Land Map:- जमिनीच्या बाबतीत असलेल्या बऱ्याच बाबी आता ऑनलाईन करण्यात आलेले असून यासंबंधी राज्याचा महसूल आणि भूमी अभिलेख या दोन्ही विभागांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तुम्ही अगदी सातबारा उताऱ्यापासून ते जमिनीची इतर महत्त्वाची कामे मिनिटांमध्ये मोबाईलच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. त्यामुळे सरकारी कार्यालयाच्या हेलपाट्या मारणे व यामध्ये जाणारा वेळ व पैसा यापासून मुक्तता मिळण्यात मदत झाली आहे.
तसेच या अनुषंगाने जर आपण जमिनीचा विचार केला तर बऱ्याचदा जमिनीच्या हद्दी, बांध तसेच शेत रस्ते इत्यादी वरून वाद उद्भवतात. त्यामुळे याप्रसंगी जमिनीचा सातबारा तसेच आठ अ चा उतारा जितका महत्त्वाचा असतो तितकाच जमिनीचा नकाशा देखील महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्हाला जमिनीचा नकाशा कुठे मिळेल किंवा कसा काढावा हे माहीत असणे गरजेचे आहे.
जमिनीचा नकाशा काढण्यासाठी आता तुम्हाला कुठल्याही कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नसून तुम्ही अगदी घरीबसून ऑनलाईन पद्धतीने जमिनीचा नकाशा काढू शकणार आहात. त्यामुळेच आपण या लेखात जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढावा याबद्दलची माहिती घेणार आहोत.
ऑनलाइन पद्धतीने जमिनीचा नकाशा कसा काढावा?
जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्याकरता सगळ्यात अगोदर म्हणजे…
1- तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगल वर जाऊन त्या ठिकाणी mahabhunakasha.mahabhumi.gov.in असे सर्च करावे लागेल.
2- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होते.
3- या ओपन झालेल्या नवीन पेजच्या डाव्या बाजूला तुम्हाला लोकेशन हा एक कॉलम दिसतो. या कॉलम मध्ये तुम्हाला तुमचं राज्य आणि कॅटेगिरी यामध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला रुरल हा पर्याय निवडणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
4- यानंतर तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या जिल्हा तसेच तालुका आणि तुम्ही राहत असलेले गाव निवडायचे आहे आणि सगळ्यात शेवटी व्हिलेज मॅप यावर क्लिक करणे गरजेचे आहे.
5- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमची शेत जमीन ज्या गावांमध्ये आहे त्या गावाचा संपूर्ण नकाशा तुमच्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होतो.
6- त्यानंतर होम या पर्यायासमोरील जो काही आडवा बाण आहे त्यावर क्लिक केले की तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहू शकतात.
7- त्यानंतर डावीकडे असणाऱ्या अधिक(+) आणि वजा(-) या बटनावर क्लिक केले की नकाशा मोठा किंवा छोटा आकारात तुम्हाला पाहता येतो.
जमिनीचा नकाशा कसा काढावा?
1- डावीकडच्या बाजूला तीन एकाखाली एक आडव्या रेषा तुम्हाला दिसतील त्यावर जर तुम्ही क्लिक केले की तुम्ही पहिल्या पेजवर परत जातात व या पेजवर तुम्हाला सर्च बाय प्लॉट नंबर या नावाचा एक कॉलम त्या ठिकाणी दिसेल.
2- या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकणे गरजेचे आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या जमिनीचा गट नकाशा त्याठिकाणी ओपन होतो.
3- त्यानंतर होम या पर्यायासमोरील जो काही आडवा बाण आहे त्यावर क्लिक करून आणि त्यानंतर वजाबाकीचं(-) बटन दाबून तुम्ही संपूर्ण नकाशा पाहू शकतात.
4- त्यानंतर डावीकडे प्लॉट इन्फो या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आहे त्या शेतकऱ्यांचं नाव व त्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल.
5- गट क्रमांक मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्यांचे सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिलेली असते.
6- संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित पाहिल्यानंतर डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी मॅप रिपोर्ट नावाचा पर्याय असतो. यावर तुम्ही क्लिक केले की तुमच्या जमिनीचा प्लॉट रिपोर्ट तुमच्या समोर ओपन होतो. त्यानंतर उजवीकडील खाली दिशा असलेल्या पानावर क्लिक केले की तुम्ही तो नकाशा डाऊनलोड करू शकतात.
7- त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेत जमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात व खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे याचे सविस्तर माहिती दिलेली असते.
अशा पद्धतीने तुम्ही अगदी सहजरीत्या तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतात.