ग्रामीण भागामध्ये जर कुठल्याही प्रकारचे शासकीय काम करायचे असेल तर नागरिकांचा सरळ संबंध हा ग्रामपंचायत कार्यालय आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे तलाठी कार्यालय यांच्याशी येत असतो. यामध्ये तलाठी कार्यालयात जमिनीच्या सातबारा पासून फेरफार नोंदी तसेच वारसांच्या नोंदी इत्यादी महत्त्वाची कामे पार पाडली जातात. परंतु ही कामे करण्याची प्रक्रिया बघितली तर ती खूपच वेळ खाऊ आणि किचकट असल्यामुळे नागरिकांना बऱ्याचदा तलाठी कार्यालयामध्ये वारंवार जावे लागते.
परंतु आता तंत्रज्ञानाने सगळ्या क्षेत्रांमध्ये शिरकाव केल्यामुळे याला आता राज्य शासनाचा भूमी अभिलेख विभाग देखील अपवाद राहिला नसून या विभागाने देखील आता तलाठी कार्यालयाशी संबंधित असलेली अनेक कागदपत्रांची कामे आता घरबसल्या करून देण्याची सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे.
आता तुम्हाला जर वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर घ्यायची असेल तर आता तलाठी कार्यालयात न जाता तुम्ही अगदी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकतात. ही खास सुविधा आता भूमी अभिलेख विभागाने एक ऑगस्टपासून महसूल सप्ताहाच्या निमित्ताने राज्यात
सुरू केली आहे.भूमी अभिलेख विभागाने जास्तीत जास्त सुविधा केल्या ऑनलाईन उपलब्ध
त्याबद्दल सविस्तर वृत्त असे की, शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने जास्तीत जास्त सुविधा आता ऑनलाईन उपलब्ध करून दिले असून यामध्ये डिजिटल सातबारा उतारा, ई फेरफार आणि इतर अनेक महत्त्वाच्या कामांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना सातबारा उतारा घेण्यासाठी देखील तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नसून तुम्ही ऑनलाइन पद्धतीने डिजिटल सातबारा आता मिळवू शकता.
याचाच अर्थ आता कुठल्याही कामासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. याचाच एक भाग म्हणून वारस नोंदीची सुविधा देखील आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली असून एक ऑगस्टपासून संपूर्ण राज्यामध्ये या सुविधेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याआधी वारसनोंद करायची असेल तर नागरिकांना तलाठी कार्यालयांमध्ये जावे लागत होते व त्या ठिकाणी जाऊन अर्ज करणे गरजेचे होते.
परंतु आता एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व वारसांची नोंद करण्यासाठी नागरिक आता महाभुमी या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यानंतर हा ऑनलाईन अर्ज संबंधित तलाठ्याकडे जातो व तलाठी या अर्जाची ऑनलाईन पद्धतीने वेरिफिकेशन म्हणजेच पडताळणी करतो.
जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असेल तर त्याची माहिती तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून कळविण्यात येते. जर तुमच्या अर्जामध्ये कागदपत्रे आणि इतर कुठल्याही प्रकारची चूक नसेल तर वारसाची नोंद ही सातबारा उताऱ्यावर करून देण्यात येणार आहे.