अरं कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ! शेतकरी आत्महत्याचा ‘हा’ आकडा काळीज पिळवटणारा

Nanded News : सततचा निसर्गाचा लहरीपणा त्यामुळे उत्पादित होणारे थोकडे उत्पादन आणि उत्पादनाला बाजारात मिळणारा कवडीमोल दर यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकरी पुरता भरडला जात आहे.

परिणामी आपल्या कृषीप्रधान देशात शेतकरी आत्महत्येचे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. विशेषता महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचा आकडा हा काळीज पिळवटणारा आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी वाढल्याचे एका आकडेवारीनुसार उघड झाले आहे. यामुळे हे महाराष्ट्र आहे की ‘आत्महत्या’राष्ट्र हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे असा बोभाटा सारेच राजकारणी वाजवत आहेत. मात्र जमिनीवर वस्तुस्थिती पाहता शेतकरी आत्महत्येचे वाढलेले प्रमाण महाराष्ट्राच्या प्रतिमेवर काळ फासत आहे. हा एक मोठा चिंतेचा विषय असून यावर वेळीच उपाययोजना करणे अतिशय आवश्यक आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक आकडेवारीनुसार, गेल्या 11 महिन्यात एकट्या नांदेड जिल्ह्यात 138 शेतकरी राजांनी आपले जीवन संपवले आहे.

साहजिकच शेतकरी काही हौसासाठी फासावर चढत नाहीत. यामागे काहीतरी ठोस कारण आहे. त्यामुळे कुठलं का सरकार असेना त्यांनी या कारणाच्या तळाशी जात कारणाला मुळासकट काढून महाराष्ट्र बाहेर फेकत महाराष्ट्राला खऱ्याअर्थाने शेतकरी आत्महत्यामुक्तराष्ट्र बनवले पाहिजे. या आकडेवारीनुसार, गेल्या नऊ वर्षात नांदेड जिल्ह्यात 1195 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. 2015 मध्ये सर्वाधिक 190 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. 2014 पासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.

खरं पाहता शेतकरी बांधव शेती कसण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत असतो. शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल या अनुषंगाने कर्ज घेऊन पीक पेरणी करतो, पिकाची जोपासना करतो मात्र निसर्गाचे हे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी लांबलेला पाऊस, कधी परतीचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांना अतिशय नगण्य उत्पादन मिळतं. शिवाय अनेकदा शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादनाला बाजारपेठेत अतिशय नगण्य दर मिळतो.

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर घेतलेलं कर्ज परतफेड करणे तर दूरची गोष्ट आहे मात्र पोटाची खळगी भरणं हे देखील एक मोठे चॅलेंजिंग काम शेतकऱ्यांसाठी बनत आहे. अशा परिस्थितीत डोक्यावर सातत्याने वाढत असलेलं कर्जाच ओझं मुळता स्वाभिमानी असलेल्या शेतकऱ्याला स्वस्थ झोपू देत नाही. म्हणून घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करण्यासाठी जगाचा पोशिंदा राब-राब राबतो मात्र निसर्गाचे दुष्टचक्र आणि सुलतानी दडपशाही या दोन्हींमध्ये त्याला कर्जाची परतफेड करन अशक्य बनतं.

परिणामी, जगाचा पोशिंदा फासावर लटकतो. निश्चितच ही बाब कृषीप्रधान देशासाठी लाजिरवाणी आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे हे वाढतं प्रमाण महाराष्ट्रातील राजकारणाची, समाजकारणाची विफलता प्रदर्शित करत आहे. अमुकने उठून तमुक वर बोट दाखवण्यापेक्षा सर्वांनी शेतकरी आत्महत्येच्या मुळाशी जाऊन महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त राष्ट्र बनवलं पाहिजे.