Litchi Farming: भारतात गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड करत आहेत. राज्यातील शेतकरी बांधव देखील उत्पादनवाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड करत आहेत. यात प्रामुख्याने (Pomegranate Farming) डाळिंब, द्राक्षे, केळी, सिताफळ या फळबाग पिकांचा समावेश आहे. मित्रांनो फळबाग पिकांमध्ये लीचीचा देखील समावेश आहे.
आपला देश लिचीचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. आजच्या काळात सुमारे 1 लाख हेक्टर जमिनीवर लिचीची शेती (Farming) करून 7 लाख टनांहून अधिक उत्पादन मिळत आहे. सुरुवातीला जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लिचीचे पीक घेतले जात होते, परंतु आता बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम आणि त्रिपुरा, छत्तीसगड, उत्तरांचल, ओरिसा, हरियाणा आणि पंजाबसह 13 राज्ये त्याचे बंपर उत्पादन करत आहेत.
आपल्या राज्यातही लिचीची शेती बघायला मिळते. राज्यातील ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक लिचीची लागवड असल्याचे तज्ञ सांगत असतात. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, शेतकऱ्यांना लिचीच्या व्यावसायिक शेतीचा अधिक फायदा होतो, कारण लिचीवर प्रक्रिया करून जाम, शरबत, अमृत आणि कार्बोनेटेड पेयेही तयार केली जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे (Farmer Income) मिळतात.
लिची लागवड
कृषी तज्ञांच्या मते लिचीच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी खोल चिकणमाती असलेली शेतजमीन सर्वात चांगली आहे. त्याच्या शेतीत, वर्षातून दोनदा अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जेव्हा लिचीच्या झाडावर फुले व फळे येतात म्हणजेचं जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान आणि एप्रिल-मे दरम्यान जेव्हा फळे काढणीसाठी तयार होतात तेव्हा लिचीच्या बागेची विशेष काळजी घ्यावी लागते.
लिचीच्या लागवडीसाठी सुधारित व जास्त उत्पन्न देणाऱ्या वाणांची निवड करावी, ज्यामध्ये पोर्क्युपिन, कसबा, इस्टर्न, ट्रायकोलिया, चायना, ग्रीन, अर्लीबेदाना, देशी, डी रोझ आणि रोझ सेंटेड इ. जातींचा समावेश आहे.
कलम पद्धतीने रोपे तयार करा
•लिची पिकापासून चांगल्या दर्जाच्या उत्पादनासाठी, कलम पद्धतीने रोप तयार करणे चांगले आहे, कारण बियांपासून रोपाची लागवड केल्याने चांगल्या प्रतीची फळे मिळत नाहीत आणि झाडांची वाढही मंद होते.
•रोप तयार करण्यासाठी मे-जून महिन्यात झाडाची निरोगी फांदी निवडावी.
•फांदीच्या टोकापासून 40-50 सें.मी. मागील बाजूस चाकूने गोलाकार 2 सें.मी. एक रिंग बनवावी.
•या रिंगवर IBA चे 2000 ppm. प्रमाणाची पेस्ट बनवा आणि लावा.
•पेस्ट लावल्यानंतर रिंगला ओलसर मॉस गवताने झाकून रिंगवर गोटी बांधून पॉलिथिनने झाकून सुतळी दोरीने घट्ट बांधून घ्या.
•लिचीच्या झाडावर गोटी बांधल्यानंतर 2 महिन्यांत मुळे येतात, त्यानंतर फांदीची अर्धी पाने काढून सावलीच्या जागी लावावीत.
अशा प्रकारे करा लिचीची लागवड
•लिचीची रोपे चांगला पाऊस पडल्यानंतरच बागेत लावावीत. यासाठी जून-जुलै महिना चांगला आहे, यावेळी पाऊस पडल्याने झाडांची वाढ झपाट्याने होते.
•लावणीपूर्वी शेतात 10X10 मीटर अंतरावर 1X1X1 आकाराचे खड्डे खणावेत.
•हे खड्डे 2-3 टन कुजलेले शेण, 2 किलो निंबोळी पेंड, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि मातीच्या मिश्रणाने भरावेत.
•ज्या भागात पाऊस आणि पाणी साचण्याचे प्रमाण जास्त आहे, तेथे 20-25 सेमी उंचीपर्यंत खड्डे भरावेत.
•या खड्ड्यांमध्ये लिचीची रोपे लावा आणि हलके सिंचनाचे कामही करा.
लिची उत्पादन
अहवालानुसार, शेतात लिचीची रोपे लावल्यानंतर, 15-20 वर्षांत ही झाडे मजबूत होतात, ज्यामुळे दरवर्षी 100 किलो फळे मिळतात. बाजारात दर्जानुसार लिची 80 ते 200 रुपये किलो दराने विकली जाते.