सोलापूरच्या मातीत आता पिस्ताचा थाट! मोहोळ तालुक्यातील बळीराम भाऊंनी सोलापूरच्या मातीत केली पिस्त्याची लागवड यशस्वी; वाचा माहिती

Ajay Patil
Published:
pista lagvad

तंत्रज्ञानाच्या मदतीने आता कुठलीही गोष्ट अशक्य राहिलेली नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्यामुळे कधीकाळी अगदी अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी आता लिलया पूर्ण होताना आपल्याला दिसून येतात. अगदी हीच बाब कृषी क्षेत्राला देखील लागू होते.

कृषी क्षेत्रामध्ये आता अनेक गोष्टींमध्ये उच्च तंत्रज्ञान आल्याने शेतकरी विविध प्रयोग करून या तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवत आहेत. उदाहरणच घ्यायचे झालं तर या तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळ्या पिकांची लागवड शेतकरी यशस्वी करत आहेत.

महाराष्ट्र सारख्या उष्ण पट्टा असलेल्या परिसरात देखील शेतकऱ्यांनी हिमाचल सारख्या राज्यांमध्ये येणाऱ्या सफरचंदाची लागवड यशस्वी केलेली आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच्या प्रजातींची लागवड देखील महाराष्ट्रातील शेतकरी आता यशस्वी करत आहेत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सफरचंद, ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी सारखे फळ पिकांची शेती तर यशस्वी केली. परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने या सगळ्या प्रयोगांना मागे टाकत चक्क पिस्ता  शेती सोलापूरच्या मातीत यशस्वी करून दाखवली आहे. त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 सोलापूरच्या शेतकऱ्याने केली पिस्ता लागवड यशस्वी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या पापरी या गावचे शेतकरी बळीराम राऊ भोसले हे प्रयोगशील शेतकरी असून शेतीमध्ये कायम वेगवेगळे प्रयोग करत असतात. याच प्रयोगांचा भाग म्हणून त्यांनी पिस्ता लागवड करून ती यशस्वी करून दाखवली आहे.

अतिशय कमी शिक्षण झालेले बळीराम भोसले हे शेतीवर प्रचंड प्रमाणात प्रेम करणारे व्यक्तिमत्व असून कायमच शेतीच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतात. राज्यातीलच नव्हे तर देशांमध्ये होत असलेले शेतीतील विविध प्रयोग पाहण्यासाठी त्यांनी थेट उत्तर प्रदेश ते पंजाब व हरियाणा,

जम्मू काश्मीर इत्यादी राज्यांना देखील भेटी दिलेल्या आहेत व त्या ठिकाणाची शेती पद्धतीचा अभ्यास करून त्याचे अनुकरण आपल्याकडे करण्यासाठी अखंड प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. याच पद्धतीच्या त्यांचा प्रयत्न हा त्यांच्यासाठी फायद्याचा ठरत आहे. त्यांच्याकडे अगोदर कोरडवाहू शेती होती व या शेतीत त्यांनी अगोदर टप्प्याटप्प्याने सुधारणा करायला सुरुवात केली.

त्यानंतर शेतीमध्ये बरेच प्रयोग सुरू केले व बऱ्याचदा काही प्रयोग फसले देखील. परंतु येणाऱ्या अडचणींवर मात करत त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि नव्या उत्साहाने शेतीमधील प्रयोग करण्याचा छंद मात्र सोडला नाही. सुरुवात करताना त्यांनी शेतीमध्ये केसर आणि हापूस आंब्याची बाग तयार केली

व आज आंब्याची बाग उत्तम प्रकारे बहरली असून या आंब्याच्या बागेमध्ये आंतर पिकाचा अंतर्भाव करून शेतीमध्ये जी काही गुंतवणूक केलेली आहे त्यातून काही पैसा परत मिळण्यास त्यांना मदत झाली. असे प्रयोग करत असताना त्यांच्या दीड एकर क्षेत्रामध्ये सफरचंदाची लागवड करायची ठरवले व त्यापासून उत्पादन देखील मिळवले.

परंतु याही पुढे जात त्यांनी पिस्ता लागवड करायचे ठरवले व चार वर्षांपूर्वी पिस्ता लागवड केली. सध्या त्यांना पिस्त्याचे पहिले उत्पादन मिळाले व त्यांनी ते विक्री न करता मात्र आसपासच्या शेतकऱ्यांना, नातेवाईकांना प्रेमाने खायला दिले.

या सगळ्या मधून त्यांची ही पिस्ता शेतीची माहिती लोकांपर्यंत पसरली. त्यांच्या या पिस्ता शेतीची प्रसिद्धी पाहिली तर या परिसरातील ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील त्यांच्या शेताला भेट दिली व स्वतः अकलूज या ठिकाणी त्यांनी पिस्ता शेती करण्यासाठी पावले उचलली आहेत.

 विजेवर मात करण्यासाठी शेतात सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी

कोरडवाहू शेतीचे रूपांतर बागायती शेतीमध्ये करताना त्यांनी भरपूर प्रयत्न केले व पाण्याची उपलब्धता निर्माण केली. परंतु शेतात पाणी उपलब्ध झाले परंतु पिकांना वेळोवेळी व्यवस्थित नियोजनाने पाणी देता यावे याकरिता वीज पुरवठा आवश्यक होता.

परंतु दररोज कमी दाबाने आणि खंडित स्वरूपात होणारा वीज पुरवठ्यामुळे ते हैराण झाले व या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करून विजेची कटकट कायमची मिटवली.

 अशा पद्धतीने घेतला पिस्ता लागवडीचा निर्णय

शेतीमध्ये प्रयोग करत असताना त्यांनी पिस्ता लागवड करण्याचा निर्णय घेतला व याकरिता त्यांनी युट्युबची मदत घेऊन त्या माध्यमातून याबद्दल माहिती काढली. तेव्हा त्यांना समजले की या पिकासाठी अतिथंड हवामानासोबतच अतिउष्ण हवामान गरजेचे असते.

त्यानुसार त्यांना समजून आले की, आपल्या परिसरात देखील अशा पद्धतीचे भौगोलिक वातावरण आहे व त्यामुळे या ठिकाणी पिस्ता लागवड यशस्वी होऊ शकते. त्यामुळे त्यांनी पिस्ता शेती करण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्यांनी उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपुर येथील एका रोपवाटिकेशी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणहुन 40 रोपे दोनशे रुपये प्रति रोप या दराने खरेदी केले व त्याची लागवड 15 गुंठे क्षेत्रामध्ये केली.

विशेष म्हणजे हे सर्व रोपे जिवंत राहून आज पिस्ता लागवड यशस्वी झाली आहे. पिस्ता लागवडीची सगळी माहिती त्यांनी youtube च्या माध्यमातून मिळवून त्या पद्धतीनेच नियोजन केले. याकरिता त्यांनी हलक्या व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड केली व त्यामध्ये बारा फूट बाय 14 फूट अंतरावर खोल खड्डे केले व या खड्ड्यांमध्ये लागवड केली.

पिस्त्यासाठी शेणखताचा वापर केला व पाण्याचे व्यवस्थापन करताना प्रत्येक झाडाला ठरवून वीस लिटर पाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दिले.

सगळ्याप्रकारचे व्यवस्थापन करून पहिल्यांदा पिस्त्याला बहर आल्यानंतर एकेक झाडावर एक किलो पिस्त्याचे उत्पादन त्यांना मिळाले. यावर्षी मार्चमध्ये दुसरा बहार आला आहे व पुढे दीड महिना हा बहर चालतो आणि जून जुलैपर्यंत पिस्ता बाजारात विकता येतो.

 एकरी किती मिळते पिस्त्याचे उत्पन्न?

पिस्त्याच्या एका झाडापासून दहा किलो पर्यंत पिस्ता तयार होतो व त्यानंतर दहा ते बारा वर्षांनी झाड वाढते व उत्पादन देखील तेवढ्यात जोमाने घेता येते. पिस्ताच्या झाडाची वैशिष्ट्य म्हणजे ते 60 ते 70 वर्षापर्यंत टिकते. याबद्दल माहिती देताना बळीराम भोसले सांगतात की एकरी 400 झाडांची लागवड जर केली तर वार्षिक चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आरामात मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe