Soybean Variety:- पिकांच्या भरघोस उत्पादनामध्ये ज्या प्रकारे पिकांचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते अगदी त्याचप्रमाणे त्या पिकाच्या दर्जेदार अशा वाणाची निवड लागवडीसाठी करणे देखील तितकेच गरजेचे असते. कारण तुम्ही कितीही व्यवस्थापन चोख ठेवले आणि वाण मात्र दर्जेदार नसेल तर त्यापासून उत्पादन निकृष्ट आणि कमी मिळते.
त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. या मुद्द्याला धरून जर आपण सोयाबीन या पिकाच्या अनुषंगाने पाहिले तर खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन लागवड केली जाते. खरिपाचे बहुतांशी शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित सोयाबीन पिकावर अवलंबून असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
त्यामुळे महत्त्वाच्या अशा या पिकाच्या लागवडीसाठी दर्जेदार वाणाची निवड खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे या लेखात आपण सोयाबीनच्या अशाच दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देऊ शकणाऱ्या व त्यातल्या त्यात कमी पाण्यात देखील चांगले उत्पादन देण्याची क्षमता असलेल्या एनआरसी 152 या वाणाची माहिती घेणार आहोत.
काय आहेत ‘एनआरसी 152’ वाणाची वैशिष्ट्ये?
सोयाबीनचे हे वाण प्रामुख्याने राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश राज्यांसाठी विकसित करण्यात आलेले वाण असून याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे इतर सोयाबीनच्या वाणाच्या तुलनेमध्ये लागवडीनंतर काढणीला देखील लवकर येते.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हे एक पसंतीला उतरलेले वाण आहे. तसेच याची प्रती हेक्टर उत्पादनक्षमता पाहिली तर 38 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवून देऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना जर भरघोस उत्पादन हवे असेल तर एनआरसी 152 हे वाण फायद्याचे ठरू शकते.
कमी पाण्यात जास्त उत्पादन देण्यास सक्षम
सोयाबीनच्या ‘एनआरसी 152’ हे वाण प्रामुख्याने इंदोर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधकांनी संशोधित केले असून त्याची वैशिष्ट्ये वेगवेगळी आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. त्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे जर पावसाचा खंड पडला तरी देखील या वाणाचे उत्पादन फारसे घटत नाही.
त्यामुळे कमीत कमी पाण्यात आणि तीन महिन्यात म्हणजेच 90 दिवसांमध्ये उत्पादन मिळवून देण्यासाठी सोयाबीनचा हा वाण सक्षम आहे. त्यामुळे हे वाण शेतकऱ्यांना सोयाबीनचे अधिकचे उत्पादन मिळवून देण्यास मदत करेल व आर्थिक दृष्टिकोनातून देखील फायद्याचे ठरेल अशी एक अपेक्षा आहे.