागवड देखील केली. महत्त्वाचे म्हणजे हा उन्हाळ्याचा कालावधी असल्यामुळे वाढत्या तापमानाचा विपरीत परिणाम मिरचीवर होऊ नये म्हणून शेताच्या चारही बाजूने शेडनेटचा वापर केला. निर्यातीसाठी मिरचीची निवड कशी करावी याची माहिती देताना मालकर सांगतात की,
याकरिता वाकडी तसेच लाल रंगाची व मिरचीचा पाला इत्यादी बाजूला करावा लागतो. वीस किलोच्या बॅगेत ती पॅक करून पाठवावी लागते व तिथे पुन्हा तिची तपासणी केली जाते व मगच निर्यात केली जाते. आजपर्यंत त्यांना एकूण एक एकर साठी एक लाख रुपये इतका खर्च आलेला आहे व त्यापासून अपेक्षित उत्पन्न मिळेल याची देखील अपेक्षा त्यांना आहे.