Onion Farming : कौतुकास्पद ! नवयुवक शेतकऱ्याचा मल्चिंग पेपरवर कांदा लागवडीचा प्रयोग ; उत्पादनात वाढ अन…

Onion Farming : अलीकडे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव शेती व्यवसायात मोठा बदल करत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील शेतकरी बांधव सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत. पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आता शेतकऱ्यांचा कल आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे आहे.

जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा सल्ला देतात. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात देखील एका मराठमोळ्या शेतकऱ्याने असाच काहीसा भन्नाट प्रयोग केला आहे. या नवयुवक तरुणाने मल्चिंग पेपरवर कांदा लागवड करून इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केल आहे. तालुक्यातील मौजे जवळे येथील अंकुश रामचंद्र गायकवाड यांनी हा प्रयोग केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अंकुश यांनी आपल्या आठ एकर शेत जमिनीवर पारंपारिक पद्धतीने कांदा लागवड करण्याऐवजी मल्चिंग पेपर अंथरून त्यावर कांदा लागवड केली आहे. अंकुश यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना एक एकर शेत जमिनीत मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनासाठी तीस हजाराचा खर्च आला आहे.

पारंपारिक शेतीच्या तुलनेत हा खर्च अधिक भासत असला तरी देखील यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. कारण की या पद्धतीने कांदा लागवड केल्यास तन नियंत्रण करण्यासाठी खुरपणी करावी लागत नाही तसेच तणनाशकाचा देखील प्रयोग करावा लागत नाही. साहजिकच यामुळे औषधांवर तसेच मजुरीवर होणारा मोठा खर्च वाचतो.

केवळ तणनाशकचं नाही तर अशा पद्धतीने लागवड केल्यामुळे रोगराईचा तसेच कीटकांचा देखील प्रादुर्भाव कमी होतो परिणामी कीटकनाशक, तणनाशक औषध फवारणीचा खर्च वाचतो. अंकुश यांच्या मते मल्चिंग पेपरवर कांदा लागवड केली तर एका एकरात दोन लाख रोपे लागतात.

तसेच या रोपांची एक समान लागवड केली असल्याने कांद्याची साईज एकसमान राहते. तसेच कांदा पिकावर थंडी, तापमान वाढ, धुके यांसारख्या गोष्टींचा फारसा असा विपरीत परिणाम होत नाही. अशा पद्धतीने कांदा लागवड केली तर जमीन भुसभुशीत राहते परिणामी कांदा चांगला पोसला जातो.

मल्चिंग पेपर मध्ये असलेल्या प्रतिकारक किरणांमुळे रस शोषण कीटकांचा कांदा पिकावर प्रादुर्भाव होत नाही. तसेच कांदापात ही मातीच्या संपर्कात येत नसल्याने यावर कोणत्याच बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. एकंदरीत रोगराईचा धोका कमी होतो. अंकुश यांच्या मते आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मल्चिंग पेपरवर कांदा लागवड करणारे ते एकमेव शेतकरी आहेत.

निश्चितच मल्चिंग पेपर वरील कांदा लागवड शेतकऱ्यांसाठी बहु फायद्याची ठरणारी आहे. यामुळे उत्पादनात भरीव वाढ होण्याची आशा अंकुश यांना देखील आहे. निश्चितच हा प्रयोग जर यशस्वी झाला तर इतरांसाठी प्रेरक अशी ही कामगिरी राहणार आहे.