Farming Buisness Idea: शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारा! सरकारच्या ‘या’ योजनेचा घ्या लाभ आणि मिळवा अनुदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming Buisness Idea:  शेती क्षेत्र संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे निसर्गात घडणाऱ्या विविध गोष्टींचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम हा शेतीवर होताना दिसतो. काही वर्षापासून हवामानात झालेला बदल, सातत्याने होत असलेली अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस यामुळे शेतीच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे.

त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून न राहता शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आता ही भविष्यातील गरज आहे. शासनाकडून देखील अनेक योजनांच्या माध्यमातून सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विविध प्रकारे आर्थिक मदत केली जाते. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना असून  यामधील केंद्र सरकारची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना देखील खूप महत्त्वाचे आहे. योजना सध्या संपूर्ण देशभरामध्ये राबविण्यात येत असून 2020 ते 2025 या पाच वर्षांकरिता ही योजना लागू करण्यात आलेली आहे.

 या योजनेचे प्रमुख उद्देश

या योजनेच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक गट आणि संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच स्वयंसहायता गट व सहकारी उत्पादक गट यांची पत मर्यादा वाढवणे तसेच उत्पादनाचे ब्रँडिंग व विपणन अधिक मजबूत करून त्यांना संघटित अशा पुरवठा साखळीशी जोडणे, विविध प्रकारच्या अन्नप्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्याकरिता सहाय्य करणे, प्रक्रिया सुविधा तसेच साठवणूक, तयार मालाची पॅकेजिंग व मार्केटिंग यासोबतच उद्योग वाढीकरिता आवश्यक असलेल्या सर्व सेवांचा लाभ हा अन्नप्रक्रिया उद्योगांना मिळवून देण्याचा देखील या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

 या योजनेत लाभार्थी निवडीसाठीचे आवश्यक निकष

त्यामध्ये प्रमुख म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो व्यक्ती अर्ज करेल त्याचा संबंधित उद्योगावर मालकी अधिकार असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असावे. या योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती घेऊ शकेल. महत्वाचे म्हणजे उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करून देण्याची तयारी असावी व प्रकल्प किमतीच्या कमीत कमी दहा टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक कर्ज घेण्याची देखील तयारी असावी.

 किती दिले जाईल अनुदान?

यामध्ये वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी संस्था, बेरोजगार युवक, नवउद्योजक, कार्यरत उद्योजक, महिला, प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्पादन संस्था, स्वयंसहायता गट, गैरसरकारी संस्था, सहकारी संस्था आणि खाजगी कंपनी इत्यादींना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के आणि कमाल दहा लाख रुपयांपर्यंत क्रेडिट लिंक सबसिडीच्या आधारावर अनुदानाचा लाभ देण्यात येत आहे.तसेच सामायिक पायाभूत सुविधा अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था व कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन, शासकीय संस्था याचा लाभ घेऊ शकतात.

या घटकांकरिता 3 कोटी जास्तीत जास्त मर्यादेसोबत पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी मिळते. एवढेच नाही तर ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील जे काही स्वयंसहायता गटातील सदस्य आहेत त्यांना बीज भांडवल अंतर्गत प्रत्येक सदस्याला खेळते भांडवल किंवा गुंतवणुकी करिता चाळीस हजार रुपये व प्रत्येक स्वयंसहायता गटाला जास्तीत जास्त चार लाख रुपये देण्यात येतात.

 कोणत्या उद्योगांना मिळतो लाभ?

या योजनेअंतर्गत फळे व भाजीपाला उत्पादन प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया, धान्य प्रक्रिया तसेच मसाले पिक लागवड तसेच मासे व सागरी उत्पादन प्रक्रिया, तेलबिया प्रक्रिया उद्योग तसेच पोल्ट्री उत्पादने व मांस, किरकोळ वन उत्पादने प्रक्रिया आणि बेकरी उत्पादने इत्यादींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

 योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे संपर्क साधावा?

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा वैयक्तिक लाभार्थी व स्वयंसहायता बचत गटातील सदस्यांनी बीज भांडवला करिता ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे असून तो अर्ज  www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर सादर करावा. तसेच अधिक माहिती करिता विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक( आत्मा), जिल्हा नोडल अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधने गरजेचे आहे.