Land Measuring :- जमीन मोजणी म्हटले म्हणजे खूप किचकट असणारी प्रक्रिया आणि वेळखाऊ देखील आहे. जमीन मोजणीची गरज ही प्रामुख्याने जमिनीच्या बाबतीत हद्दीवरून बऱ्याचदा वाद उद्भवतात. त्यामुळे जमिनीची मोजणी आणली जाते. यामध्ये आपल्याला माहित आहे की जमिनीची प्रथम मोजणी केली जाते व जो काही संबंधित जमिनीचा किंवा आजूबाजूच्या जमिनीचा नकाशा असतो त्या नकाशाचा आधार घेऊन वाद झालेल्या हद्दीच्या बाबतीत खुणा केल्या जातात व वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो.
या मोजणीच्या माध्यमातूनच अनेक प्रकारचे अभिलेख देखील तयार केले जातात व त्यातूनच जमीन मोजणीचे नकाशे तयार होतात. सगळ्या प्रक्रियेची नोंद ही भूमी अभिलेख विभागाकडे केली जाते. जमीन मोजणी करायची असेल तर याकरिता भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये अर्ज करणे गरजेचे असते. यासाठी तुम्हाला काही ठराविक रकमेचे चलन बँकेमध्ये भरावे लागते व ते कार्यालयात जमा केल्यानंतर जमीन मोजणी ही साधारणपणे एक महिनाच्या कालावधीमध्ये किंवा एक ठराविक तारीख देण्यात येते व तेव्हा केली जाते.
यामध्ये ठरलेल्या तारखेला भूमापक संबंधित जमिनीच्या जागेवर येऊन प्रत्यक्ष कब्जेदाराचा मोजणी अर्जदार तसेच लगत जमिनीचा कब्जेदार व पंचमंडळी यांच्यासमोर मोजणीला सुरुवात करतात. साधारणपणे ही प्रक्रिया सगळ्यांना माहिती आहे. परंतु ही सगळी प्रक्रिया खूपच किचकट आहे आणि वेळखाऊ देखील असल्यामुळे अनेक जमीन मोजण्याचे प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे आता जमिनीची मोजणी कमी वेळेमध्ये व अचूक व्हावी याकरिता राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून रोव्हर पद्धत वापरली जाणार आहे.
रोव्हर तंत्रज्ञान नेमके काय आहे?
जमीन मोजणी ही कमीत कमी वेळेमध्ये व अचूक व्हावी याकरिता भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून 77 स्टेशन उभारण्यात आली असून या स्टेशनचा संबंध किंवा संपर्क हा सॅटॅलाइटशी येणार आहे. या दृष्टिकोनातून रोव्हर यंत्र असून त्याचा वापर आता शेतात घेऊन जमीन मोजणीसाठी होऊ शकणार आहे.
हे यंत्र सॅटॅलाइटशी जोडले असल्यामुळे उभारलेल्या या स्थानकांच्या मदतीने किंवा आधारे जीपीएस मोजणी काही वेळात करता येणे शक्य होणार आहे. ज्या जमिनीची मोजणी करण्यात येईल ती स्थानकांमधून संकलित करण्यात येणार असून या प्रक्रियेमुळे आता जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करता येणे शक्य होणार आहे.
कमी वेळेत होईल जमिनीची मोजणी
रोव्हर यंत्र उपग्रहाच्या माध्यमातून ज्या काही लहरी प्राप्त होतात त्या माध्यमातून जमीन मोजणीचे अक्षांश व रेखांश दाखवते. त्यानंतर संगणक मधील जी काही यंत्रणा असते त्या माध्यमातून मोजण्याची प्रक्रिया केली जाते. मोजणी करताना सुलभता व अचूकता येते व मोजणी देखील वेगाने होण्यास मदत होते. जमीन मोजणीच्या अगोदरच्या पद्धतीमध्ये दहा एकर जमीन मोजणी करायचे असेल तर साधारणपणे एक दिवस इतका वेळ लागत होता.
तसेच नंतरच्या कालावधीमध्ये इटीएस यंत्राचा वापर केला जायचा व त्याला देखील दहा एकर क्षेत्राचे मोजणी करायचे असेल तर तीन ते चार तास लागायचे. परंतु आता या यंत्राच्या साह्याने ही मोजणी केवळ तासाभरात करता येणे शक्य आहे. महत्वाचे म्हणजे रोव्हर यंत्रांच्या मदतीने जमीन मोजणीच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा वेगाने व्हावा याकरिता यंत्र खरेदी करिता निविदा प्रक्रिया राबवण्यात सुरुवात करण्यात येणार असून यापूर्वी 900 यंत्र खरेदी करण्यात आलेले आहेत व आता नवीन सहाशे यंत्र उपलब्ध होणार आहेत.